अभिनयासोबतच आपल्या विचारांनी हिंदूंना संबोधित करणारे, सावरकरांची विचारधारा जपणारे अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या विधानाने कायमच चर्चेत असतात. त्यांची विचारधारा आणि राजकीय मते स्पष्ट असल्याने त्यांच्याविषयी अनेक मत मतांतरे आहेत. 'हे राम,नथुराम' हे त्यांचे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. परंतु गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक असल्याची टीका अनेकांकडून झाली. गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे समर्थन करणारे हे नाटक असल्याने अनेकांनी या नाटकावर बंदी आणण्याची मागणी केली. परंतु त्यावेळी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पोंक्षे यांना पाठींबा दिला. सध्या हे नाटक पोंक्षे यांनी थांबवले असले तरी व्याख्याने आणि चर्चासत्रे यातून ते सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवत आहेत. याच शरद पोंक्षे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. (Sharad Ponkshe Tweet on Raj Thackeray)
गुढीपाडव्यापासून आपल्याकडे मोठा राजकीय कल्लोळ सुरु झाला आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच हिंदुत्ववादी विचारांना त्यांनी पाठिंबा दिला. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अशी मागणी राज्य सरकारकडे केली. त्यांनतर राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाणे येथे 'उत्तरसभा' घेतली. या उत्तरसभेत यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. प्रत्येक आरोपांवर उत्तर दिले. इतकी टीका होऊनही या भाषणात राज यांनी हिंदुत्वाची कास सोडली नाही. मशिदीवरील भोंगे काढण्यावर ते ठाम राहिले. या भूमिकेवर एका विशिष्ट वर्गाकडून टीका होत असली तरी हिंदुत्ववादी विचारधारेचे आणि मशिदीवरील भोंग्यांचा त्रास होणारे मात्र राज यांना समर्थन देत आहेत.
असेच समर्थन अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिले. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांनी कौतुक करणारे ट्विट मंगळवारी रात्री ठाकरे यांच्या सभेनंतर केले. 'राज ठाकरे यांचे भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं आहे. बऱ्याच काळाने धारदार भाषण त्यांनी केले. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण केल्याने राजसाहेब धन्यवाद' असे ट्विट त्यांनी केले आहे.
मध्यंतरी शरद पोंक्षे कर्करोगाने ग्रस्त होते, त्यावेळी त्यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाले होते. प्रकृतीत सुधार येताच त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. 'हिमालयाची सावली' या नाटकातून ते पुन्हा रंगभूमीवर आले. सध्या ते मालिका, चित्रपट आई नाटकातून काम करत आहेत. स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत ते प्रमुख भूमिकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.