विठ्ठल उमप हे महाराष्ट्राच्या लोकसंगीतात मोठं नाव. त्यांच्या गाण्याने सर्व संगीतप्रेमींना भुरळ घातली. विठ्ठल दादा हे माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचे खास मित्र.
लोकसंगीतातील पहाडी आवाजाचे बादशहा म्हणजे विठ्ठलदादा उमप. त्यांनी अवघा महाराष्ट्र गाजवत संगीतरसिकांच्या मनात घर केलं आहे. त्यांची असंख्य गाणी अजरामर झाली आहेत. त्यांची ‘फू बाई फू, फुगडी फू’, ‘ये दादा आवर ये’ ही गाणी मलाच काय, अवघ्या महाराष्ट्राला आवडतात. त्यांच्या या गाण्यांनी मला त्यांच्या प्रेमात पाडलं. अशा विठ्ठलदादांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांत मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांचा मी मोठा चाहता असल्याचा मला अभिमान आहे.
विठ्ठल उमप हे महाराष्ट्राच्या लोकसंगीतात मोठं नाव. त्यांच्या गाण्याने सर्व संगीतप्रेमींना भुरळ घातली. विठ्ठल दादा हे माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचे खास मित्र. त्यामुळे आमच्या घरी त्यांचे येणे-जाणे असायचे. दोघेही राज्यभरात दौरे करायचे. अनेक कार्यक्रम त्यांनी सोबत केले आहेत. त्यामुळे त्यांचं गाणं, काम करण्याची पद्धत मला जवळून पाहता आली.
मी माझ्या गाण्याला सुरुवात केली तेव्हा विठ्ठलदादा आपल्या लोकसंगीताच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र गाजवत होते. अशा मोठ्या कलाकारासोबत मला मुकाबला करण्याची संधी मिळाली. मला आठवतं, देवळाली या ठिकाणी आमचा पहिला मुकाबला झाला होता. त्यांच्यासोबत मुकाबला करण्यामध्ये जी मजा यायची, ती शब्दांत सांगणे कठीण आहे. मी कुणाचा फॅन आहे, असे मला अनेकजण विचारतात, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे विठ्ठल उमप! मी त्यांचा प्रचंड चाहता आहे, हे अभिमानाने सांगतो. त्यांची ‘फु बाई फु, फुगडी फु’, ‘ये दादा आवर ये’ ही गाणी मलाच काय, अवघ्या महाराष्ट्राला आवडतात. त्यांच्या या गाण्यांनी मला त्यांच्या प्रेमात पाडले आहे.
विठ्ठलदादा यांचा आवाज म्हणजे एकदम पहाडी. विठ्ठल उमप आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला आणि गाण्याला तोड नाही. त्यांची गाणं गायची स्वतःची एक शैली होती. ती शैली त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचं गाणं कोणत्याही ढंगात बसतं, हे विशेष. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत मुकाबला केल्यानंतर मी ध्वनिमुद्रणात व्यग्र झालो. माझेही कार्यक्रम वाढले होते. त्यामुळे आमच्या कार्यक्रमांमध्ये खंड पडला होता. नंतर मात्र पुन्हा एकदा मुकाबला करण्याचा योग आला. सामाजिक विषय हा विठ्ठलदादांचा आवडता. त्या अनुषंगानेच आमचे सामने रंगू लागले. अनेक सामन्यांमध्ये मी त्यांना मात देत असे; पण त्यातही ते खुश व्हायचे. कारण मला ते मुलाप्रमाणे मानत होते. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळाले आहे.
विठ्ठल उमप यांच्याकडे असलेली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी कुणाकडे असेल असे वाटत नाही. त्या शिदोरीचा फायदा मला झाला. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांच्या मुलांपेक्षा ते माझ्यावर प्रेम करायचे. त्यांचा स्वभाव खूपच मिश्किल होता. माझी ते खूप मस्करी करायचे. माझ्या कपड्यांच्या स्टाईलवरूनदेखील ते खूप मस्करी करायचे. ते सोबत असले की चर्चेला रंगत यायची. कार्यक्रमात तर ते धमाल उडवून द्यायचे. मी आयुष्यात अनेक सामने केले; पण त्यांच्यासोबत सामना करताना जी मजा आली, जे शिकायला मिळाले ते इतर कधीही झाले नाही.
विठ्ठल उमप यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर, त्यांच्या विचारांवर खूप श्रद्धा होती. बाबसाहेबांविषयी, त्यांच्या कार्याविषयी ते नेहमीच भरभरून बोलायचे. ‘दाता गरिबांचा’ आणि ‘या बाळांनो, अखेरची ही माझी आज्ञा पाळा’ अशी अजरामर गीते त्यांनी दिली. हे गाणं प्रल्हाद शिंदे यांनी गायलं आणि मी संगीतबद्ध केलं होतं. त्यांना हे गाणं खूप आवडायचं. हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिलेले मी पाहिले आहेत. त्यासाठी ते नेहमी कौतुक करायचे. त्याशिवाय ‘हे खरंच आहे खरं, श्री भीमराव रामजी आंबेडकर’, ‘कोणी नाही भिमासारखा’, ‘भीमरायचा मळा’, ‘कोहिनूर भारताचा’ ही अजरामर गीते आजही भीम अनुयायांच्या ओठावर आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळतात. याशिवाय त्यांचं जांभूळ आख्यान यांसारख्या कार्यक्रमांतून त्यांनी आपली परंपरा जपून लोकांमध्ये समाजप्रबोधनासह जागृती करण्याचा प्रयत्नही केला.
प्रल्हाद शिंदे गेल्यानंतर ते माझ्या घरी आले होते. त्यावेळी मला व त्यांनाही दादांची खूप आठवण झाली. मी त्यांना माझ्याकडून त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन दिले. त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी त्यांचा मुलगा संदेशला सांगितले की, मला आनंदने घेतलेले कपडे काढून दे. हेच कपडे घालून ते त्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि योगायोग बघा तिथेच त्यांनी अखेरचा जयभीम केला. कुणालाही हेवा वाटावा असा त्यांना मृत्यू आला. त्यांची आंबेडकरांवरील निष्ठा वाखाणण्याजोगी होती. आपल्या मृत्यूनंतर जिथे बाबासाहेबांचा अखेरचा विधी झाला त्याच ठिकाणी आपलाही करावा, अशी त्यांची अखेरची इच्छा होती. ती त्यांच्या मुलांनी पूर्णदेखील केली. असे गुणी कलावंत, भीम अनुयायी यांच्या सान्निध्यात मलाही राहता आलं, गाता आलं, कार्यक्रम घेता आले त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.