shivrayancha chhava 
मनोरंजन

Shivrayancha Chhava: ‘शिवराज अष्टक’ सुरु असताना अचानक ‘शिवरायांचा छावा’कडे का वळलात? दिग्पाल लांजेकर म्हणतात...

Shivrayancha Chhava: लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

priyanka kulkarni

मयुरी महेंद्र गावडे

Shivrayancha Chhava: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट आजपासून (16 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), भूषण पाटील (Bhushan Patil), रवी काळे (Ravi Kale), समीर धर्मधिकारी (Sameer Dharmadhikari), राहुल देव (Rahul Dev), विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर आदी कलाकारांची मोठी फौज या चित्रपटात आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. या निमित्ताने लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी मयुरी महेंद्र गावडे यांनी केलेली खास बातचीत.

दिग्पाल लांजेकर म्हणतात, "लहानपणापासूच मला अशा ऐतिहासिक गोष्टी वाचायला आवडतात"

‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’ हे सगळे ऐतिहासिक चित्रपट तुम्ही बनवले आहेत. असे चित्रपट बनवण्याचा विचार तुमच्या मनात नेमका कधी आला? या प्रश्नाचं उत्तर देताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, "लहानपणापासूच मला अशा ऐतिहासिक गोष्टी वाचायला तसेच ऐकायला प्रचंड आवडतात. तेव्हापासूनच मला या गोष्टी सांगायची सवय लागली. त्यामुळे कॉलेजदरम्यान जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा या गोष्टी अजूनच पक्क्या झाल्या. त्यानंतर मग असे सिनेमा मी करत गेलो. त्यावेळी मला माहीत नव्हतं की मी या क्षेत्रात पुढे काम करणार आहे. मला संधी मिळाली आणि मग मी माझ्या कामातून शिवचरित्र सांगण्याचा निर्णय घेतला."

‘शिवराज अष्टक’ या चित्रपट मालिकेचा तुम्ही संकल्प केला होता. असे असताना तुम्ही अचानक छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे वळलात. त्याचे कारण काय? असाही दिग्पाल लांजेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना दिग्पाल लांजेकर म्हणाले,"हा माझा क्रिएटिव्ह ब्रेक आहे. म्हणजे सुट्टी घेणं मला मान्य नाही आणि ‘चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट’ या न्यायाने थोडंसं सिंहावलोकन करण्यासाठी, तसेच थोड्या अर्थाने काम करण्याची पद्धत बदलून पाहण्यासाठी मी हे केलं आहे. शिवाय फार पूर्वीपासून माझी इच्छा होती की, शंभूराजांविषयी काही तरी करावं. तेवढ्यात निर्मात्यांकडूनच या संदर्भात मागणी आल्याने मी हे करायचं ठरवलं. ‘शिवरायांचा छावा’ केल्यामुळे ‘शिवराज अष्टक’ थांबले असं नाही. उलट यामुळे ते अजूनच जोमाने सादर होणार आहे. त्यातील चित्रपट लवकरच येणार आहेत.

पुढे दिग्पाल यांनी प्रश्न विचारण्यात आला,"छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा तुम्ही तीन भागांमध्ये सादर करत आहात, हे खरे आहे का? ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि त्यामध्ये नेमके काय असेल?" या प्रश्नाचं दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर दिलं, "महापुरुषांचे हे चरित्र दोन तासांत सादर करण्यासारखं नसतं. त्यामुळे अशा कथा तीन किंवा चार भागांमध्ये सादर कराव्या लागतात. त्यांच्या वयातले आणि कारकिर्दीतील वेगवेगळे टप्पे तीन भागांमध्ये दाखवता येऊ शकतात.अशातून ती संकल्पना पुढे आली. आता या चित्रपटाच्या पहिल्या भागात शंभू राजांनी छावा म्हणून हाती घेतलेला राज्य कारभार, तरुणपणी घेतलेले शिक्षण. त्याचप्रमाणे सरसेनापती हंबीरराव, बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणत्या आणि मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांच्यासारख्या तरुणांचा मेळ साधून त्यांनी स्वराज्याचे बल साधले. हे आपण या भागात पाहू शकतो. दुसऱ्या भागामध्ये कारकिर्दीचा पुढचा टप्पा येईल, ज्यांच्यामध्ये सखोल राजकारण आणि महान मोहिमा यांचा परामर्श घेतला जाईल. तिसरा भाग त्यांच्या संपूर्ण बलिदानाला समर्पित आहे."

संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भूषण पाटीलची निवड का करण्यात आली?

भूषण पाटील ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात संभाजी महाराज यांची भूमिका साकारीत आहे. तुम्हाला त्याच्यातील कोणते गुण आवडले? असा प्रश्न देखील भूषण पाटील यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर दिलं, "त्याचे डेडिकेशन हे मुख्य कारण आहे. तसेच त्याची महाराजांवरची श्रद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तो या भूमिकेसाठी योग्य आहे असे वाटले. आम्ही इतर कलाकारांच्या ज्या ऑडिशन्स घेतल्या,त्यात भूषण उजवा ठरला. यामुळे त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली."

मुलाखतीमध्ये दिग्पाल लांजेकर यांना प्रश्न विचारण्यात आला, "चित्रपटातील सगळ्या कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?" या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं, "खूपच छान अनुभव होता. सगळे कलाकार, त्यासोबतच पडद्यामागे काम करणारी टीम अतिशय मेहनती आहे. त्यामुळे काम करायला मजा आली. कठीण परिस्थितीतही त्यांनी माझी साथ सोडली नाही. ते कायमच माझ्यासोबत राहिले आणि म्हणूनच आम्ही हा चित्रपट पूर्ण करू शकलो. आता आम्ही हे जे चित्रीकरण केले त्यावेळी एका प्रसंगादरम्यान सगळ्या कलाकारांना तापलेल्या जमिनीवर चालत जायचं होतं आणि ते त्यांनी बिनदिक्कतपणे केलं. त्यावेळी त्यांना त्रास होत असूनसुद्धा त्यांनी न थांबता काम पूर्ण केलं."

46 डिग्री तापमानात केलं शूटिंग

"ऐतिहासिक चित्रपट करताना तुम्हाला कोणते अडथळे आले आणि तुम्ही त्यावर कशी मात केली?" असाही प्रश्न दिग्पाल लांजेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं, "आम्ही जेथे चित्रीकरण करत होतो तेथील तापमान 46 अंश डिग्री होते. त्यावेळी आम्हाला जास्तीत जास्त नैसर्गिक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पण भूषण आणि इतर कलाकारांनीदेखील खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे. प्रामुख्याने नैसर्गिक अडथळ्यांना सामोरे जाऊन सगळ्यांनी सहकार्य केले आणि उत्तम काम झाले."

मुक्ताई चित्रपटाबद्दल काय म्हणाले दिग्पाल लांजेकर?

"अलीकडेच तुम्ही ‘मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा केली. तुम्ही संत परंपरेकडे वळलात. त्याचे कारण काय?" असाही प्रश्न दिग्पाल लांजेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं,"संत परंपरा ही आताच्या काळाची गरज आहे. २०१८ मध्ये भारतामध्ये थिएटर ऑलिम्पिक झालं होतं. त्याचे उद्‍घाटन ‘मुक्ताई’ नावाच्या माझ्या एकल नाट्याने झाले होते. जे मुक्ताईच्या जीवनपटावर आधारित होतं. तेव्हापासूनच मला त्यावर चित्रपट काढायचा होता आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळे माझे क्रिएटिव्ह ब्रेकचे विषय आहेत. कारण त्यामुळे मलाही विचार करायला फ्रेश वाटतं. तसेच हे सगळं करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आता पुन्हा एकदा आपल्या समाजातील वातावरण भयभीत झालेले आहे. सर्वत्र नैराश्य, द्वेष, राग, चिडचिडेपणा वाढलेला दिसत आहे. अशा वेळी ज्ञानेश्‍वर तसेच मुक्ताई यांच्यासारखे चरित्रपट आपल्याला शांतीचा मर्ग दाखवतील. त्यामुळे हे सगळं करण्याचा आम्ही घाट घातला आहे. हा चित्रपट मुख्यत्वे तरुण पिढीसाठी आहे, की त्यांनी यातून बोध घ्यावा. ‘मुक्ताई’ चित्रपट झाल्यानंतर मी ‘शिवराज अष्टक’मधील चित्रपट पूर्ण करणार आहे."

पुढे दिग्पाल यांना प्रश्न विचारण्यात आला, "ऐतिहासिक चित्रपट बनवताना त्यासाठी बरंच संशोधन करावं लागतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?" या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं, "हो अगदीच. कोणतीही कथा आपण जेव्हा प्रेक्षकांसमोर मांडत असतो, त्यावेळी संबंधित ज्ञान किंवा त्या विषयाची अधिक माहिती आपल्याकडे असणे नक्कीच गरजेचं असतं. या संशोधनासाठी विषयाशी संबंधित अनेक साधन ग्रंथ असतात. कागदपत्रे असतात. पत्रव्यवहार असतात, याचा आधार घेतला पाहिजे. कादंबऱ्यांचा आधार घेऊ नये, असं मला वाटतं."

"तुम्ही एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आहात. यापैकी तुमचं आवडतं क्षेत्र कोणतं?" असाही प्रश्न दिग्पाल लांजेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं, "मला लेखन करायला आवडतं. कारण हे काम खूप चॅलेंजिंग असतं. कारण लेखकाच्या पुढे असणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती असतं काय करायचं असतं ते. पण लेखकाच्या समोर असतो तो फक्त कोरा कागद. त्यामुळे मला लेखन काम करायला खूप जास्त आवडतं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT