Anand Shinde Sakal
मनोरंजन

तीन ‘ए’क्क्यांची कोंबडी पळाली!

आनंद शिंदे

सोसायटीच्या गार्डनमध्ये अचानक दोन तरुण मुलं भेटली. आम्हाला एका चित्रपटाचं गाणं तुमच्या आवाजात करायची इच्छा आहे, असं म्हणाले. ते होते आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल. मला दौऱ्यावर जायचे असल्याने महिन्याने गाणं रेकॉर्ड करू, असा शब्द दिला. माझा दौरा दोन महिन्यांनी संपला. परतल्यानंतर अजय-अतुल यांच्यासोबत गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. त्या गाण्यानं मराठी इंडस्ट्रीमध्ये नवा इतिहास रचला. ते होतं ‘जत्रा’मधील ‘कोंबडी पळाली’ गाणं...

‘नवीन पोपट’ने जगभरात धुमाकूळ घातला. सुपरहिटचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवे विक्रम रचले आणि अखेर बॉलीवूडला त्या गाण्याची भुरळ पडली. तेव्हा महागायक किशोर कुमार यांनी तेच गाणं हिंदीमध्ये चंकी पांडेसाठी ‘मै तेरा तोता - तू मेरी मैना’ म्हणत गायले. या मराठी गाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीला मराठी गाण्याची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर कैक वर्षांनी करण जोहर यांना ‘अग्निपथ’साठी अशाच एका मराठी गाण्याने भुरळ पडली आणि ते गाणं होतं, ‘कोंबडी पळाली.’ ते मराठी ‘जत्रा’ चित्रपटात आलं आणि माझ्या कारकिर्दीला पुन्हा झळाळी मिळाली.

‘कोंबडी पळाली’ या गाण्यानेही बॉलीवूडला दखल घेण्यास भाग पाळले. मला पुन्हा नव्या पिढीतील नव्या दमाच्या प्रेक्षकांचे अफाट प्रेम लाभले. या गाण्याच्या यशाचे श्रेय मी अजय-अतुल या नव्या दमाच्या वेगळ्या दृष्टिकोनातून मराठी संगीतविश्वाला भव्यता आणणाऱ्या संगीतकार जोडीला देतो.

‘काखेत कळसा अन्‌ गावाला वळसा’ असे काहीसे या ‘कोंबडी पळाली’बद्दल झाले. एके दिवशी मी मुंबईतील ओशिवरामधील माझ्या घराच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये वॉकिंग करत होतो. अचानक दोन तरुण मुलं येऊन मला भेटली. ‘‘आनंदजी, आम्ही तुम्हाला कुठे कुठे शोधलं, तुमचा नंबरही कुणाकडे सापडला नाही. मागील सात-आठ महिन्यांपासून तुम्हाला आम्ही शोधतोय आणि तुम्ही अचानक आज इथे भेटलात. आपण तर एकमेकांचे शेजारी निघालोत. आम्हाला एका मराठी चित्रपटाचं गाणं तुमच्या आवाजात करायची इच्छा आहे.’’ ते दोन युवा तरुण होते अजय आणि अतुल.

दुसऱ्या दिवशी मी नागपूरच्या दौऱ्याला जाणार होतो. त्यांना सांगितलं, ‘‘एक महिन्याने दौरा संपवून परत आलो की आल्या आल्या तुमचं गाणं रेकॉर्ड करू.’’ असा शब्द दिला; पण माझं येणं दौऱ्यातील कार्यक्रमाच्या तारखा वाढल्याने लांबलं आणि मला मुंबईत परतायला उशीर झाला. तोपर्यंत त्यांचा मॅनेजर कैकदा घरी येऊन गेला. दोन महिन्यांनी दौरा संपवून मी मुंबईत परतलो. सकाळी गोरेगावच्या घरी आलो आणि लागलीच दुपारी अजय-अतुल यांच्यासोबत रेकॉर्डिंगला निघालो. अर्ध्या तासात ‘कोंबडी पळाली’ गाणं गाऊन आम्ही नंतर तीन तास गप्पा मारत बसलो.

खरंतर मला या दोघांचा स्वभावच प्रचंड आवडला. माझ्यासारखेच संगीताचं वेड असलेले, शास्त्रीय संगीत न शिकूनही संगीताची जाण, उत्तम अभ्यास असलेले अवलिये संगीतकार मी पाहिले. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनात ‘जत्रा’मध्ये भरत जाधव, क्रांती रेडकर यांच्यावर चित्रित केलेलं, प्रियदर्शन जाधव आणि जितेंद्र जोशी यांचं या ‘कोंबडी पळाली’ या गाण्याला लाभलेलं लिखाण आणि वैशाली सामंत यांचा भन्नाट आवाज या सर्वांचे श्रम कौतुक करण्यासारखेच आहेत. अशी नव्या दमाची मंडळी या गाण्याला लाभली आणि कोंबडी पळालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये नवा इतिहास रचला.

त्यानंतर अजय-अतुल यांच्यासाठी मी ‘ऑक्सिजन जीव गुदमरतोय’ या चित्रपटासाठी ‘तुरू तुरू चालू नको’ हे गाणं गायलं, तेही महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. अजय-अतुल यांचे चित्रपट आणि माझं त्यात एक तरी गाणं, हे समीकरण सुरू झालं; पण खरे एक्स्पेरिमेंट पुढे झाले. माझ्या आवाजामध्ये वेगळेपण सादर करण्याचा अट्टहास यशस्वीरीत्या अजय-अतुलने करून दाखवला. चित्रपट होता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजीव पाटील दग्दर्शित ‘जोगवा’. अजयने कॉल केला आणि मला घरी बोलवून घेतलं. ‘रिकामी सांजेची घागर’ हे मनाचं ठाव घेणारं गाणं ऐकवलं. त्यानंतर ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगूर... ललाटी भंडार’ हे गाणं ऐकवलं. मी अजयभाऊला म्हटलं, ‘ललाटी भंडार’ हे मी गातो. तेव्हा अजय- अतुल बोलले, ‘‘दादा हे तुमच्या स्टाईलचं गाणं आहे आणि तुम्ही हे मस्तच गाऊ शकाल; पण आम्हाला प्रेक्षकांना तुमच्या आवाजाची वेगळी बाजू दाखवायची, म्हणून आम्हाला तुमच्या आवाजात ‘रिकामी सांजेची घागर’ हे वेगळं गाणं करायचं आहे.

मीही ते गीत गातो म्हणत, गाऊन मोकळा झालो; पण माझा जीव ‘ललाटी भंडार’वर होता... आणि जेव्हा ‘जोगवा’ चित्रपट आला आणि ‘रिकामी सांजेची घागर’ आम्ही प्रीमियरमध्ये सर्वांसोबत पाहिलं आणि मी स्तब्ध झालो. मनातल्या मनात अजय-अतुल या माझ्या भावांचे, त्यांच्या दूरदृष्टीचे आभार मानले. प्रीमियर संपला आणि माझे बंधू अभिनेते मकरंद अनासपुरे मला येऊन भेटले आणि मिठी मारत म्हणाले, ‘‘दादा, प्रल्हादचा आवाज लावलात आपण. अंगावर काटा आला,’’ म्हणत कौतुक केले. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची गाणी संगीतकार माझ्याकडून गाऊन घेऊ लागले. याचं श्रेय मी अजयभाऊ आणि अतुलभाऊ यांनाच देतो. अजय-अतुल लाईव्ह करत असताना हसतखेळत, रमत-गमत, मज्जा करत महाराष्ट्रभर कार्यक्रम केले. अजयभाऊ, अतुलभाऊ यांच्याकडून बरंच काही शिकलो.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT