Jawan Shah Rukh Khan Movie Review king khan : किंग खान शाहरुखच्या जवानची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. आज त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा जवान चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खरं सांगायचं तर पठाणपेक्षा शाहरुखचा जवान नक्कीच उजवा आहे. त्याचे दुसरे कारण दिग्दर्शक अॅटली हे आहे. त्यानं खरचं कमाल केली आहे.
शाहरुखनं यापूर्वी डॉन, रईस, रा-वन सारख्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरो म्हणून काम केले होते. मात्र त्याला जेमतेम यश मिळाले होते. वयाची साठी पार केलेल्या शाहरुखचा जवान यासगळ्या चित्रपटांपेक्षा वरचढ आहे.
त्यानं यात जीव ओतून काम केले आहे. त्यानं जे कष्ट घेतले आहे त्याचे कौतुक करावे लागेल. शाहरुख यावेळी भलताच चमकून गेला आहे. त्याच्यासोबत जेवढे सहकलाकार आहे त्यांच्यापेक्षा शाहरुखनं पुन्हा एकदा त्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
पठाणनं भलेही हजार कोटींची कमाई केली असेल पण त्यात शाहरुखनं बऱ्याच अंशी निराशा केली होती. सिनेमाची कथा, दिग्दर्शन, त्यातील ग्राफीक्स आणि कलाकारांचा अभिनय यामुळे तो चित्रपट फारसा प्रभावी नव्हता.
जवानच्याबाबत मात्र ती गोष्ट वेगळी म्हणावी लागेल. प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीनं शाहरुखकडून जे काम करुन घेतले आहे त्यासाठी शाहरुखला नव्हे तर अॅटलीला धन्यवाद द्यावे लागेल.
सनीच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे शाहरुखच्या जवानविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती त्यात खरा उतरला आहे.
कुणी काही का म्हणेना गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडनं टॉलीवूडच्या चित्रपटांचा मोठा धसका घेतला होता. मग ती सुरुवात पुष्पापासून झाली आणि रजनी यांच्या जेलरपर्यत येऊन थांबली.
त्यात निवडक काही बॉलीवूडपटांनी चांगली कमाल केली होती. पण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई ही टॉलीवूपटांची राहिली होती. त्यात अल्लु अर्जून, रजनीकांत, कमल हासन, विजय सेतुपति, थलापती विजय, सुर्या आणि यश यांच्या नावाचा समावेश आहे.
शाहरुखनं त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये असं कधीही केलं नव्हतं की ज्यात दाक्षिणात्य कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक यांना स्थान दिले होते. जवानच्या निमित्तानं हे सारे जण एकत्र आल्यानंतर काय होते हे पाहायचे असल्यास जवानच्या वाट्याला जावे लागेल.
ज्यांनी अनिल कपूरचा नायक नावाचा चित्रपट पाहिला त्यांना काही अंशी जवानमध्ये त्याची झलक जाणवेल. पण जवानची स्टोरी पूर्ण वेगळी आहे. हे आवर्जून सांगावे लागेल. काही प्रसंगात मात्र नायक अधूनमधून डोकावताना दिसतो.
जवानची स्टोरी देशाच्या पूर्व दिशेकडील राज्यांमध्ये तो एका नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसतो आहे. स्थानिक नागरीक त्याला पाण्यातून बाहेर काढतात. त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे अजूनही त्याच्या जीवावरील धोका टळलेला नाही.
स्थानिक लोकांवर काहीजण हल्ले करतात. अशावेळी तो त्या लोकांची सुटका करतो. तो कोण हे आणि तशा अवस्थेत का आहे, हे जेव्हा तुम्ही जवान पाहू लागता तेव्हा ते कोडं सुटत जातं.
दुसरीकडे विक्रम राठोड (शाहरुख खान) यानं देशातील भ्रष्टाचार, राजकीय लोकांनी शेतकऱ्यांना दिलेली अपमानस्पद वागणूक, त्यांचे केलेले हाल, भारतातील आरोग्य व्यवस्था यावर त्याच्या पद्धतीनं भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. यात त्याच्यासोबत त्याची टीम आहे.
प्रियामणि, गिरीजा ओक, सान्या मल्होत्रा, लहेर खान, संजिता भट्टाचार्य, अमरिथा अय्यर या अभिनेत्रींचा त्यात समावेश आहे. त्या प्रत्येकीचा भुतकाळ फारच भयानक आहे.
शाहरुख प्रत्येकवेळी सरकारला धारेवर धरतो त्याचे कारण त्याच्या टीममधील त्या सहा जणी आहे. त्यांच्या आयुष्यात जे घडून गेले आहे त्याला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सरकार कसे कारणीभूत आहे हे आपल्याला जवानच्या कथेतून दिसून येते. त्याचवेळी शाहरुख म्हणतो तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात जी उंगली करता ती निवडणूकीच्या वेळी देखील करण्याची गरज आहे.
सरकार निवडून देताना तुम्ही का काळजी घेत नाही. आजही आपल्याकडे आरोग्य, शिक्षण, यासारख्या अनेक गोष्टींच्या मुलभूत सोयीसुविधा नाही, याचे कुणालाच काही वाईट वाटत नाही.
किंग खान पोटतिडकीनं बोलत राहतो. आपण जागरुक नागरिक असाल तर सरकार निवडून देताना उंगली करण्याची गरज आहे हे शाहरुख सांगायला विसरत नाही. तो परखडपणे देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मोठमोठ्या बिल्डर, उद्योगपतींच्या धोरणांवर भाष्य करतो.
आणि देशामध्ये नक्की काय सुरु आहे हे सांगतो. त्यामुळे शाहरुखच्या तोंडी जो संवाद आहे की, बेटे को हाथ लगाने से पहले बाप से पुछना चाहिए....तो असं का म्हणतो पाहण्यासाठी जवान एकदा पाहायलाच पाहिजे.
अभिनयाबाबत बोलायचे झाल्यास पठाणपेक्षा शाहरुखनं यामध्ये कमाल केली आहे. त्याचा डबल रोल आहे. जास्त स्पॉयलर सांगण्यात अर्थ नाही. आझाद कोण आणि विक्रम राठोड कोण, त्यांच्यात नेमके नाते काय हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला जवान पाहावा लागेल. व्हिलनच्या भूमिकेत विजय सेतुपतिनं त्याची वेगळी उंची गाठली आहे. एका बाजुला शाहरुख असताना त्याच्यासमोर विजयनं आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले आहे.
याशिवाय शाहरुखची हिरोईन म्हणून दीपिका आणि नयनतारा यांनी देखील चमकदार भूमिका केल्या आहेत. शाहरुखची सहा जणींची टीम प्रभावी आहे. त्या सान्या मल्होत्रा आणि प्रियामणि यांना जरा जास्त स्क्रीन टाईम मिळाला आहे. अॅटलीनं केलेलं दिग्दर्शनं तुम्हाला बांधून ठेवते. पूर्वार्ध थोडासा रटाळवाणा आहे. मात्र उत्तरार्धात जवान खूपच कमाल करतो. शेवटची पंधरा ते वीस मिनिटं तर तुफान अॅक्शन आहे.
संवाद आणि दिग्दर्शनाबाबत जवाननं कमाल केली आहे. यापूर्वी त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरमधून तो बाप-मुलाचा डायलॉग समोर आला होता. त्यानंतर आता त्यात उंगली वरुनही डायलॉग आहे. तो प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे.
शाहरुखनं पहिल्यांदाच इतक्या जाहीरपणे आणि बिनधास्तपणे राजकीय इशारा देणारे डायलॉग त्याच्या चित्रपटातून दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यावरुन जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.
गाण्यांच्या अतिरेकामुळे जवान काहीसा कंटाळवाणा होऊन जातो. जिथं चित्रपट लाईनवर येतो आहे असे दिसताच तिथं येणारं गाणं काहीवेळेला मूड खराब करुन जाते हे आवर्जून सांगावे लागेल.
बाकी शाहरुखचा जवान पठाणचं रेकॉर्ड मोडेल यात कोणतीही शंका नाही. कारण बाप हा बापच असतो, त्यात मुलाला हात लावल्यावर त्याला येणारा राग एवढ्या लवकर शांत होणार नाही. हे जवान पाहिल्यावर लक्षात येते.
----------------------------------------------------------------------
चित्रपटाचे नाव - जवान
दिग्दर्शकाचे नाव - अॅटली
कलाकार - शाहरुख खान, विजय सेतुपति, नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणि, सुनील ग्रोव्हर, दीपिका पदुकोण
रेटिंग - साडेतीन स्टार, ***1/2
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.