Scam 2003 The Telgi Story Review  esakal
मनोरंजन

Telgi Review : लोभी वृत्तीची मनोरंजक, सुरस कथा !

सकाळ वृत्तसेवा

‘स्कॅम १९९२’ मध्ये शेअर मार्केटमधील हर्षद मेहताच्या आर्थिक घोटाळ्याची कथा सादर केल्यानंतर या वेबसिरीजचा दुसरा सीजन स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे.

अब्दुल करीम तेलगी या घोटाळेबाज व्यक्तीने काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांना हाताशी घेऊन जवळपास ३० हजार कोटींचा आर्थिक घोटाळा कसा केला याची कथा नव्या सीजनमध्ये दाखवण्यात आली आहे.

सध्या या सीजनचे पाच भाग सोनी लिव्हवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. कर्नाटकातील खानापूर येथे ८० च्या दशकाच्या सुरुवातीला अब्दुल करीम तेलगी (गगन देव रियार) या रेल्वेतील फळविक्रेत्याकडे शौकतभाई (तलत अजीज) यांचं लक्ष जातं.

विशिष्ट पद्धतीने विक्री करणाऱ्या तेलगीच्या संभाषण कौशल्यावर प्रभावित होऊन शौकतभाई त्याला मुंबईत येण्यासाठी प्रवृत्त करतात. हलाखीच्या परिस्थितीत जगणारा तेलगी शौकतभाईच्या गेस्टहाऊसमध्ये काम करण्यासाठी मुंबईला येतो. त्याच्या हुशारीमुळे गेस्ट हाऊसची कमाई चौपट वाढते. शौकतभाईची मुलगी नफिसाशी (सना अमीन शेख) तेलगीचा निकाह होतो. त्यानंतर काही वर्षांसाठी तेलगी आखाती प्रदेशात नोकरीसाठी जातो, पण कुटुंबाच्या ओढीमुळे पुन्हा भारतात परततो.

आखाती देशात राहण्याच्या अनुभवाचा वापर करून तेलगी तिकडे नोकरीसाठी जाणाऱ्या कामगारांना खोटी कागदपत्रे बनवून द्यायला सुरुवात करतो, परंतु लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडतो. अटक झाली असताना जेलमध्ये त्याची ओळख कौशल झवेरी (हेमंग व्यास) या ठगाशी होते.

कौशल वापरलेले स्टॅम्प पुन्हा नव्यासारखे करून बाजारात अवैधरीत्या विकत असतो. तेलगीही त्याला सामील होतो, पण लवकरच त्याच्या लक्षात येतं, की स्टॅम्पपेक्षा खरा फायदा हा स्टॅम्प पेपर विकून मिळू शकतो. यानंतर तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची सुरुवात होते.

करन व्यास, किरण यज्ञोपवित आणि केदार पाटणकर यांनी सिरीजचं लेखन केलं आहे; तर दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार हिरानंदानी यांनी पार पाडली आहे. ‘शो रनर’ असणारे हंसल मेहता यांच्या देखरेखीखाली सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे.

मूळ कथा संजय सिंग यांच्या ‘तेलगी स्कॅम-रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावरून प्रेरित आहे. ८० व ९० चा काळ उभा करण्यात प्रॉडक्शन डिझायनर मधुसूदन यांना बऱ्यापैकी यश आलं आहे. सिरीजचं लेखन व संकलन लयबद्ध कथा सादर करण्यात अपयशी ठरतं. खास करून पहिल्या भागातील तेलगीचा मुंबईला येण्याचा आणि तिथे प्रगती करण्याचा प्रवास त्रोटकपणे दाखवला जातो.

नफिसा आणि तेलगीमधील नातं अजिबातच प्रस्थापित होत नाही. मुकेश छाब्रा यांचं कास्टिंग मात्र उत्तम जमून आलं आहे. तेलगीच्या मुख्य भूमिकेत गगन देव रियार शोभून दिसतो. चेहऱ्यावर हसू ठेवून आपला हेतू साधणाऱ्या तेलगीचा कावेबाजपणा गगनने उत्तम साकारला आहे. खरं तर संपूर्ण सिरीजच त्याच्या समर्थ अभिनयाने प्रेक्षणीय झाली आहे.

सिरीजमध्ये बऱ्याच मराठी अभिनेत्यांनी लक्षणीय काम केलं आहे. नंदू माधव, शशांक केतकर, समीर धर्माधिकारी, भरत जाधव अशा अनेक अभिनेत्यांनी आपली छाप सोडली आहे. सिरीजमधील स्त्री व्यक्तिरेखा मात्र फारशा लक्षात राहत नाहीत. नफिसा, गरिमा तळपदे अशा महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पहिल्या पाच भागांत तरी सखोल लिहिल्या गेल्या नाहीत. ‘स्कॅम १९९२’ ची परिणामकता ‘स्कॅम २००३’ अजून तरी दाखवू शकलेला नाही.

तरीही उत्तम अभिनयाने या सीजनला तारलं आहे असं म्हणण्यास वाव आहे. सध्या सिरीजचे केवळ पाच भाग प्रेक्षकांसमोर आणले गेलेत आणि उरलेले भाग नंतर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे तेलगीची ही कथा आता पुढे काय वळण घेते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना किमान दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.

युवराज माने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT