आमच्या घरात गाणं आणि सांगीतिक वातावरण असल्यामुळे घरात जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं, ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे सूर आणि संगीत घेऊनच जन्माला येतं. आमच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा संगीतच जास्त असावं, असं मला वाटतं. प्रत्येक पिढीत गाणं भरलं आहे. तसंच आदर्शमध्येही गाणं आलं आणि जसजसा तो मोठा झाला, त्याचं गाणं बहरलं. त्याच्या या बहरण्याला आशीर्वाद आहेत, माझे वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे...
हर्षद, उत्कर्ष आणि सर्वांत लहान आदर्श अशा तीनही मुलांना उत्तम गाता यावं, म्हणून मी शास्त्रीय संगीत शिकण्याचा त्यांना आग्रह केला. शाळेत असताना तिघेही उत्तम गात होते आणि त्यातही प्रत्येकाची आपापली वैशिष्ट्ये होती. शालेय स्पर्धांमध्ये त्यांची कायम चढाओढ असायची. शाळा संपतासंपता मोठा मुलगा हर्षद याचा कल इंजिनिअरिंग आणि अॅनिमेशनकडे होता. उत्कर्षला डॉक्टर व्हायचं होतं. आदर्शचं मात्र शाळेतच ठरलं होतं की, त्याला गायकच व्हायचं आहे. त्यामुळे माझे वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचं विशेष लक्ष आदर्शकडे होतं. हाच माझा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे, माझं नाव पुढे मोठं करणार आहे, याची त्यांना खात्री पटली होती.
त्यामुळे वेळात वेळ काढून ते आदर्शचं गाणं कसं चाललं आहे, याची आवर्जून चौकशी करायचे. रियाज कसा करतो, हे पाहायचे. आदर्श १२ वर्षांचा होता तेव्हा स्टेजवर परफॉर्म करू लागला होता. एक गायक म्हणून त्याच्यातली प्रगती आम्हा कुटुंबीयांना दिवसेंदिवस दिसत होती. अनेकदा आदर्शचं जिथे गाणं असेल, तिथे माझे वडील कोणालाही न कळू देता एक प्रेक्षक म्हणून त्याचं गाणं ऐकायला हजर असायचे.
१३ वर्षांचा असताना आदर्शला घेऊन आमचे मित्र प्रकाश जाधव यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरवलं. तो कार्यक्रम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा सांगणारा होता. त्याच्या पहिल्या प्रयोगाला आम्ही सर्व कुटुंबीय उपस्थित होतो; पण माझे वडील प्रल्हाद शिंदे उपस्थित राहू शकणार नाहीत, असं सांगितलं. मात्र आमच्या नकळत प्रेक्षकांमध्ये येऊन बसले होते आणि पूर्ण कार्यक्रम शांतपणे बघत होते. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर आला तेव्हा आमच्या लक्षात आलं की दादा प्रेक्षकांमध्ये आहेत. त्यांनी आम्हाला खुणेने शांत बसायला सांगितलं. आपली उपस्थिती लक्षात येऊन लहान आदर्शवर कोणतेही दडपण येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती.
त्यामुळे आम्ही सगळे शांत बसलो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आदर्श ‘निबिड जंगले, तुडवीत आलो, फोडुनिया टाहो, रथ समतेचा असा आणिला, संभाळुनि न्या हो’ हे गाणं सादर करत असताना माझे वडील प्रेक्षकांमधून उठून थेट स्टेजवर गेले. गाणं संपताच त्यांनी आपल्या हातातील सोन्याचं घड्याळ त्याच्या हातात घातलं आणि आम्हाला उद्देशून सर्व प्रेक्षकांसमोर म्हणाले, ‘‘बघा, मुलगा कसा गातोय! आणि या वयात जर इतका चांगला गातोय, तर पुढे किती भारी गाईल,’’ हे सांगताना त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. तो क्षण आम्हा सर्वांसाठीच अविस्मरणीय होता. कारण त्या कार्यक्रमानंतर आम्हा सर्वांना खात्री पटली की, आदर्श संगीतातच काहीतरी कामगिरी करेल.
माझे वडील पंचाहत्तरीकडे झुकलेले असताना मला चांगलं आठवतं, दादांचं शरीर थकलं होतं; पण गळा थकला नव्हता. त्यांची इच्छा होती की, त्यांचं आणि आदर्शचं एक गाणं व्हावं. तेव्हाच मी ठरवलं की एक असा अल्बम करूया, ज्यात वडिलांची दोन गाणी, मी आणि मिलिंद शिंदेची दोन गाणी आणि आदर्शची दोन गाणी अशा तीन पिढ्यांचा संगम असेल. हा प्रस्ताव मी टी सिरीज कंपनीकडे ठेवला. आषाढी एकादशी येत होती. त्या निमित्ताने हा अल्बम करण्याच्या कामाला लागलो आणि ‘पंढरीच्या नाथा’ या कॅसेटचा जन्म झाला. या कॅसेटमुळे आजोबा प्रल्हाद शिंदे यांचा आशीर्वाद नातू आदर्श शिंदे याला मिळणार होता आणि ही आठवण त्याच्यासाठी कायम प्रेरणादायी ठरणार होती.
रेकॉर्डिंगचा दिवस आला. दादांची दोन गाणी रेकॉर्ड झाली. माझ्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनीच आदर्शकडून गाणी गाऊन घ्यावीत. त्यांनी सरळ आम्हा भावांना सांगितलं की, तुम्ही स्टुडिओच्या बाहेर जा. मी माझ्या नातवाचा टेक करणार आहे. अल्बमला माझं संगीत होतं. त्यामुळे आदर्शच्या गाण्याच्या चाली मी त्याच्याकडून बसवून घेतल्या होत्या; परंतु काही जागा, हरकती दादांनी उत्स्फूर्तपणे सांगत आदर्शकडून गाणी गाऊन घेतली. दुपारी बाराच्या सुमारास आदर्श डबिंग रूममध्ये गेला आणि दीड-दोनच्या सुमारास त्याची दोन्ही गाणी गाऊन झाली म्हणून दादांनी आम्हाला स्टुडिओच्या आत बोलावलं. म्हणाले, ‘‘बघा कसं गाऊन घेतलंय, तुम्ही यात चुका काढू शकणार नाही.’’
मला या गोष्टीचा अतीव आनंद होता की, या प्रोसेसदरम्यान आदर्शला त्याच्या आजोबांकडून खूप काही शिकायला मिळालं असेल. आम्ही दोन्ही गाणी सलग ऐकली, जी दादांनी आदर्शकडून अत्यंत अप्रतिम गाऊन घेतली होती. मी भावूक झालो आणि वाटलं की या निमित्ताने आदर्शला दादांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले जे या अल्बम रूपात कैद झाले आहेत.
खरी मज्जा रेकॉर्डिंगनंतर घडली. दुपारची वेळ होती. मी दादांना म्हणालो, ‘घरी जाऊन जेवण करून येऊ या. मला आणि मिलिंदला परत येऊन आमची गाणी रेकॉर्ड करायची आहेत. त्या दिवशी ते आदर्शच्या स्टुडिओमधील गाण्यावर इतके खूष होते की, ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी नाही येत घरी. मी माझ्या नातवाला ट्रीट देणार आहे.’’ टी सिरीजचं कॅन्टीन समोरच होतं. आम्हीपण त्यांच्यासोबत निघालो. ते म्हणाले, ‘‘तुम्ही कुठे येताय? आजोबा आणि नातवामध्ये ही पार्टी आहे. माझी माझ्या नातवासाठी ट्रीट आहे. तुम्ही जेवायला घरी जा.’’ माझं घर दहा मिनिटांवर होतं आणि दादांचा हा शब्द आम्ही टाळू शकत नव्हतो.
कारण आदर्शनं त्या दिवशी जी कामगिरी दाखवली होती, त्याविषयी त्यांना वाटलेला अपार आनंद, प्रेम, अभिमान आणि एका आजोबाचे लाड होते. आम्ही निमूटपणे घरी जेवायला गेलो आणि आजोबा नातवाने एकत्र जेऊन तो क्षण साजरा केला. आदर्शने गाण्याचं मनावर घेतलं तेव्हापासून ते दादांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यातल्या संगीतावरच्या गप्पा कधी थांबल्या नाहीत. दादा सारखे दौऱ्यावर असायचे; पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आदर्शसोबत वेळ घालवायचे. आजोबा-नातू एकमेकांच्या कार्यक्रमांना जायचे आणि आदर्श हमखास दादांसाठी गायचा. दादाही आनंदाने आपली बिदागी त्याच्या हातावर ठेवायचे.
आदर्शची दहावीची परीक्षा झाली आणि माझे वडील वारले. आदर्शला गाण्याची गोडी निर्माण होऊन आणि नवनवीन शिकण्याची जिद्द निर्माण झाल्यापासून तसा फार कमी काळ त्याला आपल्या आजोबांचा सहवास लाभला; पण त्या वेळेचं दोघांनीही सोनं केलं. आज आदर्शला संगीत क्षेत्रातील जे काही मोठमोठे अवॉर्डस मिळाले, दादासाहेब फाळके, फिल्मफेअर वा स्टेट अवॉर्ड तो प्रत्येक अवॉर्ड म्हणजे माझे वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा त्याला मिळालेला आशीर्वाद आहे, असं मी मानतो.
vijayaanandmusicpvtltd@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.