Bollywood News: प्यार का पंचनामा, छलांग, ड्रीमगर्ल अशा काही चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा आता विशाल भानुशाली यांची निर्मिती (Bollywood Movies) आणि जय बसंत सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या जनहित मे जारी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहे. याबद्दल तिच्याशी केलेली बातचीत....
1. जनहित मे जारी या चित्रपटाबद्दल तू काय सांगशील...
- हा चित्रपट खूप मजेशीर आहे. यामध्ये सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. आपल्या समाजात काही गोष्टी अशा असतात की त्या जनतेच्या हिताच्या असतात. परंतु त्यांच्या त्या लक्षात येत नाहीत. मग याच गोष्टी आपण चित्रपटाच्या माध्यमातून दाखविल्या तर लोकांच्या लक्षात राहतात. मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना दाखविल्या तर लगेच पटतात. या चित्रपटात असाच एक छानसा विषय मांडण्यात आला आहे. हा चित्रपट मनोरंजन करणारा आहेच त्याचबरोबर सामाजिक संदेशही देणारा आहे. या चित्रपटात माझे मोठे कुटुंब दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात माझे आई -वडील आणि आम्ही चार भावंडे आहोत. माझ्या व्यक्तिरेखेचे नाव मन्नू आहे. तिचे आई-वडील तिने लग्न करावे असा तगादा लावतात. मात्र ती स्वतःच्या पायावर उभी राहू इच्छिते. त्याप्रमाणे ती सेल्सगर्लचे काम करीत असते. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहते आणि मग ती लग्न करते. लग्नानंतर तिच्या आयुष्यात काही बदल घडतात. त्यानंतर तिच्या नोकरीतही काही बदल घडत जातो आणि ती सेल्सगर्ल म्हणून कंडोम विकण्याचे काम करते आणि फॅमिली प्लॅनिंगबद्दल जनजागृती कशी करते याची मजेशीर कहाणी या चित्रपटात आहे.
2. जनहित मे जारी या चित्रपटाचे सुरुवातीला दिग्दर्शक ओमांग कुमार होते. त्यानंतर जय बसंत सिंग यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घतली. हा बदल कसा
काय झाला....
- कोरोनाच्या अगोदर हा चित्रपट बनविण्यात येणार होता. त्यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमांग कुमार होते. त्यांना एका ठराविक मुदतीत या चित्रपटाचे चित्रीकरण उरकायचे होते. परंतु लाॅकडाऊन लागले आणि आमच्या चित्रपटाचे सगळे शेड्यु्ल्ड गडबडले. त्यामध्ये ओमांग कुमार आणि निर्माते यांनी काय निर्णय घेतला हे काही मला माहीत नाही. त्यामुळे हा बदल कसा झाला हेच समजलेले नाही.
3. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला तेव्हा काही ट्रोलर्सचा सामना तुला करावा लागला. याबद्दल...
- ट्रेलर येण्याच्या अगोदर मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण त्याकडे फारसे लक्ष देत नाही आणि त्यांना मी ट्रोलर्स म्हणणारही नाही. ते त्यांचा विचार किंवा त्यांचे म्हणणे मांडत असतात आणि आपल्या लोकशाहीप्रधान देशात कुणालाही आपले म्हणणे मांडण्याची..आपले मत स्पष्टपणे मांडण्याची मुभा आहे. त्यामुळे त्यांनी आपले मत मांडले. तो त्यांचा हक्क आहे. मी त्यांना उत्तर देताना एक व्हिडीओ टाकला होता. त्यामध्ये मी माझे म्हणणे मांडलेले आहे.
4. या चित्रपटात तुझी मुख्य भूमिका आहे. अलीकडच्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नायिकांचे चित्रपटदेखील शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतात हे सिद्ध झाले आहे. याबाबत तुझे मत काय...
दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा, विद्या बालन आदी नायिकांनी ही सुरुवात केली. निर्माते व दिग्दर्शक यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी तो सिद्ध करून दाखविला. त्यामुळे त्यांची मी सर्वप्रथम आभारी आहे. त्यांच्यामुळेच आता आम्हालाही असे चित्रपट आॅफर होत आहेत. त्याच्याच वारसा आता आम्ही चालवीत आहोत. आता आमचीही जबाबदारी आता खूप वाढलेली आहे.
5. प्यार का पंचनामा, ड्रीमगर्ल, छलांग वगैरे चित्रपट तू केले आहेस. या चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर उत्तम कमाई केली आहे. या चित्रपटामुळे तुला अधिक लोकप्रियता मिळाली आहे. या स्टारडमबद्दल तू काय सांगशील...
-स्टारडम काय असते हे मला काही माहीत नाही. मला असे वाटते की चित्रपट हा स्टारपेक्षा मोठा असतो आणि चित्रपट चालला तर स्टार घडतो. त्यामुळे चित्रपट हा स्टार आहे. मी त्याचा एक हिस्सा आहे. मी केवळ चांगले चित्रपट करते आणि माझे काम चोख व प्रामाणिकपणे करते. माझ्या चित्रपटातील कामाला लोकांनी पसंती दिली आहे...माझ्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि यापुढेही उत्तमोत्तम चित्रपट करून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण लोकांनी आपल्या कामाचे कौतुक केल्यानंतर आपलीही जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि त्याचे भान ठेवूनच मी अधिकाधिक चांगले चित्रपट करणार आहे.
6. तुझ्या बहुतेक चित्रपटांतून सामाजिक संदेश दिलेला असतो. त्यामुळे तुला लेडी आयुषमान म्हटले जाते हे खरे आहे ना...
- त्याचा मला निश्चितच आनंद होतो. माझ्यासाठी ही सगळ्याचे बेस्ट काॅप्लिमेंटस आहे. कारण लोकांनी माझी तुलना माझ्या आवडत्या कलाकाराबरोबर केली आहे. आयुषमान खुराना हा माझा सगळ्यात आवडता कलाकार आहे. त्यांचे चित्रपट मनोरंजन करणारे असतातच शिवाय सामाजिक संदेशही देणारे असतात. आयुषमानचे संपू्र्ण कुटुंब चांगले आहे. मी त्यांचा आदर करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.