Nitin Chandrakant Desai Death Hemant Bhatkar share Birthday : ‘नितीनदादा आपला वाढदिवस नेहमीच साधेपणाने साजरा करायचे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी आम्ही सहकारी त्यांना सरप्राईज वाटेल अशी भेट द्यायचो. त्यांच्याच एखाद्या सेटचा केक आम्ही तयार करायचो आणि वाढदिवशी त्यांना तो भेटीदाखल द्यायचो. आमची ती भेट पाहून ते आश्चर्यचकित व्हायचे. आमच्या सगळ्यांचे कौतुक करायचे. मात्र, त्यांनी अशी अचानक एक्झिट घेऊन आम्हा सगळ्यांना धक्काच दिला आहे.
आमचा विठ्ठल गेला आहे. आम्ही पोरके झालो आहोत. आज त्यांचा वाढदिवस; पण तो आमच्यासाठी ब्लॅक संडे ठरणार आहे... नितीन देसाई यांच्यासोबत तब्बल २३ वर्षे सहायक कलादिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या हेमंत भाटकर यांचा कंठ दाटून आला होता. देसाई यांच्या वाढदिवसाबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.
ऑगस्ट म्हणजे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा वाढदिवस. तो काही दिवसांवरच आला असतानाच अचानक त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि सगळ्यांना धक्का दिला. हेमंत भाटकर आणि देसाई यांची २३ वर्षांची सोबत होती. ते त्यांच्यासोबत सहायक कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.
नितीनदादांच्या आठवणींबाबत भाटकर यांनी सुरुवातीला काहीही बोलण्यास नकार दिला. दादांच्या चाहत्यांसाठी काही तरी बोला, अशी विनवणी करताच हळूहळू त्यांनी आठवणी सांगण्यास सुरुवात केली. दादांविषयी बोलताना ते भावुक झाले. ‘मागील वर्षी आम्ही दादांचा वाढदिवस एन. डी. स्टुडिओत साजरा केला. दादांनी ‘महाराणा प्रताप’ या मेगासीरिजचे काम हाती घेतले होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्या सीरिजचा एक बॅनर बनविला. त्यावर दादांचे आणि सैनिक म्हणून आमच्या सर्वांचे फोटो होते. तो बॅनर पाहून दादा कमालीचे आनंदित झाले.
आम्ही सगळ्यांनी एकत्रित केक कापला आणि स्टुडिओत वाढदिवस साजरा केला... मला आजही आठवते की दादांनी जेव्हा एन. डी. स्टुडिओ उभारला तेव्हाही आम्ही त्यांचा वाढदिवस डामडौलात साजरा केला होता. तेव्हा अनेक मंडळी जमली होती. त्यानंतर दादांच्या वाढदिवसाला आम्ही सहल आयोजित करायचो आणि तिथे त्यांचा वाढदिवस साजरा करायचो. दादा नको नको म्हणायचे, तरीही आम्ही त्यांना सरप्राईज द्यायचो,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमचा स्टुडिओ सुना असेल!
जेव्हा ही दुःखद घटना घडली तेव्हा हेमंत भाटकर वाराणसीहून नुकतेच परतले होते. तिथे ते एका प्रोजेक्टच्या कामाला गेले होते. लगान, देवदास, जोधा अकबर आदी चित्रपटांसाठी त्यांनी दादांसोबत सहायक कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ते सांगतात, ‘आमचे दादा अत्यंत हुशार आणि कल्पक बुद्धी असलेले होते. उत्तर प्रदेशला जाण्यापूर्वी दादांनी आपल्याला लालबागमध्ये एका बैठकीसाठी जायचे आहे, असे सांगितले होते. आता दादा आणि त्यांचे ते शब्द माझ्या कायम स्मरणात राहतील. उद्या दादांचा वाढदिवस; पण आमचा स्टुडिओ सुना सुना असेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.