नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड'(Jhund) सिनेमा ४ मार्च,२०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. नागराजचा बॉलीवूडमधील हा पहिलाच सिनेमा. आणि पहिल्याच सिनेमात अभिनेता म्हणून बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) काम करणार मग चर्चा तर होणारच ना. त्यात सिनेमाचं कथानक नागराजच्या परंपरेप्रमाणे सत्य घटनेपासून प्रेरित. पुन्हा वंचित असलेल्या समाजावर भाष्य करणारं कथानक. असं सगळ्याच दृष्टीनं भारलेला 'झुंड' अखेर रिलीज झाला अन् समिक्षकांपासून नागराजच्या चाहत्यांपर्यंत ते थेट सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांपर्यंत साऱ्यांनीच सिनेमावर कौतूकाचा वर्षाव केला. परफेक्शनिस्ट आमिरनं तर थेट म्हटलं की नागराजच्या 'झुंड'ने माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीला लाथ मारत भिरकावून दिलंय. सिनेमा पाहून गहिवरुन आलेला आमिरही सगळ्यांनी पाहिला असेल.
पण असं असतानाही जसं नागराजच्या झुंडच्या बाबतीत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच वाईटही येतायत बरं का. कुणी म्हणतंय,' एवढा डंका पिटला,बॉक्सऑफिसवर कुठे काय कमाल दाखवलीय?'. तर कुणी नागराज नेहमी वंचितांवरचेच सिनेमे का बनवतो असा तिरकस प्रश्न केला आहे. तर कुणी म्हटलंय,'वंचितांवरचा सिनेमा मग अमिताभना का घ्यायचं,मोठेपणासाठी?' तर कुणी मराठीत का सिनेमा काढला नाही असं म्हणत नाकं मुरडली आहेत. आता हे चांगले-वाईट प्रतिक्रिया देणारे दोन गट पडलेयत सोशल मीडियावर. पण या अशा सोशल मीडियावरील प्रतिक्रियांना आपण भाव देत नाही असा पलटवार नागराज मंजुळेंनी केला आहे.
सकाळ मीडिया ग्रुपच्याच साम मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं चक्क म्हटलं आहे की,'' सोशल मीडियाला चेहरा नाही आणि डोकंही नाही. ज्यांना माझ्या सिनेमाविरोधात काही बोलायचं असेल त्यांनी माझ्या समोर येऊन बोलून दाखवावं. सोशल मीडिया मशीन आहे. जिथे अर्वाच्य भाषेत बोललं जातं. एकमेकांना समजून-उमजून पुढे जावं लागणार आहे. मला जे सिनेमातनं मांडायचं होतं ते मी मांडलंय. आता त्याला वेगळी पुरवणी जोडण्याची काय गरज आहे?'' नागराजच्या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश ठोसर,रिंकु राजगुरू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची पहिल्या चार दिवसांची कमाईदेखील सात एक कोटींपर्यंत पोहोचलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.