Kalkoot Web Series sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : कालकूट : दमनामागच्या गुंत्याची उकल

एकतर्फी प्रेम किंवा प्रेमभंगातून मुलींवर अ‍ॅसिडहल्ला होण्यासारख्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता साधारण दहा वर्षांपूर्वी अ‍ॅसिडविक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

- युवराज माने

एकतर्फी प्रेम किंवा प्रेमभंगातून मुलींवर अ‍ॅसिडहल्ला होण्यासारख्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता साधारण दहा वर्षांपूर्वी अ‍ॅसिडविक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दुर्दैवानं तरीही असे हल्ले पूर्णपणे थांबलेले दिसून येत नाहीत.

खरं तर असे हल्ले होण्यामागे मुलींचा नकार पचवू न शकणारी पुरुषसत्ताक मानसिकता जबाबदार आहे. अशा मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या कथा गेल्या काही काळापासून ओटीटी माध्यमांवर दिसून येत आहेत. ‘कालकूट’ ही जिओ सिनेमावरील वेब सिरीज अशाच विषारी मानसिकतेवर आधारित कथा सादर करते.

उत्तर प्रदेशातील एका काल्पनिक गावात पोलिसाची नोकरी करणारा रविशंकर त्रिपाठी (विजय वर्मा) तीन महिन्यांतच भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून राजीनामा देण्याच्या तयारीत असतो. हेड कॉन्स्टेबल यादवला (यशपाल शर्मा) स्टेशन प्रभारी जगदीश सहाय (गोपाल दत्त) यांना आपला राजीनामा सुपूर्द करण्यासाठी रवी गळ घालतो. परंतु, राजीनामा मंजूर न करता सहाय दोघांना नुकत्याच अॅसिडहल्ला झालेल्या पारूल (श्वेता त्रिपाठी शर्मा) या युवतीची केस सोपवतो.

तिकडे रवीची आई (सीमा बिस्वास) त्याला लग्नासाठी मुली बघण्याची घाई करत असते. व्यावसायिक आणि वैयक्तिक आघाड्यांवर दोलायमान स्थितीत असणारा रवी या गुन्ह्याचा गुंता कशाप्रकारे सोडवतो, हे सिरीजच्या ८ भागांत मांडलं जातं.

सिरीजची पटकथा आणि संवाद अरुणभकुमार आणि करण त्यागी यांनी दिग्दर्शक सुमित सक्सेना यांच्यासमवेत लिहिलीय. मनीष भट यांच्या छायाचित्रणात लयीचा अभाव जाणवतो. गरज नसतानाही कॅमेरा सतत हलता ठेवणं आणि संवाद सुरू असताना अचानक व्यक्तिरेखेवर झूम करणं अशा क्लृप्ती वापरल्यानं दृश्याची परिणामकता कमी होते.

राघव अर्जुन यांचं पार्श्वसंगीत काही ठिकाणी संवादांना बाधा आणतं. सिरीजच्या सुरुवातीला पोलिस स्टेशनमधील महिला अत्याचारासंदर्भात असणाऱ्या प्रबोधनपर कार्यक्रमात विनाकारण विनोदनिर्मितीचा प्रयत्न केल्यानं दृश्याचा प्रभाव पडत नाही. इथं दिग्दर्शकाचं नवखेपण जाणवतं. बऱ्याच ठिकाणी व्यक्तिरेखा संवाद बोलत असताना जी कृती करत असते त्याचा ताळमेळ बसत नाही.

उदाहरणार्थ, स्टेशनमध्ये रवी शिडीवर चढत असताना त्याचे आईबरोबर सुरू असणारे संभाषण किंवा बॅडमिंटन खेळत असताना यादवचं वरिष्ठ अधिकाऱ्याला केससंदर्भात महत्त्वाची माहिती देणं फारसं पटत नाही. पटकथेत अनेक धागेदोरे निसटलेले जाणवतात. उदाहरणार्थ, सुरुवातीस राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत आलेला रवी त्यानंतर त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही.

एखाद्या संशयिताची जितक्या चटकन चौकशी होते, तितक्याच लवकर त्यावरून पोलिसांचं लक्ष हटतं. चौकशीदरम्यान आणि चौकशीनंतर कोणत्याही संशयितावर नजर ठेवली जात नाही, हे पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या विपरीत वाटते. सिरीजचा शेवटही एखाद्या मसालापटाप्रमाणे अतिरंजित वाटतो.

अभिनयात विजय वर्मा नेहमीप्रमाणे उत्तम कामगिरी करतो. रवीची हळवी बाजू साकारतानाच अ‍ॅसिड केस सोडवण्याचा ध्यास विजय प्रखरतेनं पडद्यावर मांडतो. त्याला यशपाल शर्मा आणि गोपाल दत्त यांची समर्थ साथ लाभते. रवीच्या आईच्या भूमिकेत सीमा बिस्वास लक्षात राहते.

श्वेता त्रिपाठी या गुणी अभिनेत्रीला मात्र फारसा वाव मिळालेला नाही. पीडित मुलीची मुख्य भूमिका असूनही पटकथेत तिची व्यक्तिरेखा दुबळी राहिली आहे. ‘कालकूट’ या सिरिजचा उद्देश स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं असा असला, तरी दुर्दैवानं ढिसाळ लिखाणामुळे या सिरीजमधील स्त्री व्यक्तिरेखांवरच दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं.

उलटपक्षी स्त्रियांवर अन्याय करणारे पुरुष, त्याविरुद्ध वाचा फोडणारेही पुरुष आणि अन्यायाचं निर्मूलन करणारेही पुरुषच असा काहीसा दुटप्पी प्रकार इथं बघायला मिळतो. त्यामुळेच हेतू चांगला असला, तरी म्हणावा तितका प्रभाव पाडण्यात सिरीजला यश येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT