माझी लोकगीतं एकीकडे हिट होत होती. लोक त्या गाण्यांवर ठेका धरून नाचत होते. लग्न, वरात, बारशात, मेळ्यात, जत्रेत, महाराष्ट्रातल्या गावागावांत, खेड्यापाड्यांत गाणी वाजत होती, गाजत होती.
माझी लोकगीतं एकीकडे हिट होत होती. लोक त्या गाण्यांवर ठेका धरून नाचत होते. लग्न, वरात, बारशात, मेळ्यात, जत्रेत, महाराष्ट्रातल्या गावागावांत, खेड्यापाड्यांत गाणी वाजत होती, गाजत होती. पण काही माझ्या गाण्यांवर टीकाही करत होते... मी कधीच टीकेला महत्त्व देत नाही. माझ्यासाठी माझा रसिक प्रेक्षक मायबाप आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेवून, रसिक माझ्या मुलांच्या गाण्यांना तेवढाच भरभरून प्रतिसाद देतोय, हे पाहून अत्यंत समाधान वाटते.
उभ्या महाराष्ट्राला ‘नवीन पोपट’ने वेड लावलं होतं. लहान-मोठे, वयोवृद्ध सारेच भारावून गेले होते, तरीही ज्याप्रमाणे दादा कोंडके यांचे चित्रपट जसे हिट झाले तरी अनेकांनी त्यातील संवाद द्वयाअर्थी असल्याचा शिक्का मारून त्या चित्रपटांवर टीका केली. अशीच काही बोंब माझ्याही लोकगीतांबद्दल काहींनी ठोकली, गाण्यांना विरोध केला होता.
काहींनी टीकेची झोड उठवली होती, मात्र त्यापेक्षा दहा पटीने महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करत होता. आंटीची घंटी, झुंबड झुंबड, झाली एकदम दोन पोरं, गोट्या, जोडीनं फिराया जाऊ, काढूया कॅलेंडर, ढोलक वाजत, लावला रताळं आलं केलं, पोर लय बारीक, सोटा कुठं हाय गं, केसा मंदी गजरासह कैक गाणी एकामागून एक जशी येत होती, तसतशी ती सुपरहिट होत होती. मग मला विचार पडायचा गाणी तर हिट होत आहेत, लोक त्या गाण्यांवर ठेका धरून नाचत आहेत. लग्न, वरात, बारशात, मेळ्यात, जत्रेत, महाराष्ट्रातल्या गावागावांत, खेड्यापाड्यांत गाणी वाजत होती, गाजत होती. मग ही माणसं कोण होती, ज्यांना गाणी माहिती होती, त्यांच्यावर ते नाचतही असत, मात्र त्यातीलचं काही माझ्या गाण्यावर टीका करत होते? फक्त गावातल्या माणसांना नाही तर आगरी-कोळी बांधवांनाही माझी ही लोकगीतं फार आवडायची. आजही जेव्हा मी कार्यक्रम करतो, तेव्हा त्यांना माझं लोकगीत हवंच असतं. त्याशिवाय कार्यक्रम संपत नाही. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान ही गाणी गाण्यांची मागणी माझ्यापर्यंत पोहोचत असते.
आतापर्यंत मी पाच हजारांच्या वर लोकगीतं गायली आहेत. आजही १८ वर्षांच्या नवतरुण हिरो, प्रथमेश परबवर शूट केलेले ‘आपला हात जगन्नाथ’ या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि सुपरहिट केलं. माझं वय जरी आज साठ झालं असलं तरीही माझा आवाज आजही अठरा वर्षांच्या तरुणासारखा मी जपला आहे.
उडती गाणी असली की संगीतकार कायम माझा विचार करतात. सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव हे या पिढीचे तरुण कलाकार मला आवडतात. मला आश्चर्य होतं जेव्हा ते मला माझी जुन्यातील जुनी लोकगीतं सांगतात, तेव्हा आपल्या गायणाचे चीज झाले, असे मी मानतो. लोकगीत आणि त्यांचा अर्थ मुखड्यातच स्पष्ट होत असतो.
मराठी भाषा वळवाल तशी वळते, तुम्ही तिचा अर्थ कसा घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. कवी-गीतकार हा तर अर्थपूर्णच लिहितो. मग तुम्ही त्या नाण्याची कोणती बाजू बघता, काटा की छापा हे तर बघणाऱ्यावर अवलंबून आहे. काहींना वरण-भात आवडतो तर काहींना तांबडा-पांढरा रसा, काहींना पुलाव तर काहींना बिर्याणी आवडते. मी तर माझ्या परीने माझ्या वाटेला आलेली सगळीच गाणी नीट आणि फिट गातो आणि प्रेक्षक ते हिट करतात. ‘पोपट फेम’ हे नावही महाराष्ट्रानेच प्रेमाने मला दिले आहे आणि मला हे आवर्जून सांगायचे आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेले पहिलेच लोकगीत असेल.
महाराष्ट्र माझ्या आवाजावर प्रेम करतोच; पण त्यातही विशेष माझ्या उडत्या गाण्यांचे ते दिवाने आहेत. म्हणून मी कधीच माझ्या गाण्याबद्दल होणाऱ्या टीकेला कधीच महत्त्व देत नाही. माझ्यासाठी माझा रसिक प्रेक्षक मायबाप आहे. कायम सकारात्मक विचाराने मी माझा प्रवास सुरू ठेवला आणि जिवंत असेपर्यंत सुरूच राहील.
बॉलीवूडलादेखील मराठी लोकगीताने भुरळ घातली. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या हंटर फिल्मसाठी मी ‘ये ना गडे’ हे गाणं गायलं, ते लोकगीतच होतं. सलील कुलकर्णीने संगीतबद्ध केलेलं उडू उडू झालया, मी गायलेले हे गाणे सुपरहिट झालेच, मात्र टिकटॉक, इन्स्टाग्राम, रिल्सवरची त्या गाण्याने धुमाकूळ घातला. आता त्याच नावाने एक मराठी सीरियल सुरू आहे.
माझ्या लोकसंगीत आणि उडत्या चालींच्या गायनाचा वारसा माझी मुलं जपत आहेत. ते लोकगीते आणि उडत्या चालींची गाणी गातात, ती प्रचंड तुफान लोकप्रियही होत आहेत. उत्कर्षची ‘बस माझ्या बुलेटवर, राणी तुला फिरवतो आणि नाद करा पण आमचा कुठे, हे ‘धुरळा‘ फिल्मचे उत्कर्ष याने लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले गाणे चांगलेच गाजतेय. आदर्शने पहिले लोकगीत गायले होते ते म्हणजे भाजी वाली बाई. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे, ही आदर्शची गाणी सुपरहिट आहेत. मुळशी पॅटर्नचे आररा रारा, भाईचा बड्डे ही त्याच्या उडत्या चालीची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. माझ्या पावलावर पाऊल ठेवून, माझ्या हयातीतच महाराष्ट्राचा रसिक प्रेक्षक माझ्या मुलांच्या गाण्यांना तेवढाच भरभरून प्रतिसाद देतोय, हे पाहून अत्यंत समाधान वाटते. माझा लोकगीतांचा वारसा ते जपतील यात शंका नाही.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.