Devidas Saudagar sakal
मराठवाडा

Devidas Saudagar : आयुष्य जगण्याचे वास्तव खुणावत राहते;साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले देविदास सौदागर यांच्याशी संवाद

शिवणकाम करीत लेखन करणारा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा युवा लेखक देविदास सौदागर यांना ‘उसवण’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. शिंप्याच्या संघर्षाच्या वास्तवाची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिवणकाम करीत लेखन करणारा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा युवा लेखक देविदास सौदागर यांना ‘उसवण’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. शिंप्याच्या संघर्षाच्या वास्तवाची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मराठवाड्याच्या मातीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर देविदास सौदागर यांच्याशी साधलेला संवाद.

- सुशांत सांगवे, लातूर

अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे. मनात काय भावना आहेत?घरात पिढ्यान् पिढ्या हलाखीची परिस्थिती होती. अजूनही ती फारशी सुधारलेली नाही. अशा वातावरणात राहून वाचन, लेखनाचा छंद मला जोपासता आला. त्यातूनच जगण्याची गोष्ट ‘उसवण’मधून मांडता आली. यासाठी घेतलेल्या कष्टाची नोंद ‘साहित्य अकादमी’ने घेतली, याचा निश्चितच आनंद आहे. खरंतर एका सामान्य घरातील तरुणासाठी ही एक अविस्मरणीय घटना आहे.

आपण शिवणकाम करता, मग लेखनाकडे कसे वळलात?

पूर्वी घरात मनोरंजनाची कुठलीही साधने नव्हती. साधा रेडिओसुद्धा नव्हता. शाळेत वर्तमानपत्र यायची. रविवारच्या पुरवण्या असायच्या. त्या मी नियमित वाचत असे. अण्णा भाऊ साठे, वि. स. खांडेकर यांच्यापासून ते विश्वास पाटील, आसाराम लोमटे अशा मोठ्या लेखकांची पुस्तके वाचण्याचा छंद मला लागला. शाळा-महाविद्यालयात शिकत असताना अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांच्या प्रेमातच पडलो. त्यांची अनेक पुस्तके वाचली. आपल्यालाही असे वास्तव जगणे, सर्वसामान्यांचा संघर्ष लिहिता येतो का? असे सारखे वाटू लागले आणि त्यातूनच मी पुढे लेखनाकडे वळलो.

कवितेतून व्यक्त होणे सोपे वाटते की कादंबरीतून? कोणता साहित्यप्रकार जास्त भावतो?

माझे ‘कर्णाच्या मनातलं’, ‘काळजात लेण्या कोरताना...’ ही दोन कवितासंग्रह प्रकाशित झाली आहेत. कवितांवरही माझा तितकाच जीव आहे. कवितेतून सुख, दुःख अशा भावना आपण मांडू शकतो. पण, कवितेतून व्यक्त होण्याला काही मर्यादा येतात. एखादी दीर्घ गोष्ट सांगायची असेल तर कथा किंवा कादंबरी हा साहित्यप्रकार आपल्याला स्वीकारावा लागतो. पण, दोन्ही साहित्यप्रकार मला तितकेच महत्त्वाचे वाटतात.

- उसवण ही कादंबरी कशी जन्माला आली?

माझे आजोबा आणि वडीलही शेतमजूर. पण, वडील नंतर शिवणकाम शिकले. पुढे मलाही शिकवले. मी शिक्षण पूर्ण करत शिवणकाम करू लागलो. एम. ए. पूर्ण केले; पण नोकरी मिळेल असे वाटले नाही म्हणून पुन्हा शिवणकाम करू लागलो. हा उद्योग सांभाळताना यासमोरील आव्हाने मला दिसत गेली. रेडीमेड (तयार) कपड्यांचा व्यापार वाढल्याने गावोगावी शिवणकाम करणारे कामगार किती अडचणीत आले आहेत, त्यांच्या घरात रोज चूल पेटत आहे की नाही, त्यांचा उदरनिर्वाह कसा सुरू आहे, हे मला जवळून दिसू व जाणवू लागले. त्यांचा जगण्याचा संघर्ष मी ‘उसवण’मध्ये शब्दबद्ध केला आहे. हे माझे आत्मकथन नाही. मात्र, यात आलेले अनुभव नक्कीच आहेत. शिंप्याच्या जगण्याचे वास्तव सांगणारी ही कादंबरी आहे.

- सध्या कुठल्या विषयावर लेखन सुरू आहे?

बेरोजगारी हा विषय मला सध्या खुणावतो आहे. त्यावर माझे काम सुरू आहे. एका बेरोजगार युवकाचे लग्न जमणेसुद्धा किती अवघड झाले आहे, हे आपण सध्या पाहत आहोत. हेच त्या कादंबरीचे सूत्र आहे. बेरोजगार तरुणाची सध्याची वास्तव स्थिती, तो कोणकोणत्या मानसिक संकटांना सामोरे जात आहे, यावरही ही कादंबरी आधारलेली असेल.

ग्रामीण जीवन साहित्यात उमटताना दिसते आहे का?

ग्रामीण जीवन हे जितक्या प्रकर्षाने मराठी साहित्यात उमटायला हवे, तितक्या प्रकर्षाने उमटताना दिसत नाही. जे तरुण खेड्यात राहत आहेत त्यांना शेती करावी लागत आहे आणि शेती परवडत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. म्हणून पोटापाण्यासाठी काही तरुणांना पुण्या-मुंबईकडे जावे लागत आहे. स्थलांतर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गावांतील तरुणांची संख्या कमी होत असल्याचे अनेक बदल ग्रामीण भागात होत आहेत. ते साहित्यात उमटत आहेत, असे नाही.

पुस्तक वाचनाची चळवळ वाढावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. ही चळवळ नेमकी काय आहे?

नवी पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे वाचन कमी झाले आहे. या तरुणांना पुन्हा वाचनाकडे वळवणे हे एक आव्हान आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. यात आपल्याला काय योगदान देता येईल, असा मी विचार केला आणि एक पुस्तक विक्री केंद्र सुरू केले. सध्याच्या काळात वाचकाला पुस्तक सहज मिळावे, चांगले पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावे हा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT