मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कवी, लेखक आणि अभिनेता असा हरहुन्नरी कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. वेगवेगळ्या नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. मनोरंजन विश्वात परभणीचं नाव संकर्षणने गाजवलं. त्याचा 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या डायलॉगने प्रेक्षकांचे मन जिंकले. संकर्षणने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याच्या लोकप्रिय नाटकांपैकी एक नाटक म्हणजे ‘तू म्हणशील तसं’. या नाटकाचे 100 प्रयोग झाले आहे. त्या निमित्ताने संकर्षणने सोशल मिडीयावर या नाटकासंबंधित खास आठवणी शेअर केल्या आहेत. त्यातील एका आठवणीने मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या वर्षभरापूर्वीच्या प्रयोगात झालेल्या दुखापतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने प्रयोगात झालेली दुर्घटना प्रेक्षकांना सांगितली.
दुखापतीनंतरही पूर्ण केला प्रयोग
'तू म्हणशील तसं नाटकाच्या 100व्या प्रयोगानिमित्ताने आठवण क्र. 3. ही घटना एक वर्ष जुनी आहे. आठवण म्हणून शेअर करतोय. तारीख 20 जानेवारी 2020. वाशीचा प्रयोग. नाटक ओपन होऊन बरोबर महिना झाला होता. आमच्या नाटकामध्ये धावपळ थोडी जास्त आहे. माझं पात्र अवखळ असल्यामुळे काही मुव्हमेंट्स आमचा दिग्दर्शक प्रसाद ओक दादाने जरा फास्ट दिल्या आहेत. त्यातली एक टेबलावर उडी मारायची मुव्हमेंट करताना माझा पाय स्टेजवर मुरगळला आणि स्वत:ला सावरून मी उठेपर्यतच टेनिसचा बॉल पायाच्या घोट्यात ठेवलाय की काय असं वाटावं इतका पाय सुजला. अगदी काही क्षणांत तो प्रयोग तसाच थोडा लंगडत केला. रात्री पुण्यात आलो कारण, दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 आणि संध्याकाळी 5.30 असे दोन प्रयोग होते. मग मी रात्रीच 12.30 वाजता संचेती हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी एक्स रे काढला. हेअर लाईन क्रॅक, स्वेलिंग, रेस्ट, ऑपरेट, प्लास्टर, ह्या सगळ्या शब्दांचा वापर करुन ते भलं मोठं काहीतरी सांगत होते. मी डायरेक्ट एवढंच विचारलं, उद्या दोन प्रयोग करता येतील असं काहीतरी सांगा. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन रात्री झोपलो आणि सकाळी पलंगाच्या खाली पायच ठेवता आला नाही. मला घाम फुटला. थिएटरला जाण्याआधी परत गोळ्या घेतल्या आणि प्रयोग सुरु केला. त्या पर्टिक्यूलर उडीच्या मुव्हमेंटला जिथे मला काल लागलं होतं, आज सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा विंगेत येऊन थांबले होते. पण, दोन्ही प्रयोग सुरळीत आणि मस्त झाले. नंतर काही दिवसांची गॅप होती. आराम केल्यावर सूजपण गेली आणि पाय दुखला पण नाही.'
कामाप्रती निष्ठा आणि नाटकाची ओढ यामुळे संकर्षणने दुखापतीचीही पर्वा केली नाही. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. संकर्षणने अभिनेते राज कपूर यांचा 'शो मस्ट गो ऑन' हा डायलॉग प्रत्यक्षात करून दाखवला असे म्हणता येईल. संकर्षणच्या 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. नाटकांबरोबरच वेडिंगचा शिनेमा, नागपूर अधिवेशन, खोपा या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच खुलता खळी खूलेना, मला सासू हवी या प्रसिध्द मालिकामधून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.