The Art Of Watching Movie : चित्रपट हे दृश्य स्वरूपात कथा सांगण्याचे तंत्र आहे. कॅमेरा जसा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो त्याचप्रमाणे प्रकाशाचा वापर चित्रपटातील प्रसंगानुसार अनेक प्रकारे केला जातो.
दंगल चित्रपटात महावीर सिंग (आमीर खान) या पैलवानाला चार मुली झाल्यावर आपल्या मुलाला पैलवान बनवण्याचे त्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही, असा समज करून घेतल्यामुळे तो निराश मनाने हॉस्पिटलमधून घरी येतो. हॉस्पिटलमध्ये अनेक ट्यूबलाइटचा लख्ख प्रकाश आहे. ‘ताऊजी’ घरी येतात आणि भिंतीवर लावलेली स्वतः जिंकलेली पदके काढून टाकतात.
त्यावेळी हरियाणामधील एका गावातल्या घरातल्या भिंतीवर एका ट्यूबलाइटचा जेवढा प्रकाश पडेल तेवढाच आपल्याला दिसतो, त्यामुळे निराशाजनक वातावरण जाणवते. स्वयंपाकघरात ‘ताऊजीं’ची बायको स्वयंपाक करते आहे, तिथे चुलीमध्ये पेटवलेल्या लाकडाचा प्रकाश दिसतो. आमीर खानच्या अर्ध्या चेहऱ्यावर नैसर्गिक अंधार दिसतो.
एकूणच चित्रपटात हरियाणातील पहाट, दिवस -संध्याकाळचा वेगवेगळा प्रकाश, गावातल्या वेगवेगळ्या खोल्यांमधील बल्ब-ट्युबलाइटचे प्रकाश-अंधार त्या सर्व प्रसंगाची परिणामकारकता वाढवतात.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
अर्धसत्य चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर अंधार दिसतो, मग त्या काळ्या पडद्यावर पांढऱ्या रंगाची एक उभी पट्टी दिसते. त्यानंतर दुसरी पट्टी दिसते आणि हळूहळू त्यामधून सबइन्स्पेक्टर अनंत वेलणकरचे (ओम पुरी) एक चित्र तयार होते. हा अंधारामधून प्रकाशाचा खेळ चित्रपटातील अनेक प्रसंगांचे गांभीर्य वाढवतो. मुंबईत राहणाऱ्या अनंत वेलणकरला व्यायाम करणारा एक युवक गॅलरीमधून दिसतो, त्याचवेळी त्याला आपले लहानपण आठवते.
नदीकाठी मुलाकडून व्यायाम करून घेणारा फौजदार वेलणकर (अमरीश पुरी) दिसताच प्रकाश योजना बदलते. प्रसंगाची वातावरण निर्मिती करण्यात/बदलण्यात रंगाप्रमाणे प्रकाश योजना महत्त्वाची असते.
चित्रपट हे दृश्य स्वरूपात कथा सांगण्याचे तंत्र आहे. कॅमेरा जसा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो त्याचप्रमाणे प्रकाशाचा वापर चित्रपटातील प्रसंगानुसार अनेक प्रकारे केला जातो. मराठी-हिंदीमधील टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकेतील कोणताही शॉट बघितल्यास तुम्हाला सगळीकडे लख्ख प्रकाश दिसतो.
अशा प्रकाशात सावल्या दिसत नाहीत, चेहऱ्यावर पूर्णपणे प्रकाश टाकलेला असतो, डायनिंग टेबल असो, हॉल असो वा बेडरूम, प्रखर प्रकाशात सगळेच सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. सावळ्या रंगाची व्यक्तिरेखा ही कथेची गरज असेल तर सावळ्या रंगाचे पात्र न निवडता उजळ रंगाच्या पात्राची निवड करून तिच्या चेहऱ्यावर सावळ्या रंगाचा मेकअप केला जातो. याउलट अंधार- प्रकाशाचा नेमका वापर कसा केला आहे, याची उदाहरणे अनेक चित्रपटात दिसतात.
कल के अंधेरो से निकल के, देखा हैं आंखे मलते मलते असे स्वतःचे मनोगत रोझी मार्को (वहिदा रेहमान) लता मंगेशकर यांच्या आवाजात गाइड चित्रपटात व्यक्त करते त्यावेळी चित्तोडगढच्या पद्मिनी पॅलेसमध्ये खालच्या मजल्यावरील अंधारामधून वरच्या मजल्यावरील आरसा दाखवण्याची कल्पना दिग्दर्शक विजय आनंद यांनी फली मिस्त्री यांना सुचवली.
राणी पद्मिनीला आरशामधून बघण्याच्या ऐतिहासिक कथेचे संदर्भ या दृश्याला आहेत. हीच ओळ दुसऱ्या वेळी गायली जाते त्यावेळी कॅमेरा अंधारामधून वरच्या खिडकीमधून खालच्या बाजूला उजेडात उभ्या असलेल्या वहिदाकडे फिरवला आहे. कारण, आज फिर जीने की तमन्ना है!
चित्रपट तयार करणे हे उत्तम टीमवर्कचे उदाहरण आहे. सिनेमॅटोग्राफर चित्रपट दिग्दर्शकाच्या ‘व्हिजन’नुसार काम करत असतो. सिनेमॅटोग्राफरच्या टीममध्ये काही कॅमेरामन असतात. काही सिनेमॅटोग्राफर आजही एकच कॅमेरा वापरण्यास प्राधान्य देत असले तरी आता एकच दृश्य चित्रित करण्यासाठी दोन ते पाच कॅमेऱ्यांचा वापर केला जातो.
त्यापैकी कोणते दृश्य चित्रपटात वापरावे याचा निर्णय संकलक मागच्या-पुढच्या दृश्याच्या संदर्भाने घेत असतो. प्रकाश किती असावा? कसा असावा? याचा निर्णय मुख्यतः सिनेमॅटोग्राफर आणि कॅमेरामन घेतात आणि इलेक्ट्रिशियनला त्यानुसार सूचना देतात.
प्रकाशाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. नैसर्गिक प्रकाश आणि आर्टिफिशियल – कृत्रिम प्रकाशयोजना. तेरे मेरे सपने अब एक रंग है या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी गाइड चित्रपटाच्या दिग्दर्शकाला – विजय आनंदला – संध्याकाळच्या नैसर्गिक प्रकाशाचाच वापर करायचा होता. ठरलेल्या वेळेत तो शॉट पूर्ण झाला नसता तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तशाच प्रकाशाची वाट बघून शूटिंग करावे लागले असते.
या चार मिनिटांच्या गाण्यामध्ये फक्त दोन कट आहेत आणि सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री यांनी फक्त तीन शॉटमध्ये शूट केलेल्या या गाण्याच्या शेवटच्या कडव्याच्या अखेरीस वहिदाच्या खांद्यावर हात ठेवताना देव आनंद कदाचित घड्याळाकडे बघून शॉट अंधार पडण्यापूर्वी वेळेत संपला आहे याची खातरजमा तर करत नाहीना, असे वाटते. शोले चित्रपटात जय (अमिताभ बच्चन) माउथ ऑर्गन वाजवत पायरीवर बसला आहे त्याचवेळी राधा (जया भादुरी) दिवे मालवत आहे. या प्रसंगाच्यावेळी संध्याकाळचा प्रकाश असणे गरजेचे होते, तसा नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी तसा प्रकाश येईपर्यंत त्या शॉटचे शूटिंग थांबवले होते.
लगान चित्रपटाच्या सुरुवातीला अमिताभच्या आवाजात आपल्याला ऐकू येते, ‘हे चंपानेर गाव आहे आणि १८९३ साली इंग्रज राजा-महाराजांतर्फे ‘लगान’ वसूल करायचे. गेल्या वर्षी पाऊस पडला होता पण या वर्षी अजून पाऊस पडलेला नाही.’ हे वाक्य ऐकताच कॅमेरा कोरड्या जमिनीवरून त्या जमिनीवर उभ्या असलेल्या आकाशाकडे बघणाऱ्या यशोदा माईंच्या (सुहासिनी मुळ्ये) चेहऱ्यावर वरच्या बाजूने फिरतो. ‘सुखी आंखे आसमान टटोल रही है।’ त्याचवेळी माईंची सावली दिसते. सावलीमुळे उन्हाचा रखरखीतपणा प्रेक्षकांना जाणवतो.
माईंनी ढगाकडे बघताना उन्हे चेहऱ्यावर पडू नयेत म्हणून डोळ्यावर हाताची सावली पडेल असा हात ठेवला आहे. अशाच सावल्या घनन घनन घन गाण्याच्यावेळी सर्वजण नृत्य करतात त्यावेळीही दिसतात. ढगांच्या नैसर्गिक प्रकाशाचा परिणाम साधण्यासाठी सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता यांनी ढगांची वाट पाहणे पसंत केले, त्यामुळेच हे दृश्य परिणामकारक ठरले आहे. चित्रपटाच्या शेवटी पाऊस आलेला आहे. तो मात्र दिवसा शूट करून त्यावर पोस्ट प्रॉडक्शन प्रोसेसिंगमध्ये आवश्यक परिणाम साधला आहे.
दिवसाच्या चोवीस तासांमध्ये आपण वेगवेगळ्या वेळेला प्रकाशाचे अनेक प्रकार बघतो. भाभी की चुडीया चित्रपटात घराबाहेर अंधार दिसतो, दाराशेजारच्या दोन खिडक्यांमधून हलका धुरकट प्रकाश पडल्याचे दिसते आणि गीता (मीनाकुमारी) घराचा दरवाजा उघडते त्यावेळी दरवाजामधून प्रकाशाचा हलका झोत येतो तेव्हा घराबाहेरील धुके प्रकाशमान झाल्याचे दिसते. पहाटेची वेळ असल्याचे आपल्याला दिसते.
उगवत्या सूर्याला नमस्कार करून लता मंगेशकर यांचे स्वर ऐकू येतात ज्योती कलश छलके. अजूनही नायिका मीनाकुमारीचा चेहरा दिसत नाही. गाण्याचा मुखडा दुसऱ्या वेळी गायला जातो त्यावेळी प्रकाश थोडा वाढत राहतो. झाडाच्या पाठीमागून सूर्याचे किरण दिसतात आणि त्या पार्श्वभूमीवर मीनाकुमारीचा चेहरा दिसतो. शेणाचा सडा टाकून त्यावर नायिका रांगोळी काढते, तुळशीला फेऱ्या मारून कृष्णाची पूजा केल्यानंतर ती चूल सारवते,
त्यावेळी खिडकीच्या गजामधून प्रकाशाची किरणे घरामध्ये पडल्याचे दिसते. सिनेमॅटोग्राफर अरविंद लाड यांनी अनेक बारकाव्यांचा विचार करून स्टुडिओमधील सेटवर कृत्रिम प्रकाशयोजनेद्वारे नैसर्गिक प्रकाश योजनेचा आभास १९६१ साली निर्माण केला हे कौतुकास्पद आहे. मेरी सुरत तेरी आंखे (१९६३) चित्रपटातील पुछो ना कैसे मैने रेन बिताई या गाण्यामध्ये घराच्या छतामधून सूर्याचा प्रकाश भिंतीवर पडल्याचे दिसते.
सूर्य उगवण्यापूर्वीचा प्रकाश, उगवता सूर्य, मावळता सूर्य अशा वेळा प्रसंगाचा मूड पकडण्यासाठी उत्तम असल्यामुळे अनेक प्रसंगामध्ये त्याचा वापर केल्याचे दिसते. प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहें मेरी या परिंदा चित्रपटातील गाण्यामध्ये सूर्यास्त झाल्यानंतरच्या प्रकाशाने पडदा व्यापलेला आहे.
तिला सोडून जाणाऱ्या नायक करणच्या (अनिल कपूर) दृश्यामधून पारोची (माधुरी दीक्षित) केशरी रंगाची ओढणी सायंकाळच्या प्रकाशाच्या रंगाशी नाते सांगणारी आहे. समुद्र किनाऱ्यावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताच्या दृश्याच्या पार्श्वभूमीवर त्या दोघांच्या चेहऱ्यावर पडणारी संध्याकाळच्या प्रकाशाची किरणे समयोचित आहेत.
गाण्याच्या शेवटी काळ्या रंगाच्या कपड्यातील नायक नायिकेला सोडून काळ्या रंगाच्या कारमधून निघून जातो त्यावेळी दुःखी नायिकेच्या मागे अस्ताला गेलेल्या सूर्याची झलक दिसते. (सिनेमॅटोग्राफर – विनोद प्रधान)
प्रत्येक प्रकाशाचा रंग वेगळा असतो. पहाटे आणि संध्याकाळी पिवळ्या-केशरी रंगांच्या छटा दिसतात, दिवसा उजेडी उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या आणि पावसाळ्यात निळ्या रंगांच्या छटा दिसतात. अनेक चित्रपटातील फ्रेममध्ये खिडकीबाहेरून निळ्या रंगांच्या छटा घरात येताना दिसतात, परंतु घरामध्ये टंगस्टन/ पिवळ्या रंगाच्या छटांचा वापर केल्याचे दिसते.
लगान चित्रपटात ओ पालन हारे गाण्यामध्ये देवळामध्ये लावल्या जाणाऱ्या ज्योतीचा प्रकाश सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतो परंतु एकाच बाजूने प्रकाश टाकल्यामुळे अर्धे चेहरे झाकोळलेले दिसतात. चित्रपटाचा रंग मातकट असला तरी या गाण्यामध्ये टंगस्टन लाईट/ पिवळसर रंगाचा प्रकाश अंधारामध्ये दिसतो.
माचिस चित्रपटातील पानी पानी रे, खारे पानी रे या गाण्यामध्ये विरेंदर कौर (तब्बू) बर्फाळ प्रदेशात घराबाहेर उभी आहे. तिथे चंद्राचा प्रकाश बर्फावरून परावर्तित झाला आहे, त्यामुळे निळसर पांढरा आहे परंतु तिच्या घरामध्ये पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसतो. अंधार आणि प्रकाशाचा वापर या गाण्यामध्ये उत्तमरित्या केला आहे, त्यामुळेच तब्बूच्या अर्ध्या चेहऱ्यावर रात्रीचा प्रकाश दिसतो (सिनेमॅटोग्राफर – मनमोहन सिंग).
आगीचा प्रकाश वेगळा परिणाम साधण्यासाठी वापरला जातो. अंधारामध्ये गोलाकार बसून मध्यावर पेटवलेल्या शेकोटीभोवती गाणी गायल्याचे बरेच प्रसंग आहेत. बॉबी चित्रपटामध्ये बॉबीचा (डिम्पल कपाडिया) पाठलाग करताना काश्मीरला पोहोचलेल्या राजला (ऋषी कपूर) अनेकांनी मारलेले असल्यामुळे घायाळ झालेला ऋषी कपूर दिसताच एक गाणे ऐकू येते, ...
पर प्यार भरा दिल कभी न तोडो, जिस दिल में दिलबर रहेता... संध्याकाळच्या प्रकाशामधून हळूहळू रात्रीचा अंधार होतो. आग से इश्क बराबर दोनो हे कडवे सुरू होताच शेकोटीच्या भोवती बसलेले गायक नरेंद्र चंचल आणि वादक पिवळ्या प्रकाशात दिसतात. ऋषी कपूर शेकोटीसमोर बसलेला दिसतो. त्यावेळी समोरून पिवळा प्रकाश दिसतो, मागच्या बाजूला असलेल्या तंबूमधून निळा प्रकाश दाखवला आहे.
नैसर्गिक - कृत्रिम प्रकाश योजना आणि त्यामधील वैविध्याबद्दल पुढील लेखामध्ये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.