ड्रग्ज तस्कर सैजू थंकाचनच्या कारने केलेल्या पाठलागामुळे झालेल्या अपघातात मिस केरळ अन्सी कबीरसह Ansi Kabeer दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती कोचीचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी मंगळवारी दिली. १ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला होता. "आमच्या तपासातून असं दिसून आलं की पाठलाग केल्यामुळे त्यांना वेगाने गाडी पळवावी लागली आणि त्यामुळे अपघात झाला. पार्टीनंतर थंकाचनने त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध केल्यामुळे त्याने अन्सीच्या गाडीचा पाठलाग केला", असं पोलीस आयुक्त म्हणाले.
विशेष तपास पथकाने मंगळवारी न्यायालयात अहवाल सादर केला असून, पाठलाग केला नसता तर तिघेही आज जिवंत असते असं त्यात म्हटलंय. त्यानंतर न्यायालयाने थंकाचनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्याच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली.
“थंकाचन हा ड्रग्ज व्यसनी असून अनेक गैरव्यवहारांमध्ये तो सामील आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्टीनंतर त्याने अनेक मुलींची छेड काढल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्याविषयी अधिक माहिती समोर आली तर आम्ही आणखी गुन्हे दाखल करू. आम्ही त्याच्याविरुद्ध कलम 506, 299 आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत”, अशी माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, दिवंगत मिस केरळ अन्सी कबीरच्या काकांनी मंगळवारी आयुक्तांची भेट घेतली आणि थंकाचनविरोधात नवीन तक्रार दाखल केली.
अन्सीचा ड्रायव्हर मद्यधुंद होता. त्यामुळे त्याला ताकीद देण्यासाठी मी त्यांचा पाठलाग करत होतो, असं थंकाचनने तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं. तर दुसरीकडे अन्सीच्या कारचा ड्रायव्हर अब्दुल रहमानने पोलिसांना सांगितलं की, पाठलाग करणाऱ्या कारपासून वाचण्यासाठी त्याने गाडी जास्तीत जास्त वेगाने चालवली. त्याने असंही सांगितलं की थंकाचनने कुंदनूर जंक्शनजवळ आमची कार अडवली होती आणि हॉटेलमध्ये परत जाण्याची धमकी दिली होती.
हा अपघात १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. मिस केरळ अन्सी कबीर आणि तिची मैत्रीण अंजना शाजन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र एम आशिक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीट बेल्टमुळे कार ड्रायव्हर रहमानचे प्राण वाचले. तिरुअनंतपुरममधील अटिंगल इथल्या अन्सी कबीरने २०१९ मध्ये मिस केरळचा किताब पटकावला होता.
शहरात रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणारा थंकचान हाच प्रमुख आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. थंकचानच्या आर्थिक पार्श्वभूमीचा स्वतंत्र तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अशा पार्ट्यांमध्ये त्याने अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं असावं, असाही संशय त्यांना आहे. हॉटेल मालक रॉय जोसेफ, त्यांचे कर्मचारी आणि थंकचान यांची समोरासमोर चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.