लतादीदींच्या आवाजाला उपमा देण्यासाठी शब्द थिटे पडतात. साऱ्या विश्वाला मंत्रमुग्ध करणारा हा स्वर... आचार्य अत्रे यांच्या शब्दात सांगायचे, तर ‘सरस्वतीच्या विणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीची साद, हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे...’ भारतरत्न आणि जागतिक कीर्ती लाभलेल्या लतादीदी आपल्या सांगलीतील बस स्थानक परिसरात राहत होत्या आणि मारुती चौकातील शाळेत जात होत्या, हे सांगताना प्रत्येक सांगलीकरांचा ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. लतादीदी साऱ्या विश्वाच्या असल्या तरी त्या ‘सांगलीकर’ म्हणून आपण नेहमीच तो अभिमान मिरवत राहू. ते भाग्य सांगलीकरांना मिळाले आहे. ते अखंड राहील.
- शेखर जोशी, (shekharvjosh@gmail.com)
लतादीदी सांगलीतील बस स्थानक परिसरात राहत होत्या. त्यांच्या घराच्या जागी आता बेकरी उभी असली, तरी तो चौक आजही दीनानाथ चौक म्हणून ओळखला जातो. लतादीदी ज्या शाळेत शिकत होत्या, ती मारुती चौकातील शाळा आज भुईसपाट झाली आहे. त्या शाळेचे जुने फोटो आजही आपल्याला पाहायला मिळतात. काही बाबतीत आपण करंटे ठरतो, कारण लतादीदींची आठवण म्हणून त्या शाळेला नाव देऊन ती जतन करता आली असती. आपण सांगलीकरांनी हा ठेवा जपायला हवा होता. ते आपण काल केले नाही. मात्र, लतादीदींचे स्मरण करताना ते उद्या तरी घडावे, ही निःस्वार्थ अपेक्षा.
खरेतर लतादीदींचा जन्म इंदूरचा. त्यांचे मूळचे घर गोव्यातील मंगेशीचे. त्यामुळे पुढे आडनाव मंगेशकर झाले. मूळ आडनाव नवाथे. मास्टर दीनानाथ ज्यांच्यामुळे हे कुटुंब सांगलीत वास्तव्यास आले. संगीत नाटकाच्या सुवर्णकाळातील एक सोनेरी पान म्हणजे मास्टर दीनानाथ... सांगलीत त्यांच्या नावे महापालिकेचे एक नाट्यगृह आहे, पण आज ते अत्यंत दुरवस्थेत आहे. त्याच नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन लतादीदी आणि त्यांच्या चार भावंडांच्या उपस्थितीत २००० मध्ये करण्यात आला होता. तेव्हा सांगली महापालिकेने त्यांना मानपत्र देऊन गौरविले होते. त्यानंतर पुन्हा लतादीदी कधीच जाहीरपणे सांगलीला आल्या नाहीत, मात्र कोणालाही खबर लागू न देता त्या हरिपूरच्या बागेतील गणपतीला यायच्या आणि पूजा करून पुन्हा जायच्या. मंगेशकर कुटुंबीय सांगलीतून गेले, तरी सांगलीशी लतादीदींचा हा ऋणानुबंध गणपती भक्तीतून तरी कायम राहिला होता. दीदी ज्यांच्याकडे अभिषेक करायच्या ते हरिपूरचे पुरोहित मधुकाका आज हयात नाहीत; पण लतादीदींच्या येथील गणपती मंदिरातील आठवणी या पुढील काळात मर्मबंधातील ठेव राहतील.
जुन्या पिढीतील लोकांना लता मंगेशकर यांचं सांगलीतील वास्तव्य माहीत होतं, पण नव्या पिढीला याचं आश्चर्य वाटतं. मंगेशकर कुटुंबीयांच्या वास्तव्याच्या या पाऊलखुणा पुसत चालल्या आहेत. लतादीदींच्या हस्ते ज्या नाट्यगृहाचा नूतनीकरण समारंभ झाला ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह एकच मंगेशकरांची येथील मोठी मर्मबंधातली ठेव आहे. ती जपायला हवी आणि ती अशी भव्य करायला हवी; की जगाने येऊन ती पाहिली पाहिजे.
काही वर्षांपूर्वी हे नाट्यगृह पाडलं जाणार होतं. ही गोष्ट जेव्हा येथील दीनानाथ प्रेमी सांगलीकरांनी लतादीदींना कळवली, तेव्हा त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. त्यानंतर अखेरचा प्रयत्न म्हणून दीदींनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, की आम्ही सांगलीत राहिलो आणि माझे वडील मास्टर दीनानाथ यांची ही एकमेव आठवण कायमची जपली जावी, अशी माझी इच्छा आहे. काहीतरी करा, ही विनंती.
विलासरावांनी दीदींची ही हाक ऐकून येथील मंगेशकर नाट्यगृह पाडून त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभा करण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश महापालिकेला दिले. दीनानाथ नाट्यगृहाच्या जागी व्यापारी संकुल करू नये, म्हणून पत्रकारांनी खूप रान उठवले होते. नाट्यगृहाचा बाजार अशा पद्धतीने दीदींच्या फक्त एका पत्राने वाचला. आजसुद्धा हे नाट्यगृह अत्यंत अडगळीत पडले आहे. पुन्हा येथे बिझनेस कॉम्प्लेक्सचा वरवंटा फिरू नये, यासाठी सांगलीकरांनी सतर्क राहिले पाहिजे. खरंतर या ठिकाणी लतादीदींचा एक पुतळा उभा करून त्यांच्या वडिलांच्या नावच्या नाट्यगृहात त्यांच्या नावे एक कलादालन करावे, ही त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरू शकेल. दीनानाथ नाट्यगृह आणखीन डौलदार करणं, ही लतादीदींना मोठी आदरांजली ठरू शकते. कारण, लता आणि मंगेशकर कुटुंबीय हे सांगलीत वास्तव्यास होते, हा सांगलीकरांसाठी मोठा गौरव आहे.
मर्मबंधातील ठेव सांगलीतच
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह जपणे आणि ते अधिक भव्य करणे, ही लता मंगेशकर यांच्यासाठी सांगलीकरांची श्रद्धांजली ठरेल. नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले, मात्र ते पुन्हा अडगळीत पडले आहे. त्या ठिकाणी लतादीदींच्या नावे कलादालनाच्या स्वरूपात मोठे स्मारक उभे राहू शकते. या ठिकाणी लतादीदींचा मोठा पुतळा देखील उभा करता येईल, सांगलीकरांची ही इच्छा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.