महाराष्ट्राच्या राजकारणानं (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे.(Planet Marathi new webseries...'Mee Punha Yein')
अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav), प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तेचं लालच, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे.
मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल". 'मी पुन्हा येईन' लवकरच प्लॅनेट मराठी या ऍपवर पाहायला मिळणार आहे, नुकतंच या सीरीजचा टीझर लाँच करण्यात आलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.