Dream Girl 2 Review Ayushman Khurrana Ananya Pandey esakal
मनोरंजन

Dream Girl 2 Review : 'ड्रीम गर्ल २' पाहणार तब्येत खूश होणार!, आयुषमान इतका बहुरंगी, बहुढंगी अभिनेता दुसरा कुणी नाहीच

करम चौधरीची गोष्टच वेगळी आहे. त्याला खूप मोठं व्हायचं आहे, पण मेहनत करण्याची त्याची फारशी ताकद नाही.

युगंधर ताजणे

Dream Girl 2 Review Ayushman Khurrana Ananya Pandey : रडवणं सोपं पण हसवणं त्यापेक्षा कठीण म्हटलं जातं. काही करुन हसवणंही अवघडच. सहजगत्या आलेलं हसू मनावरचं दडपण दूर करतं. तुम्हाला फ्रेश करुन जातं. आपण समोर जे पाहतो आहोत त्यात तर्काचा भाग अजिबात नाही हे माहिती असून सुद्धा परिस्थितीमुळे निर्माण होणारा विनोद आपल्याला खळळून हसवतो तर आपण त्याचा आनंद घेणं जास्त महत्वाचं.

बऱ्याचदा समोर असणाऱ्या घटनेतील तर्काचा शोध घेण्यापेक्षा त्यातील विनोदाच्या आनंदापासून आपण दूर राहतो. बाकीचे पोट धरून हसू लागतात. ते का हसत आहेत हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू लागते. त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आपण अति चिकित्सकदृष्टीनं त्या घटनेकडे पाहिल्यानं त्यातील विनोद संपून जातो. हाती येते कमालीची निराशा आणि निरसता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

तुम्हाला आयुषमान खुराणाचा ड्रीम गर्ल २ पाहायचा आहे का, मग एक गोष्ट करा थोडा तुमचा लॉजिकल स्वभाव बाजूला ठेवून जा. आणि मग बघा हा चित्रपट तुम्हाला किती फ्रेश करतो ते. त्याला तुमच्याकडून फक्त टाळ्या, शिट्यांची अपेक्षा आहे. ड्रीम गर्लमध्ये आयुषमाननं पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. यापूर्वी देखील त्यानं ड्रीम गर्ल १ मध्ये साकारलेली पूजा खूपच लोकप्रिय ठरली होती. आयुषमाननं पुन्हा एकदा तो किती ताकदीचा अभिनेता आहे हे त्यानं दाखवून दिलं आहे.

करम चौधरीची गोष्टच वेगळी आहे. त्याला खूप मोठं व्हायचं आहे, पण मेहनत करण्याची त्याची फारशी ताकद नाही. त्याचं परीवर (अनन्या पांडे) जीवापाड प्रेम आहे. ती एका शहरातील एका मोठ्या वकीलाची मुलगी आहे. परी देखील वकील आहे. एका कार्यक्रमामध्ये करमची आणि परीची भेट होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचे लग्न व्हावे ही करमच्या वडीलांची (अनु कपूर) यांची मनापासून इच्छा आहे. ते प्रचंड लोभी आहेत. आपल्याला फक्त पैशांशी मतलब बाकी सगळं गेलं तेल लावत, ही मनोवृत्ती.

करमचे सासरे घरी येतात त्यावेळी जे पाहतात त्यावरुन काहीही झालं तरी या मुलासोबत परीचं लग्न होणार नाही असे ठणकावून सांगतात. करमला घरावर असलेलं कर्ज फेडायचं आहे. त्यासाठी त्याला २५ लाखांची गरज आहे. हे सगळं काही रात्रीत होणारं नाही. त्यामुळे करम जे पाऊल उचलतो ते मात्र थक्क करणारं आहे. बार मध्ये गेल्यावर एक बारबाला नाचत असताना तिच्यावर होणारा नोटांचा पाऊस पाहून त्यालाही ती कल्पना सुचते आणि आयुषमानचा ड्रीम गर्ल २ तुमच्या मनाची पकड घेण्यास सुरुवात करतो.

दुसरीकडे एका मुस्लिम कुटूंबामध्ये असणाऱ्या मुलासाठी वधूचा शोध सुरु आहे. त्यांच्या कुटूंबात पूजाचे आगमन कसे होते, ती त्या मुलाशी लग्न करते का, पूजाचं सिक्रेट सगळ्यांना कळते का, त्यामुळे होणारा गोंधळ कुणाच्याच कसा लक्षात येत नाही आणि सगळ्यात महत्वाचे परिला ही गोष्ट समजल्यावर काय होतं, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर एकदा ड्रीम गर्ल २ पाहून या, फ्रेश होऊन थिएटर बाहेर पडाल एवढं नक्की. चित्रपटातील विनोद तुम्हाला बऱ्यापैकी हसवतो. कलाकारांचा उस्फुर्त अभिनयही दाद देण्यासारखा आहे.

सव्वा दोन तासांच्या चित्रपटामध्ये आपल्याला कुठेही बोअर होत नाही. दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी याची काळजी घेतली आहे. या चित्रपटामध्ये जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांनी यापूर्वी बऱ्याचशा विनोदी चित्रपटात काम केले आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेते असरानी, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अनु कपूर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिकांनी ड्रीम गर्ल २ ला सतत लाफ्टर मिळालाच पाहिजे अशा मोडवर ठेवलं आहे.

कलाकारांच्या भूमिकेविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी खूपच सहजतेनं काम करत प्रेक्षकांना दाद देण्यास भाग पाडले आहे. तुम्हाला गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या विनोदी पटाचे नाव आठवते का, फार पटकन आठवणार नाही. करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीची गोष्टच वेगळी होती. ती एका कौटूंबिक मालिकेची विनोदी गोष्ट होती. त्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यात ओढून ताणून केलेला विनोद होता. आणि अति उत्साही रणवीरच्या एनर्जीनं पुन्हा एकदा कंटाळा आणला होता.

ड्रीम गर्ल २ मध्ये तुम्ही सव्वा दोन तास पोटभर हसता. हसू येतं. ते दिग्दर्शकानं बळजबरीनं आणलेलं नाही. पूर्वाध आणि उत्तरार्ध यामध्ये विनोदी मसाला खूप आहे. मध्यतरांनंतर चित्रपट थोडासा संथ होतो खरा. त्याला कारण त्यातील एक दोन गाणी आहेत. पण आय़ुषमाननं केलेला अभिनय आणि त्याची कॉमेडी हे दोन्ही भारीच आहे. त्यानं आजवर जेवढ्या भूमिका केल्या त्यातील त्याच्या वेगळेपणाला दाद द्यायला हवी. त्यानं नेहमीच विविध भूमिकांचे आव्हान स्विकारले आहे.

विकी डोनरपासून सुरु झालेला त्याचा प्रवास हा आता ड्रीम गर्ल २ पर्यत आला आहे. त्याच्या हवाईजादा, बाला, दम लगा के हाईशा, आर्टिकल १५, अंधाधून, सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. त्यातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. ड्रीम गर्लमध्ये त्यानं साकारलेली पूजा प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते. पूजाचा आवाज, तिचं चालणं, बोलणं, तिची अदा हे प्रेक्षकांना खळखळून हसवून जातं.

अनन्याच्या वाट्याला जास्त काम नाही ही एका अर्थी चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे तिनं जेवढी भूमिका केली ती चांगली आहे. तेवढ्यापुरत्या भूमिकेला न्याय देण्याचं काम तिनं प्रामाणिकपणे केलं आहे. अनन्याच्या गेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारलं आहे. तिचा यापूर्वी गहराईया नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर लायगर आला. मात्र त्यातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले. आयुषमान खुराणासोबत मात्र ती चमकली आहे. दोन चार प्रसंगामधून ती चाहत्यांची पसंती मिळवून जाते एवढं सांगावे लागेल.

परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, सीमा पहावा यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना मनमुराद हसवतो. चित्रपटातील संवादही चटपटीत आहेत. ते प्रेक्षकांची दाद मिळवून जातात. मेरे दिल का टेलिफोन...हे गाणं सोडल्यास बाकी गाणी मात्र निराशाजनक आहे. त्यानं फिल्म थोडी संथ वाटू लागते. ड्रीम गर्ल २ हा हलका फुलका, निखळ मनोरंजन करणारा विनोदीपट आहे.

जास्त लोड न घेता आणि वेगवेगळे तर्काचे बाण न सोडता तो पाहिला तर तुमचे शंभर टक्के मनोरंजन होणार एवढं नक्की. आणि तुम्ही जर आयुषमान खुरानाचे चाहते असाल तर त्यानं साकारलेली पूजा किती भारी आहे. हे पाहण्यासाठी ड्रीम गर्ल २ पाहाच.

---------------------------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - ड्रीम गर्ल २

कलाकार - आयुषमान खुराणा, परेश रावल, असरानी, अनन्या पांडे, विजय राज, सीमा पहावा, राजपाल यादव, अनु कपूर

दिग्दर्शक - राजीव शांडिल्य

रेटिंग - ३ स्टार

-------------------------------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT