मिस युनिव्हर्स(Miss Universe 2021) होऊन देशाची मान जगात उंचावणारी पंजाबची हरनाझ संधू आता भारतात परत आली आहे. आणि ती आता वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला दिसत आहे. पण अचानक या कार्यक्रमातनं वजन वाढलेली हरनाझ संधू दिसल्यानं ट्रोलर्सनी तिच्यावर हल्लाबोल केला आहे. हरनाझनं मात्र माझ्या वाढलेल्या वजनाचा माझ्या सौंदर्याशी काही संबंध नाही असा कडक शब्दात ट्रोलर्सवर पलटवार केला आहे. हरनाझ संधूचे काही सध्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले तर हरनाझचं वजन त्यात वाढलेलं दिसत आहे. मग काय ट्रोलर्सला आयतेच खाद्य मिळालं. सोशल मीडियावर हरनाझच्या वाढलेल्या वजनावरुन तिला चांगलंच ट्रोल केलं गेलं. पण हरनाझनं बरेच दिवस ट्रोलर्सकडे कानाडोळा केला होता. पण आता मात्र तिनं एकात वाक्यात उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
पीटीआय शी हरनाझनं नुकताच संवाद साधला,त्यात ती म्हणाली आहे,''ती Celiac Disease नावाच्या आजाराचा सामना करीत आहे. यामध्ये पोटासंबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात. पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. या आजारात वजन खूप कमी देखील होतं किंवा वाढतं देखील. पण माझ्या या आजाराविषयी जाणून न घेता मला जाडी म्हणून हिणवलं जात आहे. मला अनेक पदार्थ खाण्यावर बंदी आहे. मी कुठल्या अवस्थेतून जात आहे याचा साधा विचारही निंदा करणारे करत नाहीत हे आश्चर्यजनक आहे''.
''एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर किंवा गावातून शहरात किंवा शहरातून गावात असा प्रवास आपण करत असतो तेव्हा तिथल्या वातावरणानुसार आपल्या शरीरात देखील बदल घडत असतात. न्यूयॉर्कमध्ये मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा देखील माझ्या शरीरावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. मी एक अशी व्यक्ति आहे की जी शरीरातील होणाऱ्या या बदलांकडे सकारात्मकतेने पाहते. आणि कदाचित मी अशी पहिली मिस.युनिव्हर्स असेन जी इतक्या विचित्र पद्धतीनं शरीरात होणाऱ्या बदलांचा सामना करत असेल. मिस.युनिव्हर्सच्या मंचावर मी महिला सक्षमीकरण,स्त्रीत्व,स्त्रीशक्ती,स्त्रीचं व्यक्तिमत्व,त्यातील बदल या सगळ्या गोष्टींवर बोलले होते. आपला दृष्टिकोन बदलायला हवा असं देखील म्हणाले होते. आता हे सगळं माझ्यासोबत घडत आहे. मला माहित आहे असे खूप जण आहेत जे मला ट्रोल करत आहेत. पण हेच लोक सर्वसामान्य मुलींनाही उगाचच ट्रोल करताना दिसतातच की. त्यासाठी मिस.युनिव्हर्स असणं गरजेचं नाही''.
''मला आता त्या सगळ्या ट्रोल होणाऱ्या मुलींना हे सांगायचं आहे की,आपण सुंदर आहोत हा विचार सर्वप्रथम करा,जग काय म्हणतंय याचा विचार करणं सोडून दिलात तरच तुमचं सक्षमीकरण खऱ्याअर्थानं होईल. मी सुंदर होते म्हणून मी मिस.युनिव्हर्सचा ताज जिंकले. मी जाडी असले किंवा बारिक झाले तरी माझं माझ्यावर कायम प्रेम राहिल,मी सुंदरच आहे हा विचार कायम माझ्या मनात राहील. मला माझ्या शरीरातील हा बदलही आवडला आहे. हे माझं शरीर आहे. आणि माझ्या शरीरावर माझं प्रेम आहे. शेवटी आयुष्यात चॅलेंजेस नसतील तर मजाच काय. जे होतं ते चांगल्यासाठी असा विचार करत रहावं असं हरनाझ संधू म्हणाली आहे''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.