Haddi Movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : हड्डी : ‘कणा’ हरवलेल्या कथेमुळं भ्रमनिरास

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तृतीयपंथीयांवरील चित्रपट आणि मालिकांचं पेवच फुटलं असल्यासारखी स्थिती आहे. या मालिकेतील नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला ‘हड्डी’ ही नवी एन्‍ट्री.

महेश बर्दापूरकर

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तृतीयपंथीयांवरील चित्रपट आणि मालिकांचं पेवच फुटलं असल्यासारखी स्थिती आहे. या मालिकेतील नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला ‘हड्डी’ ही नवी एन्‍ट्री. अक्षत अजय शर्मा या नवोदित दिग्दर्शकानं पहिल्याच प्रयत्नात क्राइम थ्रिलर आणि तृतीयपंथीयांची कथा एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, कथा नक्की कुठं एकत्र आणायच्या, या बाबतीत गोंधळ उडाल्यानं मामला फसला आहे. नक्की काय सांगायचं आहे याबद्दलचा गोंधळ, अत्यंत भडक मांडणी, संगीत आणि चित्रणाच्या आघाडीवरची खराब कामगिरी यांमुळं चित्रपट फसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्‍यप यांच्यातील अभिनयाची (किंचित) रंगलेली जुगलबंदी सोडता चित्रपटात पाहण्यायोग्य काहीच उरत नाही.

‘हड्डी’ची कथा आहे हड्डी (नवाजुद्दीन सिद्दीकी) या तरुणाची. तस्करांबरोबर काम करून पैसे कमावणाऱ्या हड्डीचा संघर्ष प्रमोद अहलावत (अनुराग कश्‍यप) याच्याबरोबर पेटतो. मात्र, हड्डीचा इतिहास खूपच वेगळा असतो. पुरुष असूनही महिला होण्याचा ध्यास घेतलेल्या हड्डीचा हरिका झालेला असतो व या कामी त्याला रेवती अम्मानं (इला अरुण) मदत केलेली असते.

मात्र, प्रमोद अहलावतच्या स्वस्तात जागा हडपण्याच्या धंद्यात अडथळा झालेल्या रेवतीला तो हरिकासमोरच संपवतो. हरिकाचा पती इरफान (मोहम्मद झिशान अय्युब) सामाजिक कार्यकर्ता असतो, मात्र तो हरिकाची मदत करू शकत नाही. प्रमोदचा बदला घेण्यासाठी हरिका हड्डी बनून प्रमोदचा काटा काढण्याचा आणि रेवती अम्माचा बदला घेण्याचा निश्‍चय करतो. शेवटी अगदी फिल्मी स्टाईलनं आणि रक्ताचे पाट वाहत हा बदला पूर्ण होतो.

सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणं कथेचे दोन भाग आहेत आणि ते एकत्र जोडताना घोळ झाला आहे. आपण हड्डीची कथा पाहत असताना हरिकाचे संदर्भ येत राहतात, मात्र दोन कथांचा नक्की काय संबंध (अनेकदा तर हा डबल रोलच आहे की काय, असाही संशय येतो.) हे समजत नाही. हड्डी अत्यंत क्रूरकर्मा दाखवला असला, तरी त्यामागचं कारण अगदी शेवटी उमगल्यानं गोंधळ उडतो.

काही प्रसंग तुकड्यांमध्ये चांगले खिळवून ठेवत असले, तरी अनावश्‍यक प्रसंगांची मालिकाच दिग्दर्शक उभी करतो. रेवती अम्माच्या कोठीवरील हत्याकांडाचा प्रसंग खिळवून ठेवतो, तर हड्डीच्या क्रूरतेचे प्रसंग अत्यंत अनावश्‍यक. शेवट खूपच अपेक्षित.

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनयात अनेक प्रयोग करताना दिसत असून, ते बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. ‘अफवाह’, ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटांमध्ये त्यानं स्वतःवर अनेक प्रयोग केले आहेत. इथंही तृतीयपंथीयाच्या भूमिकेत त्यानं केलेलं काम जबरदस्त, मात्र या प्रयोगांमध्ये त्याला कथा-पटकथेची साथ न मिळाल्यानं त्याचे कष्ट वाया जातात व एक चांगला प्रयत्न वाया जातो.

हड्डीची क्रूरता दाखवताना तो नेहमीच्या शैलीत संवादफेक करीत असला तरी, हरिकाच्या भूमिकेत त्याला चांगली संधी आहे. अनुराग कश्‍यप झोकात काम करीत असला, तरी पात्राचं लिखाण आणि त्याचा अभिनय याचा ताळमेळ बसत नाही. छोट्या भूमिकेत इला अरुण नेहमीप्रमाणं जोशात कमाल करतात. मोहम्मद झिशान अय्युबला पुरेशी संधी नाही. एकंदरीत, नावात ‘हड्डी’ असली, तरी कथेला कणाच नसल्यानं भ्रमनिरास होतो.

हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT