Abhijeet Kelkar on Pushkar Jog News: मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग सध्या चांगलाच चर्चेत आहे. पुष्करने काहीच दिवसांपुर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल विधान केल्याने बराच वाद झाला. पुष्करवर चहूबाजूंनी टिका झाली.
अखेर या विधानाबद्दल पुष्करने माफीही मागितली. अशातच बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत केळकरने पुष्करच्या विधानाबद्दल त्याला सोशल मीडियावर एक पत्र लिहीलंय. यामध्ये पुष्करच्या विधानाबद्दल अभिजीतने त्याचे चांगलेच कान टोचले आहेत.
(actor abhijeet kelkar slam pushkar jog for his controversial bmc workers statement)
अभिजीतने सोशल मीडियावर पत्र लिहिलंय की,
प्रिय मित्र पुष्कर जोग यांस,
मित्रा,तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली,ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच...मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे,माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती...तिच्याबरोबर,तिला, तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे,मदत केली आहे...उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात,वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं,दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात,ते काही त्यांच्या मनातले नसतात...तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात...
अभिजीत पुढे लिहीतो,
१. घरी आलेल्या अश्या कर्मचाऱ्यांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल?ते सरकारी कर्मचारी आहेत,ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटलं नसेल?
२. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा?अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी?जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी,किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते,कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?
३. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे,सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल?(मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे)गेला बाजार,त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील?हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच,मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?
४. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस?तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?
अभिजीत शेवटी लिहीतो,
आपण कलाकार आहोत,लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात,आपलं बोलणं , वागणं फॉलो करतात,त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे...मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं,रागही आला...तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही...ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील...तुझा मित्र/शुभचिंतक
पुष्करने माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला, असं म्हणता येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.