naal 2 marathi movie review directed by Sudhakar Reddy Yakkanti starring nagraj manjule shrinivas pokale SAKAL
मनोरंजन

Naal 2 Review: उसवलेल्या नात्यांची वीण घट्ट करणारा 'नाळ भाग 2', वाचा कसा आहे सिनेमा

नागराज मंजुळेंचा नाळ भाग 2 पाहायला जाताय? आधी वाचा हा Review

Devendra Jadhav

Naal 2 Review: लहानपणी किती सोप्प असतं ना. कधी भांडलो तरीही पुन्हा एकत्र येतो. एखाद्यावर जीव लावला की तो मनापासून. त्यात काही कमतरता नाही, ना कसलाही स्वार्थ. मोठेपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींशी आपण मतभेद उकरून काढतो. आणि एकमेकांचा दुस्वास करायला लागतो. किती बदलतो ना आपण? आपल्याही नकळत. असो! हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे नाळ भाग 2.

क्वचित असे सिनेमे असतात जे पहिल्या भागापेक्षाही काकणभर सरस असतात. नाळ भाग 2 सुध्दा असंच एम उदाहरण. कागदावर स्क्रिप्ट पक्की असली, लेखनावर जास्तीत जास्त मेहनत केली की दर्जेदार सिनेमा कसा तयार होतो याचं सध्याच्या काळातल उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाळ भाग 2.

नाळ भाग 2 ची कथा थोडक्यात सांगायची तर.. चैत्या सुट्टीला आई - बाबांसोबत गावी जातो. त्या गावात आजूबाजूला चैत्याचे सगळे नातेवाईक राहत असतात. तिथेच त्याची खरी आई सुद्धा असते. त्यामुळे चैत्याला त्या आईबद्दल कायम एक अप्रूप असतं.

गावी गेल्यावर चैत्या तिला भेटायला जातो. आणि मग त्याला कळतं की आपल्याला एक बहिणही आहे. तिचं नाव चिमी. चिमिला एक भाऊही आहे त्याचं नाव मणी. आता चैत्याला छोट्या चिमीचे लाड करायचे असतात. तिच्याशी खेळायचं असतं, बोलायचं असतं. पण असे अनेक प्रसंग सिनेमात येतात की चैत्या दुःखी होतो. हताश होतो. काय असतं यामागचं कारण? हे तुम्हाला नाळ भाग 2 पाहून कळेल.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नाळ भाग 2 ची खासियत काय असेल तर निसर्गरम्य परिसरात केलेलं शुटिंग आणि लिखाण. नाळ भाग 2 जुन्नरमध्ये शूट झालाय. पहिल्यांदाच जुन्नरमधील निसर्गरम्य सौंदर्य मराठी सिनेमात पाहायला मिळालं, असं म्हटल्यावर वावगं ठरू नये. धबधबे, डोंगरदऱ्या, हिरवागार निसर्ग अशा अनेक गोष्टी पाहून तुम्हाला तुमच्याही गावाची आठवण येईल. याशिवाय लहानपणी मामाच्या गावी गेल्यावर केलेली धम्माल तुम्हाला आठवेल. सिनेमातल्या क्लायमॅक्स डोळ्यात पाणी आणतो.

दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंक्कटी यांचं दिग्दर्शन नाळ भाग 2 च्या आशय आणि विषयाला न्याय देणारं आहे. छोट्या छोट्या फ्रेम्सचा योग्य विचार सुधाकरने केलाय. याशिवाय जुन्नरच्या हिरव्यागार निसर्गाचा सुरेख वापर सुधाकर यांनी केलाय. त्यामुळे मोठ्या पडद्यावर हा निसर्ग पाहणं ही एक पर्वणी आहे.

नाळ भाग 2 संपूर्णपणे खांद्यावर पेललाय तो सिनेमातल्या बालकलाकरांनी. आणि विशेष म्हणजे चिमीच्या भूमिकेत असलेल्या त्रिशा ठोसरने. किती गोड काम केलंय या मुलीने हे तुम्हाला सिनेमात जाणवेल. तिचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचं रुसणं, भावासाठीची काळजी अशा अनेक भावना त्रिशाने खूप सुंदर साकारल्या आहेत. इतक्या लहान वयात त्रिशाच्या अभिनयातील समज पाहून अवाक् व्हायला होतं. त्रिशाचा अभिनय पुढे अनेक वर्ष सर्वांच्या लक्षात राहील.

नाळ मध्ये दिसलेला छोटा चैत्या म्हणजेच अभिनेता श्रीनिवास पोकळे भाग 2 मध्ये मोठा झालाय. श्रीनिवासने सुद्धा मस्त काम केलंय. बहिणीचं प्रेम मिळवण्यासाठीची तगमग, धडपड श्रीनिवासने मस्त दाखवलीय. आणखी एक विशेष उल्लेख म्हणजे मणी झालेल्या भार्गव जगतापचा. खऱ्या आयुष्यातही दिव्यांग असलेला भार्गव सिनेमात कमाल काम करतो. मुळात या तिघांकडुन सुंदर काम करवून घेणाऱ्या दिग्दर्शकाचं कौतुक करावं तितकं कमी. याशिवाय नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी अशा कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केलाय. लहान मुलांचं भावविश्व उलगडणारं ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत कमाल.

कसंय ना, नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनात वय वाढल्यावर अनेक गोष्टींसाठी स्वार्थ दडलेला असतो. कधी नोकरीचा, कधी पैशांचा, कधी प्रॉपर्टीचा वैगरे. लहानपणी एकमेकांना जीवापाड जपणारी भावंडं मोठे झाल्यावर एकमेकांच्या वाईटावर टपून बसलेले असतात. त्यामुळे नाळ भाग 2 आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पाडतो. पुन्हा एकदा डोळ्यांसमोर निरागस विश्व उभं करतो. आणि आपण त्यात काही क्षण रमतो. बास्स! हेच नाळ भाग 2 च यश म्हणावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT