Na Dho Mahanor Passed Away News: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उद्या पळसखेड या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ना. धों. महानोर यांचा परिचय
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेले ना. धों. महानोर गेली ६० वर्षाहून अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.
महानोरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.
शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली.
रानात राहणारा निसर्ग कवी
मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आर्ट्स शाखेत दाखल झाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती.
महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे.
ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की, ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा.
अजिंठा आणि महानोर यांचं वेगळं नातं
अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे महानोरांचं छोटेसे गाव. पळसखेडची लोकगीते त्यांनी जिव्हाळ्याने संकलित केली. ‘पळसखेडची गाणी’ त्यांनी आईला अर्पण केली. महानोरांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.