मुंबई : आपल्या विशिष्ट शैलीने तमाम रसिकांना मनमुराद हसविणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप (सय्यद जवाहर अली जाफरी) यांच्या पार्थिवावर माझगाव येथील कब्रस्तानमध्ये आज दुपारी दफनविधी करण्यात आले. या वेळी त्याचे मुलगे जावेद आणि नावेद तसेच नातू मिजान यांच्यासहित विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर, दिग्दर्शक अभिनय देव, शिवसेना चित्रपट सेना सचिव रवींद्र समेळ आदी मोजकीच मंडळी उपस्थित होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कित्येक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली.
जगदीप यांचे काल (ता. 8) रात्री साडेआठच्या सुमारास अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जावेद आणि नावेद जाफरी यांचे ते वडील होते. त्यांना मुस्कान नावाची एक मुलगीही आहे. बी. आर. चोप्रा यांच्या 'अफसाना' या चित्रपटापासून त्यांनी बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. 'फुटपाथ', 'दो बीघा जमीन', 'आरपार', 'नौकरी', 'हम पंछी एक डाल के', 'दो दिलों की दास्तां', 'दो भाई अनमोल मोती', 'खिलौना', 'वफा', 'भाई हो तो ऐसा', 'इन्सानियत', 'बिदाई', 'राणी और लाल परी', 'खान दोस्त', 'एक ही रास्ता', 'दुल्हन वही जो पिया मन भाए', 'कालिया', 'खून और पानी', 'करिश्मा', 'प्यार की जीत', 'शहेनशाह' अशा सुमारे चारशे चित्रपटांमधून भूमिका केल्या.
'मस्ती नहीं सस्ती' हा जगदीप यांचा अखेरचा चित्रपट ठरला होता. 2017 मध्ये आलेला हा चित्रपट अली अब्बास चौधरी यांनी दिग्दर्शित केला होता. 'शोले' चित्रपटातील सुरमा भुपाली ही त्यांची भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर त्यांनी 'सुरमा भुपाली' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आज सकाळी जगदीप यांचा मुलगा जावेद माझगाव येथील कब्रस्तानमध्ये त्यांचे पार्थिव घेऊन आला. जगदीप यांचा नातू मिजान हा गुजरातला गेला होता. तो आल्यानंतर काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत जगदीप यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
-----
संपादन ः ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.