छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले आहे. तर कारमधीलही दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड जवळ लेंभेवाडी फाट्यानजीक रविवारी (ता. सात) सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली असून घटनेनंतर कारचालक व अन्य एक जण जखमी अवस्थेत घटनास्थळाहून पसार झाले. मृत हे छत्रपती संभाजीनगर येथे सहा महिन्यापासून वकिली करीत होते.
यासंबंधी अधिक माहिती अशी, पाथरवाला ह.मु .अंकुशनगर (ता. अंबड) येथील ॲड. सतिश शाहू मगरे (वय 32 वर्ष) व तेजल सतिश मगरे (वय 28 वर्ष) हे दोघे पतीपत्नी त्यांच्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अंकुशनगर येथे आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून ते रविवारी (ता. सात) सायंकाळी पावणेसहा वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकीने जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी शिवारात छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. यात ॲड. सतिश शाहू मगरे व तेजल सतिश मगरे हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.
सदर कार इतकी भरधाव होती की लेंभेवाडी वळणावर कारचालकाला कारच्या वेगावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले व कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूने जाऊन दुचाकीला धडकली व दुचाकीला शंभर फूट फरफटत नेले. यात मगरे दांपत्य कारखाली दबले गेले. कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडून पसार झाले.
रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक व पाचोडला आठवडे बाजारास आलेल्या नागरिकांसह माळीवाडी, भोकरवाडी, लेंभेवाडी येथील ग्रामस्थांनी पाचोड व अंबड पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.
माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांसह पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व अंबडचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी सहकाऱ्यासमवेत घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने कारखाली दबलेल्या दांपत्यास बाहेर काढले. जवळपास अर्धा-पाऊण तास कारखाली हे दांपत्य दबलेले होते. या अपघातात कार व दुचाकीचा चुराडा झाला आहे.
कार खाली दबलेल्या या दांपत्यास बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहीकेद्वारे त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सदर अपघाताची हद्द अंबड पोलीस ठाण्यात येत असल्याने या प्रकरणाचा तपास अंबड पोलिसांकडे देण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.