Avatar The Way Of Water Review 
मनोरंजन

Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

जबरदस्त डिटेलिंग... हा अवतारचा एक मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. तुम्ही जे काही पडद्यावर पाहता आहात हे सत्यच आहे असं तुम्ही ठाम विश्वासानं म्हणू लागता.

युगंधर ताजणे

Avatar The Way Of Water Review: अवतार पाहायला जाताय तर भलेही तुम्हाला तिकिटाचे दर जास्त दिसतील, तेव्हा प्रश्न पडेल की एवढे पैसे खर्च करुन हा चित्रपट पाहावा की नाही, पण एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते ती म्हणजे बिनधास्तपणे हा चित्रपट पाहायला जा. दुसरं म्हणजे तुमचे तिकिट कितीही रुपयांचे का असेना हा चित्रपट तुम्हाला खूश केल्याशिवाय राहणार नाही. अवतार तुम्हाला रंगवून, गुंगवून ठेवण्यात शंभर टक्के यशस्वी झाला आहे.

आपल्याकडे खिरापतीसारखे चित्रपट प्रदर्शित होतात. एकाच चित्रपटाचा सिक्वेल हा फार तर तीन ते चार वर्षांनी येतो. मात्र दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी तब्बल तेरा वर्षांनी अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एवढी वर्षे कॅमेरुन यांनी का घेतली याचे उत्तर तुम्हाला अवतार पाहिल्यानंतर नक्की भेटेल. आणि तुम्हीही म्हणाल दिग्दर्शकाच्या मेहनतीला रंग आला आहे. त्यांनी केलेले कष्ट एवढे कमालीचे प्रभावी आहेत की तुम्ही सव्वा तीन तास मोठ्या पडद्यासमोरुन हालणार नाही. आपल्यासारखी माणसं स्क्रीनवर दिसत नसताना एका वेगळ्याच जगाचे साक्षीदार आपण होऊन जातो आणि त्यात मनसोक्त मुशाफिरी करु लागतो.

जबरदस्त डिटेलिंग... हा अवतारचा एक मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. तुम्ही जे काही पडद्यावर पाहता आहात हे सत्यच आहे असं तुम्ही ठाम विश्वासानं म्हणू लागता.एव्हाना कॅमेरुन तुम्हाला तसे म्हणायला लावतातच. त्यात कोणतीही बळजबरी नाही. तुम्ही अवतारला ग्रेट म्हणू लागता. त्याचे कारण त्यातील त्या कथेतील जिवंतपणा, संवेदनशीलता दिग्दर्शकानं शेवटच्या फ्रेमपर्यत जपून ठेवली आहे. याठिकाणी मागील भागातील कथा आणि या भागातील कथानक यांची तुलना करण्याचा हेतू अजिबात नाही. मुळातच या परिक्षणामध्ये कथानक सांगायचे नाही तर चित्रपट का पाहणं गरजेचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

पहिल्या फ्रेमपासून स्क्रिनचा तो ब्ल्युईश टोन तुमच्या मनाची पकड घेतो ती शेवटच्या फ्रेम पर्यत. आपल्याला पँडोऱ्याची स्वप्नं पडू लागतात. आणि आपण त्या पँडोऱ्यावरचेच आहोत की काय असं वाटू लागतात. कॅमेरुन यांनी पहिल्या भागात देखील कुटूंब, एकत्र कुटूंबाचे महत्व आणि त्याची जबाबदारी या साऱ्या गोष्टींवर मार्मिकपणे भाष्य केले होते. या भागातही त्यानं तो धागा सोडलेला नाही. त्याच सुत्राभोवती अवतार २ चे कथानक फिरताना दिसते. अवतारच्या पहिल्या भागातील कर्नल जिवंत आहे. त्याच्या मनात सलीचा सूड घेण्याची भावना कायम आहे. सलीनं आता पँडोरावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्याचं कुटूंब मोठं आहे. आपल्या कुटूंबाला कुणी इजा पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आहे असे सली निक्षून सांगतो आहे.

कर्नलला काही करुन त्याला मारायचेच आहे. आपल्याच अस्तित्वासाठी आणि पँडोराला धोका झालेल्या सलीला टिपण्यासाठी मोर्चाबांधणी सुरु कर्नलनं केली आहे. हे सगळं कशापद्धतीनं घडतं, सलीला पँडोरा सोडून कुठे जावं लागलं, त्या दरम्यान त्याची आणि त्याच्या कुटूंबाची होणारी होरपळ, त्यांना दुसऱ्या समुहात गेल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरं, यासगळ्यात दिग्दर्शकानं आपल्याला मानवी समुह, संस्कृती, नातेसंबंध, संवाद, भावभावना, हे सारं प्रभावीपणे कॅमेऱ्याच्या मदतीनं टिपलं आहे. पँडोरा हे निसर्गाशी कसे जो़डले गेले आहे हे त्यानं फळं, फुलं, प्राणी आणि समुद्र यांच्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे.

निळाशार समुद्र तीन तास आपली सतत सोबत करत राहतो. त्याची गाज सतत कानात घुमत राहते. वेगवेगळ्य रंगाची, अवाढव्य आकारचे प्राणी त्या महासागरात राहत असतात मात्र त्यांचे तिथे राहणाऱ्या माणसांशी असणारे नाते किती दृढ असते हे आपल्याला अवतार द वे वॉटरमधून दिसून येते. कॅमेरुन यांची कल्पनाशक्ती, त्या कल्पनाशक्तीला त्यांनी दिलेलं सर्जनशीलतेचं वळण पाहून आपण थक्क होऊन जातो. फ्रेमभर पसरलेली निळाई, त्यातील शेकडो माणसं आणि त्यांचा आपले आणि परकीय या व्यवस्थेशी सुरु असलेली लढाई आपल्याला अंतर्मुख करुन जाते.

अवतार द वे ऑफ वॉटर हा काही इतर चित्रपटांसारखा निव्वळ करमणूकीचा चित्रपट नाही तर तो अनुभवण्याचा चित्रपट आहे. ती कलाकृती आपल्याला खूप काही सांगून जाते. तुम्ही हा चित्रपट थ्रीडी मध्ये पाहात असाल तर तो तितक्याच थेटपणे आपल्याला भिडतो. आणखी वेगळ्या फॉरमॅटमध्ये पाहाल तर आपणही तेवढ्याच संवेदनशीलतेनं विचार करु लागतो. अकल्पनीय, अविश्वसनीय, अद्भुत अशा शब्दांमध्ये अवतारचे कौतूक करावे लागेल. ज्या प्रेक्षकांनी अगोदर अवतारचा पहिला भाग पाहिला आहे त्यांना अवतारच्या दुसऱ्या भागाची लिंक लागण्यास फारसा वेळ लागणार नाही. मात्र पहिल्यांदाच अवातरच्या वाट्याला जाणाऱ्यांचीही निराशा होणार नाही याची काळजी दिग्दर्शक कॅमेरुन यांनी घेतली आहे.

तांत्रिक गोष्टीतही अव्वल...

सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, साउंड, एडिटिंग, लाईटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक या साऱ्या पातळ्यांवर अवतार ग्रेट आहे. तो आपल्याला कमालीचा भारावून टाकतो. हे सगळं कसं त्या दिग्दर्शकानं कसं तयार केले असेल, त्यानं कसा विचार केला असेल, हे आपल्याला चक्रावून टाकतं, त्यांची १३ वर्षांची मेहनत काय असते हे या चित्रपटातून दिसून येते. आपण तीन तासांहून अधिक काळ वेगळ्या ग्रहावरची माणसं पाहत आहोत, जे आपल्या अवतीभोवती नाही असं सगळं काल्पनिक असूनही ते खरंच आहे हे पटवून देत तितक्याच प्रभावीपणे पाहायला लावणाऱ्या कॅमेरुन यांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

स्पायडरचा रोल महत्वाचा....

अवतारच्या या भागामध्ये स्पायडरची भूमिका आपल्याला सतत चक्रावून टाकणारी आहे. जसं की राजामौलींच्या बाहुबलीमध्ये कटाप्पानं बाहूबलीला का मारलं असा प्रश्न सातत्यानं ट्रेडिंग होता. तसेच अवतारच्या दुसऱ्या भागामध्ये स्पायडरची भूमिका काय आहे, तो कुणाचा मुलगा आहे आणि शेवटी जो जे करतो ते योग्य की अयोग्य याचे उत्तर दिग्दर्शकानं प्रेक्षकांवर सोडले आहे. मात्र स्पायडरनं एका वेगळ्याच विचार तंद्रीत प्रेक्षकांना सोडून दिलं आहे.

गुंगवून, रंगवून आणि हादरवून टाकणारा अवतार .....

आपल्याला फ्रेम बाय फ्रेम अवतार हा गुंतवून ठेवतो. त्या महाकाय प्राण्यांचे आवाज, त्यांची हालचाल, त्यांच्यावर फिरणारा कॅमेरा, लाईटिंग, आणि थरार हे सारं इतकं प्रभावी आहे की तुम्ही इंटरव्हलनंतर देखील जराही विचलित होत नाही. बऱ्याच दिवसांनंतर एवढया मोठ्या कालावधीचा चित्रपट आला आहे. मात्र प्रेक्षकांना तो कंटाळवाणा न वाटता अधिक उत्कंठावर्धक वाटला आहे.

रेटिंग - 4 \ 5

चित्रपटाचे नाव - अवतार - द वे ऑफ वॉटर

दिग्दर्शक - जेम्स कॅमेरुन

कलाकार - सॅम वॉर्थिंग्टन, जो सल्डाना, सिगरनी वीवर, स्टीफन लँग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT