robert de niro 
मनोरंजन

७० वर्षांचा इंटर्न

वयाची साठी ओलांडल्यानंतर तुमच्याकडे करण्यासारखं काहीच खास असं उरलं नसेल तर?

स्वाती वेमूल

आपल्यापैकी अनेकजण असे असतील, ज्यांनी पुढील पाच, दहा, पंधरा किंवा वीस वर्षांची प्लॅनिंग करून ठेवली असेल. करिअर, कुटुंब, वैयक्तिक आयुष्य या विविध पातळींवर आपण कुठे असू, याचा विचार कधी ना कधी केलाच असणार. पण वयाची साठी ओलांडल्यानंतर काय करत असू, हा विचार कधी मनात डोकावलाय का? आता अनेकजण असंही म्हणतील की, इथे पुढच्या क्षणी काय होईल याची शाश्वती नाही आणि तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतरचं विचारताय. पण खरंच जर वयाची साठी ओलांडल्यानंतर तुमच्याकडे करण्यासारखं काहीच खास असं उरलं नसेल तर? तेव्हासुद्धा तुम्ही आयुष्याकडे आजच्याच इतक्या जिज्ञासू वृत्तीने पाहाल का, प्रत्येक लहानसहान गोष्ट तेवढ्याच आवडीने शिकून घ्याल का किंवा अगदीच शून्यापासून काही गोष्टींचा अनुभव घ्यायला तयार होणार का? 'द इंटर्न' हा चित्रपट याच गोष्टींवर विचार करायला भाग पाडतो. विचार करायला भाग पाडतो म्हणजे अगदीच डोक्याला ताण देऊन पहावा लागेल, असा काही हा चित्रपट नाही. पण चित्रपटातील वयाच्या सत्तरीतला 'बेन' तुमच्या मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातो.

बेन व्हिटेकर Ben Whittaker हे या चित्रपटातील मुख्य पात्र आहे. सत्तर वर्षांच्या बेनच्या पत्नीचं निधन झालं आहे. फोनबुक तयार करणाऱ्या एका कंपनीत त्याने प्रामाणिकपणे नोकरी केली आणि निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेत मनसोक्त जगभ्रमंतीसुद्धा केली. वयाच्या सत्तरीतल्या बेनचा मी एकेरी उल्लेख का करतेय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, असं मी गृहीत धरते. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर बेन हे पात्र एक मित्र म्हणून तुमच्या विचारांत डोकावतो आणि मित्राप्रमाणेच काही गोष्टी नकळपणे शिकवून जातो. असंच एके दिवशी मार्केटमध्ये खरेदी करत असताना बेनला एक जाहिरात दिसते. एका ऑनलाइन फॅशन वेबसाइटला सीनिअर इंटर्न्सची गरज आहे, असं त्यात लिहिलेलं असतं. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती त्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात आणि ते अर्ज करण्यासाठी स्वत:चा एक व्हिडीओ अपलोड करायचा असतो. इंटर्नशिपच्या अर्जासाठी बेन जेव्हा व्हिडीओ शूट करतो, तेव्हाच तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. त्याला इंटरव्ह्यूसाठी ऑफिसमध्ये बोलावलं जातं आणि सीनिअर इंटर्न म्हणून त्याची निवडही केली जाते. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची संस्थापक जूल्स ऑस्टिनसाठी सीनिअर इंटर्न म्हणून बेनची निवड होते. इथूनच कथेत रंजक वळण येतं.

सुरुवातीला जूल्स ही बेनला फारसं महत्त्व देत नाही. सत्तरीतला व्यक्ती आपली फारशी मदत करू शकणार नाही, असा तिचा आविर्भाव असतो. मात्र अशाने बेनसुद्धा खचत नाही. ऑफिसमधल्या लहानसहान गोष्टी शिकण्यासाठी त्याची वृत्ती, आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असणाऱ्या सहकाऱ्यांशी त्याचं वागणं, बॉसच्या काही खासगी गोष्टी चुकून कानावर पडल्या तरी त्या इतरांना कळू न देणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सोपवलेलं छोट्यातलं छोटं काम अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करणं, या बेनच्या गोष्टी मनाला भावून जातात. कोणतंच काम कमी महत्त्वाचं न मानता अत्यंत निष्ठेने बेन दररोज काम करतो. या संपूर्ण प्रवासात बेन हा आपल्यातलाच एक खास व्यक्ती वाटू लागतो. बेन त्याच्या कामाने जूल्सचं मन जिंकतो.

अनेकदा आपल्यासमोर असणाऱ्या साध्या-सरळ गोष्टीसुद्धा आपण क्लिष्ट करून ठेवतो. करिअरसाठी धावपळ करत असताना स्वत:कडे आपण दुर्लक्ष करतो आणि समोर आलेला प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगायला विसरतो. बेन हे पात्र याच छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजपणे आपल्या लक्षात आणून देतो. जूल्ससाठी काम करत असताना अचानक एकेदिवशी बेनला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी समजतं. अशा वेळी बॉस आणि मैत्री या दोन्ही नात्यांचा मान राखत बेन कशा पद्धतीने परिस्थितीला आणि व्यक्तींना सामोरं जातो, हे खरंच कौतुकास्पद वाटू लागतं. कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी जूल्स कंपनीत नव्या सीईओची नियुक्ती करू पाहते. मात्र ज्या कंपनीला शून्यातून उभं केलंय, ते सर्व एका झटक्यात दुसऱ्या व्यक्तीच्या हाती सोपवणं तिला पटत नाहीये. अशा वेळी बेनचा दृष्टीकोन तुमच्या मनात त्याच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण करतो.

जसं मी या लेखाच्या सुरुवातीलाच म्हटलं की अगदी डोक्याला ताण देऊन पाहण्यासारखा हा चित्रपट नाही. छोटे-छोटे किस्से, लहानमोठ्या घटना आणि त्या प्रत्येक घटनांना सामोरं जाणारा बेन, हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. रॉबर्ट डी निरो या कलाकाराने बेन ही भूमिका साकारली आहे तर अॅनी हॅथवे यात जूल्सच्या भूमिकेत आहे. अवघ्या दोन तासांचा हा चित्रपट मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातो, हे निश्चित. या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारणार आहेत.

कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

SCROLL FOR NEXT