Udhayanidhi Stalin eSakal
मनोरंजन

Udhayanidhi Stalin : रॉम-कॉम हीरो ते द्रविड राजकारणातील नवा आयकॉन! कसा आहे उदयानिधी स्टॅलिनचा प्रवास?

Tamil Nadu Politics : दाक्षिणात्य राज्यांमधील राजकारण आणि चित्रपटसृष्टी हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे.

Sudesh

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयानिधी स्टॅलिन हे सध्या चर्चेत आहेत. याला कारण ठरलंय ते त्यांचं एक वक्तव्य. सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरियासारखा आहे, त्यामुळे तो समूळ नष्ट करायला हवा असं ते म्हणाले होते. यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र चर्चेत येणं ही उदयानिधीसाठी नवीन गोष्ट नाही.

दाक्षिणात्य राज्यांमधील राजकारण आणि चित्रपटसृष्टी हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे. कित्येक अभिनेते आणि फिल्ममेकर हे पुढे जाऊन मोठे नेते, मंत्री आणि मुख्यमंत्रीही झाले आहेत. उदयानिधी यांचे आजोबा करुणानिधी हेदेखील चित्रपट सृष्टीमधूनच पुढे आले, आणि तब्बल पाच टर्म तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले.

करुणानिधींनी एमके स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. मात्र, इतर ठिकाणी जसं नेपोटिझम चालतं, तसं हे आजिबात नव्हतं. स्टॅलिन यांना वयाच्या तब्बल 50 व्या वर्षी मंत्री म्हणून पुढे आणलं गेलं. याचा अर्थ असा नाही, की स्टॅलिन त्यापूर्वी राजकारणात नव्हते. त्यांनी पडद्यामागे राहून पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. यादरम्यान त्यांची स्वतःची लोकप्रियता देखील वाढत होती. त्यामुळेच स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आली, तेव्हा त्यांना भरपूर जनाधार पहिल्यापासूनच मिळाला होता.

स्टॅलिन यांनीदेखील आपल्या वडिलांप्रमाणेच, मुलाला उशीरा राजकारणात आणलं. त्यापूर्वी उदयानिधीची ओळख ही राजकारणी म्हणून नाही, तर एक हीरो आणि फिल्ममेकर अशी होती. करुणानिधींनीही अशीच सुरुवात केली होती. त्यामुळेच उदयानिधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार हे समजल्यानंतर, त्याचे सिनेमे देखील करुणानिधी यांच्यासारखेच असतील अशी अपेक्षा ठेवली जाणं स्वाभाविक होतं. मात्र, उदयानिधीने चक्क रोमँटिक-कॉमेडी चित्रपट करुन या अपेक्षेला तडा दिला होता.

करुणानिधी यांनी कित्येक सामाजिक विषय मांडणारे चित्रपट केले होते. राजकारणात उतरल्यानंतरही चित्रपटांच्या माध्यमातून आपला पॉलिटिकल स्टँड मांडणं त्यांनी सोडलं नाही. त्यांच्या चित्रपटांमधून जातीयवाद, वर्गवाद असे विषय हाताळले जात होते. राजकीय संदेश देण्यासाठी चित्रपटांचा वापर हा द्रमुकनेच सुरू केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

करुणानिधी यांच्या काळात तामिळ सिनेमाने ब्राह्मनिझम, उच्चवर्णीयांकडून होणारी पिळवणूक, फेव्हरिजम अशा गोष्टींवर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं. करुणानिधींच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी असणारा मंथिरी कुमारी (1950) हा चित्रपटातून जातीयवादाविरोधात संदेश देण्यात आला आहे. तर, पूम्पूहर (1964) या चित्रपटातील प्रमुख स्त्री पात्र आजही फेमिनिस्ट आयकॉन म्हणून ओळखलं जातं.

उदयानिधीचं असं नव्हतं. उदयानिधीचा हीरो म्हणून पहिला चित्रपट ओरु कल ओरू कन्नडी (2012) हा एक रोमँटिक कॉमेडी होता. यानंतर देखील त्याने 'इदु कथिरवेलन कादल' आणि नानबेंदा असे रॉम-कॉम चित्रपटच केले. आपल्या रेड जायंट मूव्हीज स्टुडिओच्या माध्यमातून उदयानिधी यांनी कित्येक चित्रपटांची निर्मिती देखील केली. मात्र, यातूनही रॉम-कॉम आणि मसाला चित्रपटांचीच भरणा होती.

गेल्या काही वर्षांपासून मात्र उदयानिधी यांच्या चित्रपटांमध्ये मोठा बदल दिसून आला. अगदी करुणानिधींप्रमाणे थेट नसले, तरी काही प्रमाणात सामाजिक विषय मांडणारे चित्रपट करण्यास त्यांनी सुरुवात केली. 2022 साली आलेल्या कालगा थलाईवन आणि नेंजुक्कू नीधी या दोन चित्रपटांमधून आपला पॉलिटिकल स्टँड दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. कालगा थलाईवन चित्रपटात राजकीय पक्षांवर असलेल्या कॉर्परेट कंपन्यांबाबत भाष्य करण्यात आलं होतं. तर नेंजुक्कू नीधी हा 'आर्टिकल 15' या चित्रपटाचा तमिळ रिमेक होता.

उदयानिधी यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट असणारा 'मामनन' हा चित्रपट जातीयवादाबाबत अगदी परखड भाष्य करतो. उदयानिधी यांच्याच रेड जायंट मूव्हीज या स्टुडिओने याची निर्मिती केली आहे. तर, सामाजिक भाष्य करणारे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मारी सेल्वराज याने मामननचं दिग्दर्शन केलं आहे. यावर्षी जून महिन्यात हा सिनेमा रिलीज झाला. मात्र, यापूर्वीच 2022 साली उदयानिधी यांनी हा आपला शेवटचा चित्रपट असणार असल्याचं घोषित केलं होतं. आता आपण राजकारण आणि तामिळनाडूची जनता यासाठी काम करणार आहोत, असं ते म्हणाले होते.

उदयानिधी यांच्या चित्रपटांमधील बदलामागे मोठं कारण होतं, त्यांचा राजकारणातील प्रवेश. 2019 साली द्रमुकचे स्टार प्रचारक म्हणून त्यांना पुढे करण्यात आलं. यानंतर त्यांनी वेळोवेळी भाजप आणि मोदींवर टीका केली. 2021 मध्ये ते आमदार म्हणूनही निवडून आले. चेन्नईमधील चेपॉक-थिरुवल्लिकेनी मतदार संघातून तब्बल 68,000 मताधिक्याने त्यांचा विजय झाला. 1996 ते 2011 पर्यंत हा मतदारसंघ करुणानिधी यांच्याकडे होता. त्यामुळे उदयानिधी यांचा विजय आणखी खास होता.

पक्षात आणि लोकांमध्येही लोकप्रिय

उदयानिधी हे केवळ एक लोकप्रिय अभिनेतेच नाही, तर चतुर राजकारणी देखील आहेत. करुणानिधी यांचा उत्तराधिकारी म्हणून स्टॅलिन यांची घोषणा झाल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. एम. के. अलागिरी आणि एम. के. स्टॅलिन या दोन भावांमधील संघर्ष अजूनही सुरू आहे. मात्र, उदयानिधींनी आपल्या काकांसोबत देखील चांगले संबंध ठेवले आहेत.

पक्षामध्ये उदयानिधी यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सभा घेणं, आंदोलने-मोर्चे करणं अशा माध्यमांतून त्यांनी आपला स्वतःचा वेगळा कार्यकर्ता वर्ग तयार केला आहे. स्टॅलिनचे पुत्र असल्यामुळे पक्ष पुढे उदयानिधी यांनाच मिळणार यात दुमत नाही. मात्र, आपण या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं उदयानिधी हे दिसू देत नाहीयेत. उदयानिधी हे पक्षाच्या युवा सेलचे प्रमुख आहेत. 2019 साली त्यांनी या पदावर काम सुरू केल्यानंतर, अवघ्या दोन वर्षांमध्ये सुमारे 22 लाख तरुणांना पक्षाशी जोडलं.

तामिळनाडूच्या राजकारणात द्रविड राजकारणाचा दबदबा गेल्या कित्येक वर्षांपासून राहिला आहे. गेल्या 56 वर्षांपासून तामिळनाडू राज्यावर द्रविड पक्षांचं राज्य आहे. करुणानिधी यांचा डीएमके नसेल तेव्हा जयललिता यांचा एआयडीएमके पक्ष सत्तेत राहिला आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 पैकी 170 जागांवर, आणि लोकसभेच्या 39 पैकी 30 जागांवर द्रविड मतदारच आपला नेता निवडतात.

अण्णाद्रमुकने भाजपसोबत युती केल्यापासून स्टॅलिन यांना असलेला द्रविडी मतदारांचा पाठिंबा वाढला आहे. याची झलक तामिळनाडूच्या गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आली. उदयानिधी यांना आधीपासून लोकांचा पाठिंबा होताच, त्यातच त्यांना मंत्रिपद देखील मिळालं आहे. त्यामुळेच आता द्रविड राजकारणाचा नवीन आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT