Aryan Khan Drugs Case: क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्यावर विविध आरोप होत आहेत. यावर प्रतिक्रिया देत अभिनेते विजय आनंद यांनी वानखेडेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. "एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर जर तुम्ही बिनबुडाचे आरोप करत असाल, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मग आपला समाज या लायकीचाच नाही की आपल्याला एखादा प्रामाणिक अधिकारी किंवा नेता मिळू शकेल," अशा शब्दांत त्यांनी फटकारलं.
काय म्हणाले विजय आनंद?
'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विजय आनंद म्हणाले, "तुम्हाला हे माहित असायला हवं की ड्रग्जमुळे संपूर्ण पंजाब उद्ध्वस्त झालंय. २५ वर्षांपूर्वी मुंबईतही पार्ट्यांमध्ये उपस्थित असलेल्या ३० जणांपैकी २८ जण ड्रग्जचं सेवन करायचे. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याने सीमा शुल्क विभागातही दमदार कामगिरी केली होती. सोन्याचं नाणं तर सोडा छोटासा पेंडंट जरी तुम्ही आणलात तरी तेसुद्धा पकडलं जायचं, इतकी त्यांची दहशत होती. सीमा शुल्क विभागानंतर ते आता एनसीबीमध्ये धडाकेबाज कामगिरी करत आहेत. ड्रग्जची घाण ते साफ करत आहेत. मी इथे आर्यन खानबद्दल बोलत नाही. पण तुम्ही त्या अधिकाऱ्याचा विचार करा, जो अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावतोय. अशा अधिकाऱ्यावर जर तुम्ही बिनबुडाचे आरोप करत असाल, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मग आपला समाज या लायकीचाच नाही की आपल्याला एखादा प्रामाणिक अधिकारी किंवा नेता मिळू शकेल. कारण तो प्रामाणिकपणे आपलं काम करतो, त्याची तर तुम्ही किंमत ठेवत नाही."
समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत ते पुढे म्हणाले, "माझी गाडी दुरुस्त करणारा साधा मेकॅनिकही तीन वेळा दुबईला जाऊन आला. तर मग एखाद्या अधिकाऱ्याचा इतका पगार असू शकत नाही का, की तो परदेशवारी करेल. त्याची पत्नी तर मोठी अभिनेत्री आहे. ते जरी दुबईला गेले असले तरी तुम्ही का प्रश्न उपस्थित करत आहात? ते प्रामाणिक नाहीत, ते तुम्ही पुराव्यांसह सिद्ध करून दाखवा, तर मी तुमचं ऐकेन. जर एखादा अधिकारी ड्रग्जची घाण साफ करत असेल तर त्याला त्याचं काम करू द्या."
विजय आनंद हे अभिनेत्री सोनाली खरेचे पती आहेत. अजय देवगण आणि काजोल यांच्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटात विजय आनंद यांनी भूमिका साकारली होती. अलीकडेच ते 'शेरशाह' या चित्रपटात झळकले होते. विजय हे प्रसिद्ध योग प्रशिक्षक असून जगभरात त्यांचे विद्यार्थी आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.