satyashodhak marathi movie review sandeep kulkarni rajshri deshpande mahatma phule savitribai phule  SAKAL
मनोरंजन

Satyashodhak Review: 'ज्योती - सावित्री'चा जीवनप्रवास दाखवणारा 'सत्यशोधक' कसा आहे? वाचा हा रिव्ह्यू

ज्योती - सावित्रीची जीवनगाथा दाखवणारा सत्यशोधक सिनेमाचा रिव्ह्यू वाचाच

Devendra Jadhav

Satyashodhak Movie Review: वाचकांनो!! कसंय.. माहितीये का? आपण सध्याच्या काळात नकळतपणे जात, पंथ, धर्म अशा गोष्टींच्या गाळात अडकत चाललो आहे. ही दलदल इतकी भीषण आहे की जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा फार उशीर झाला असेल. आणि यातून बाहेर पडण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले असतील.

आपण ज्या समाजसुधारकांचे फोटो भल्यामोठ्या बॅनरवर सर्रास वापरतो त्यांचे विचार आपण किती अमलात आणतो, याचा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे. तुम्हाला वाटलं असेल की लेखक आम्हाला का ज्ञान पाजळतोय. निमित्त आहे सत्यशोधक सिनेमा.

महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातलं नव्हे तर संपूर्ण जगातलं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलीची पहिली शाळा उघडली हे आपल्याला ठाऊक आहे. पण त्यापलीकडे अनेक गोष्टी आहेत ज्या खऱ्या अर्थाने जाणून घेण्याची गरज आहे. ही संधी मिळते सत्यशोधक सिनेमातून.

काही सिनेमे समिक्षेपलीकडील असतात. ठराविक सिनेमांची चौकट मोडून हे सिनेमे आपल्या मनात घर करतात. अस्वस्थ करतात. आणि सिनेमा पाहून संपला तरीही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. खूप दिवसांनी मराठीत असा सिनेमा आलाय, जो आपल्यासमोर सध्याच्या बदललेल्या परिस्थितीचा आरसा दाखवतो. आणि आपण सध्या कोणत्या अनावश्यक गोष्टींमध्ये अडकलो आहोत याची जाणीव करून देतो.

सत्यशोधक सिनेमाची कथा वेगळी सांगण्याची गरज नाही.. महात्मा फुले यांच्या आयुष्यातले विविध पैलू सिनेमातून उलगडले आहेत. फार कमी बायोपिक असतात जे व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगाचा ठाव घेतात.

वरवर न दाखवता त्या माणसाच्या विचारांचं दर्शन घडवतात. सत्यशोधक असाच एक बायोपिक आहे. जो केवळ महात्मा फुले यांचं कार्य दाखवत नाही तर ज्योती - सावित्री विचाराने किती उत्तुंग होते, याचं प्रत्यय देतो.

एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे खूप दिवसांनी मराठी सिनेमात अस्खलित मराठी भाषा ऐकायला मिळाली. फुलेंचं अडीच तासाच्या एका सिनेमात मांडणं शक्यच नाही. पण दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.

फुलेंच्या चरित्राचा गाढा अभ्यास करून त्यांनी तो पडद्यावर कलात्मक पद्धतीने मांडला आहे. सत्यशोधक कुठेही रेंगाळत नाही. फुलेंच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना आणि त्यांचे प्रगल्भ विचार समर्पक पद्धतीने तो प्रेक्षकांसमोर मांडतो.

सत्यशोधक सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो तो म्हणजे कलाकारांच्या अभिनयाने. अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंच्या भूमिकेत केवळ उत्कृष्ट अभिनय केला नाही तर ती भूमिका आत्मसात केलीय. शेवटपर्यंत संदीप त्यांच्या अभिनयाने इतके खिळवून ठेवतात की एका क्षणी तेच महात्मा फुले जगत आहेत, असा भास होतो. इतके संदीप फुलेंच्या भूमिकेशी एकरूप झाले आहेत.

महात्मा फुलेंना साथ देणारी त्यांची अर्धांगिनी म्हणजे सावित्रीबाई. सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडेने सुद्धा उत्कृष्ट अभिनय केलाय. सावित्रीबाईंनी आयुष्यभर ज्योतीबांना अबोल तरीही खंबीर साथ दिली. त्यामुळे राजश्रीला सिनेमात संवाद कमी असेल तरीही डोळ्यांनी आणि हावभावांनी तिने सुंदर अभिनय केलाय. याशिवाय लहुजी वस्ताद यांच्या भूमिकेत सुरेश विश्वकर्मा सुद्धा लक्षात राहतात. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत.

तर शेवटी एवढंच सांगावं वाटतं... आपल्या सर्वांवर कळत - नकळतपणे जी भेदभावाची झापड निर्माण झाली आहे ती पुसण्याच काम सत्यशोधक सिनेमा करतो. ज्योती - सावित्रीच्या विचारांना समजून घ्यायचं असेल, याशिवाय मनोरंजनासोबतच बुध्दीला खाद्य हवं असेल तर सत्यशोधक आवर्जून बघावा. अडीच तास ज्योती - सावित्रीचा जीवनप्रवास आपल्याला प्रेरणा देतो, अवस्थ करतो आणि स्वतःपलीकडे बघायला भाग पाडतो एवढं नक्की!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT