saamana editorial on actress kajol remark on indian politicians education trolling sanjay raut shivsena  
मनोरंजन

Kajol News : 'तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त…'; ठाकरे गटाकडून काजोलची पाठराखण

रोहित कणसे

सिनेक्षेत्रातील कलाकार सहसा राजकीय घडामोडींवर भाष्य करताना टाळतात. यादरम्यान बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने काजोलनं आपल्या देशातील नेते फारसे शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे व्हिजन नसल्याची खंत व्यक्त केली होती. काजोल हिने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं, यावरुन बराच गदारोळ झाला. तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यानंतर आता काजोलच्या या विधानावरून सामना अग्रलेखातून पाठराखण करण्यात आली आहे.

अग्रलेख जसाचा तसा…

देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा झाला आहे व त्यावरच अभिनेत्री काजोलने आपले परखड मत व्यक्त केले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने म्हटले. आपल्या देशातील अंधभक्तांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंधभक्तांनी असा समज करून घेतला की, काजोलने सध्याच्या दिल्ली सरकारवर आपले मत व्यक्त केले व त्यांनी काजोलला नेहमीप्रमाणे ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली.

आपल्या देशातील एक उच्चशिक्षित कलाकार लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगते व तसे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ‘ट्रोल धाडी’ त्या अभिनेत्रीवर तुटून पडतात. देशात वैचारिक बदलांची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे. कारण शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने सांगितले.

काजोलचे मत हे अनेकांच्या डोळ्य़ात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘‘आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकून पडलो आहोत. याचे कारण अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे. देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते. विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला शिक्षणामुळेच मिळते,’’ असे काजोलने सांगितले. यात तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त, समर्थक काजोलवर तुटून पडले.

काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच. पुन्हा शिक्षणासंदर्भात विचार देणारे महात्मा फुले याच मातीतले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. ते सांगतात,

विद्येविना मती गेली

मतीविना नीती गेली

नीतीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

वित्ताविना शूद्र खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले!

महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शहाणे व शिक्षित करण्यासाठी शर्थ केली. त्याच सावित्रीची लेक काजोल शिक्षणाची महती सांगत आहे. काजोलने शिक्षणाचे महत्त्व सांगितले, ते नेमके कुणाला व का झोंबले? तिने तर कुणाचेच नाव घेतले नव्हते.

देशातील विकास, शिक्षण, लोकशाही यावर तिला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, ‘‘शिका व संघर्ष करा.’’ अज्ञान हे घातक असते. अज्ञानातून अंधश्रद्धा व अंधभक्तांची पैदास वाढते. भारत देश सध्या या अंधारातून प्रवास करीत आहे. अंधभक्तांना काजोलचे वक्तव्य झोंबले. कारण त्यांच्यासमोर त्यांचे विश्वगुरू पंतप्रधान मोदींचे चित्र व चरित्र आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातमधील एका प्लॅटफॉर्मवर चहा विकत होते, पण ते ज्या गावात चहा विकत होते असे सांगतात, त्या गावात तेव्हा रेल्वेही नव्हती तर प्लॅटफॉर्म तरी कसा असेल? प्रश्न चहा विकणारा पंतप्रधान झाला हा नाही, तर पंतप्रधान त्यांची शैक्षणिक अर्हता लपवीत आहेत.

आपण उच्चविद्याविभूषित आहोत, हे दाखविण्यासाठी मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट ‘डिग्री सर्टिफिकेट’ जाहीर केले. पंतप्रधानांना शेवटी त्यांची डिग्री लपवून ठेवावी लागली व सर्वत्र त्यांचे हसे झाले. कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी ‘थाळय़ा व घंटा’ वाजवून कोरोना पळवून लावण्याचे आवाहन केले, कोणतीही पूर्वकल्पना न देता नोटाबंदी जाहीर केली व लोकांना रांगेत उभे करून मारले हे शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याचेच ‘झटके’ आहेत. पंतप्रधान मोदींचे सहकारी तर त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. हिंदूंनी चार पोरांना जन्म द्यावा. लोकसंख्या वाढवावी, असे मोदींचे मंत्री सांगतात. चार पोरांपैकी दोन ‘संघा’ला द्या असेही सांगतात. हे सभ्य व सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. मध्य प्रदेशात भाजपचा एक पदाधिकारी एका

गरीब मागासवर्गीय व्यक्तीच्या अंगावर लघुशंका करतो. मग त्या पीडित व्यक्तीस मुख्यमंत्री शिवराजमामा त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याची पूजा करतात. आता समजले की, ज्याची पूजा केली ती व्यक्ती कुणी वेगळीच होती. त्यामुळे मामांचे हसे झाले. हेच शिक्षण व शहाणपण नसल्याचे लक्षण. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करतात. भोपाळच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर हल्ला केला, पण लगेच दुसऱ्या दिवशी भाजपने अजित पवारांच्या गटास त्यांच्या भ्रष्टाचारासह स्वीकारले. शिक्षणाचा अभाव असल्याचेच हे लक्षण.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. तेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यापीठाच्या आवारात जाऊन काही क्षण तेथे ‘मौन’ उभी राहिली. तिने भाषण केले नाही, पण दीपिकाचे मौन हा संस्कार व शिक्षणाचा प्रभाव होता, पण त्यानंतर दीपिकावर झालेले असभ्य हल्ले, तिच्या चित्रपटांवरील बहिष्कार हे अज्ञान, अंधकारात देश चाचपडत असल्याचे लक्षण होते. आता देशाच्या शहाणपणावर प्रश्न निर्माण केल्याने अभिनेत्री काजोलही असभ्य, अज्ञानी लोकांच्या निशाण्यावर आली. या देशात सध्या शिक्षणावर बोलण्याची सोय राहिलेली नाही. धर्माचा गांजा ओढून शिक्षितही अंधभक्त बनले आहेत. त्यावर उपाय काय? काजोलने अंधभक्तांच्या डोळय़ांत ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त आंधळेच राहिले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT