Maharashtra Shaheer Review News: गेले अनेक दिवस ज्या सिनेमाची खूप चर्चा आहे असा महाराष्ट्र शाहीर सिनेमा आज २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. कसा आहे हा सिनेमा जाणून घेऊ..
(maharashtra shaheer movie review starring ankush chaudhari kedar shinde sana shinde)
सिनेमाची कथा सुरू होते जागतिक शांतता परिषदेपासून. तिथे भारताची आणि महाराष्ट्राची महती सांगायला शाहीर साबळे आलेले असतात.
'महाराष्ट्र धर्म बहुगुणी' गात शाहीर साबळे सर्वांना मंत्रमुग्ध करतात. पुढे मुलाखतीच्या माध्यमातून शाहीर साबळे त्यांच्या आयुष्याची कहाणी उलगडतात.
आईपासून लपत गात असलेलं गाणं, पुढे आजीचा धाक, नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून झालेली ओढाताण, अशातच भानुमतीचं आयुष्यात येणं, स्वातंत्र्य चळवळ ते महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक गोष्टींना सिनेमा स्पर्श करतो.
अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. अंकुश शाहीरांच्या देहबोलीला शोभत नसला तरीही त्याने समरसून भूमिका साकारली आहे. विशेषतः शाहिरांच्या उतारवयातील काळ अंकुशने सुंदर दाखवलाय.
अंकुशला साथ मिळाली ती सना शिंदेची. सनाने भानुमतीच्या भूमिकेत सुंदर अभिनय केलाय. पहिलाच सिनेमा असला तरीही सना मध्ये आत्मविश्वास दिसतो.
सनाने संवादफेकीवर थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं असं राहून राहून वाटतं. शाहीर आणि भानुमती यांच्यातला रोमान्स पडद्यावर पाहणं गोड आहे. अश्विनी महांगडे सुद्धा राधाबाईंच्या भूमिकेत छान शोभली आहे.
महाराष्ट्र शाहीर सिनेमा शाहीर साबळे यांच्या आयुष्याला स्पर्श करतो. परंतु सिनेमा तुकड्या तुकड्यात आवडतो. सुरुवातीलाच जागतिक शांतता परिषदेत शाहीर साबळे मुलाखत देत आहेत, हा भाग टाळता आला असता तर चांगलं झालं असतं.
शाहीरांचं आयुष्य सलग दाखवलं असतं तर रंगत आणखी वाढली असती. कारण मध्येमध्ये मुलाखत येत असल्याने काहीसा रसभंग होतो.
याशिवाय शाहीर साबळे यांच्या सुरुवातीचं आयुष्य कमी दाखवता त्यांचा उत्तरार्ध थोडा आणखी दाखवला असता तर आवडलं असतं.
भानुमती आणि शाहिरांची कहाणी फुलवण्यात सिनेमाची गती मंदावते. त्यामुळे इंटर्वल नंतर सिनेमा वेगात पळतो. याशिवाय ट्रेलरमध्ये दाखवलेले काही भाग सिनेमात एडिट केलेले दिसत आहेत.
अजय अतुल यांचं सिनेमाला असलेलं संगीत सुंदर आहे. सिनेमांमधील गाणी कथेला पुढे घेऊन जातात. इंटर्वल नंतर सिनेमा पकड घेतो. शाहीरांची अनेक जुनी गाजलेली गाणी ऐकायला मिळतात. पाहायला मिळतात.
शाहिरांच्या गाजलेल्या नाटकातले प्रसंग पडद्यावर पाहायला मिळतात. जेजुरीच्या खंडेराया, महाराष्ट्राची लोकधारा कसं निर्माण झालं, त्यामागची कहाणी जाणून घेता येते.
एकूणच महाराष्ट्र शाहीर तुकड्या तुकड्या आवडून जातो. अंकुश चौधरीच्या अभिनयासाठी आणि शाहिरांचा जुना काळ पुन्हा अनुभवण्यासाठी महाराष्ट्र शाहीर सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.