राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. या घटनेनंतर किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने अनेकांनी सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांसोबतच काही राजकीय नेत्यांनीही ट्विट करत किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे.
किरण मानेंची उपरोधिक पोस्ट-
जीभ कापली तर मी अश्रूंनी गाईन, मला गाढून टाकलं तर मी एका बीजाप्रमाणे आहे, जो वृक्ष म्हणून तयार होईल, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवरही अनेकांनी या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे.
'शरद पोंक्षे, आरोह वेलणकर हे उघडपणे राजकीय भूमिका घेतात. त्यांना कधी नाटक-मालिकेतून काढून टाकलं जात नाही. पण दिल्लीतील शेतकरी आंदोलन व इतर विषयांवर व्यक्त झाले की किरण मानेंसारख्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकलं जातं. याला विरोध झाला पाहिजे व मानेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे,' असं ट्विट एकाने केलं. तर काहींनी स्टार प्रवाह वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया-
'किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे,' असं ट्विट काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे. दुसरीकडे 'तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून मालिकेतून काढण्यात आलं. पण महाराष्ट्रात कलाकारांनी टीका केली तर त्यांच्या विचारांचा आदर, सन्मानच केला असल्याचाही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
किरण मानेंची प्रतिक्रिया-
किरण माने यांनी 'सकाळ'शी बोलताना म्हटलंय की, "ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो." मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. पण आता लोकांनी ठरवायचंय की, आपण आता काय करायचंय, असंही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.