Sangeet Devbabhali Natak: संगीत देवबाभळी नाटकाचा शेवटचा प्रयोग काल मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात पार पडला. कार्तिकी एकादशीच्या पुर्वसंध्येला या नाटकाने प्रेक्षकांच्या साक्षीने निरोप घेतला.
गेली सहा वर्ष या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सुरु आहेत. अखेर या प्रयोगांच्या वारीला काल २२ नोव्हेंबरला पूर्णविराम मिळाला. काल अनेक मान्यवर संगीत देवबाभळीचा प्रयोग पाहायला उपस्थित होते. अभिनेता जितेंद्र जोशी काल शेवटचा प्रयोग पाहायला उपस्थित होता. जितेंद्रने एक खास कविता करत संगीत देवबाभळी नाटकाला निरोप दिलाय.
जितेंद्र जोशीने ही कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहीलंय की,
देवबाभळी
स्वागताला रांगोळी रेखाटली
आवली च्या चुलीतल्या राखेची
आणि निरोपाला
तिच्या पायाच्या जखमेची चिंधी
हातात देत
तुकोबाच्या गाथेतलं एक एक पान घेऊन
अभंगाच्या ओव्या त्यानं वाटल्या
त्याला समजलेला अर्थ मौनात ठेवून
ज्याला त्याला त्याचा त्याचा अर्थ
अलगद मनात झिरपवू दिला
आणि
आजवर भेटायला आलेल्या प्रत्येकाला म्हणाला
तुमचा तुमचा
तुका आणि विठू
तुमचा तुम्ही शोधा
तो सापडो अथवा न सापडो
परंतु रुसलेली , जखम झालेली,
अबोला धरलेली सखी सापडलीच
तर मात्र मदत करा
तिला तिचा पाऊस शोधायला
तिचा पाय बुडेल तीच तुमची इंद्रायणी
तिच्या सोबत तंद्रटपणे भिजा
तिला ते स्वप्न वाटेल मग
तुम्ही सुद्धा डोळे बंद करून तिचं
स्वप्न होण्यासाठी तिचे डोळे व्हा
तिच्या सोबत तुम्हीही हाका
मारून बोलवा तिच्या सख्या ला
कुणी येवो ना येवो
हाक मात्र आत्म्याची असू दे
या जन्मात नाही तर पुढच्या
तो येवो ना येवो
सर्वांना हाक मारण्याची असोशी
आणि आत्मा मिळो
तुका , विठो मिळो ना मिळो
आवली कळो.. रखुमाई कळो
आ..... वं.....
– जितेंद्र शकुंतला जोशी
#देवबाभळी #निरोप
संगीत देवबाभळी या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही 'देवबाभळी' आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली.
अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी 'संगीत देवबाभळी' या नाटकाने काल शेवटचा प्रयोग करत प्रयोगांचा प्रवास तूर्तास थांबवलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.