दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये, ओटीटीवरील हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे प्रियामणी (Priyamani). 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या वेब सीरिजमधील प्रियामणीची भूमिका चांगलीच गाजली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य लोकांना कशा पद्धतीने दाखवलं जातं, याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. केरळ किंवा चेन्नईमधल्या लोकांना हिंदी नीट बोलता येत नसल्याचंच बॉलिवूडमध्ये दाखवलं आहे, असं ती म्हणाली.
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, 'अखेर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलेला सर्वत्र ओळख मिळू लागली आहे. एकेकाळी श्रीदेवी, रेखा, हेमा मालिनी, वैज्यंतीमाला यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलिवूड गाजवलं. मात्र त्यांच्यानंतर एक पोकळीच निर्माण झाली होती. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये हिंदी भाषिक कलाकारच केरळ किंवा चेन्नई इथल्या दक्षिण भारतीयांचं चित्रण करायचे. ते त्यांना सर्वसामान्य पद्धतीने हिंदी न बोलणारी लोकं म्हणून चित्रित करायचे. अय्यो, कैसा जी, क्या बोलता जी अशी भाषा ते वापरायचे. असे असंख्य चित्रपट मी पाहिले आहेत आणि तेव्हा माझ्या डोक्याच हाच विचार असायचा की, दाक्षिणात्य लोक अशा पद्धतीची हिंदी बोलत नाहीत. पण कदाचित, हिंदी भाषिकांनी तसा विचार केला असावा. कदाचित त्यांना असे काही लोक भेटले असतील जे असे हिंदी बोलत असतील. ठराविक काळानंतर हे सर्व थांबलं आणि दक्षिणेकडील तंत्रज्ञांना बॉलिवूडमध्ये आणण्यास सुरुवात केली. अनेक दक्षिण भारतीय तंत्रज्ञांनी बॉलिवूडमध्ये येऊन यशस्वीपणे आपली छाप पाडली. आता मला खूप आनंद होत आहे की, अखेर साऊथच्या टॅलेंटला बॉलिवूडमध्येही ओळख मिळत आहे आणि साऊथच्या स्टार्सनाही त्यांचा हक्क मिळत आहे.'
प्रियामणीने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील एका गाण्यातही ती झळकली. 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनमध्ये प्रियामणीने अभिनेता मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रियामणीने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.