Maratha Reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठवाड्यात ठिकठिकाणी पुन्हा आंदोलनाची धग ; मराठा आरक्षण,रास्ता रोको, चक्का जाम

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा, त्यांची ढासळलेली प्रकृती व मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून मराठवाड्यात आंदोलनांची धग पुन्हा जाणवू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा, त्यांची ढासळलेली प्रकृती व मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून मराठवाड्यात आंदोलनांची धग पुन्हा जाणवू लागली आहे. ठिकठिकाणी शुक्रवारी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलने झाली. काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बस पेटवून िदल्याच्या घटना घडल्या. काही भागांतून बससेवा बंद करण्यात आली.

बीडसह अन्य जिल्ह्यांत ‘रास्ता रोको’ आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नियोजित ९८० पैकी ५९६ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे महामंडळाच्या जिल्हा विभागाचे २१ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. दरम्यान, गुरुवारी रात्री गेवराईत दोन बसवर दगडफेक झाली. अंबाजोगाईसह तालुक्यातील मोरेवाडी, नेकनूरमध्ये ‘रास्ता रोको’ करून आंदोलकांनी सरकारला मागण्यांचे निवेदन दिले. किल्लेधारूरमध्ये महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. याच तालुक्यातील अंजनडोह येथेही दोन तास चक्का जाम आंदोलन झाले.

आमदारांच्या घरासमोर ठिय्या

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आमदार सुरेश धस यांच्या आष्टी- जामखेड मार्गावरील निवासस्थानासमोर तसेच तालुक्यातील शिराळ येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या घरासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.

वसमत-पुणे बस जाळली

हिंगोली- औंढा मार्गावरील डिग्रस पाटीवर रास्ता रोको झाला. हिंगोली - जिंतूरमार्गावर रास्ता रोको करून केंद्रीय मंत्री राणेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटीवर वसमत-पुणे बस जाळली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, बाळापूर कामठा फाटा येथे रास्ता रोको झाले. आंदोलनस्थळी बैलगाडी, बैल बांधण्यात आले. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यात आली.

नांदेडमध्ये चार तास चक्का जाम

नांदेडला जिल्ह्यातील बरडशेवाळा (ता.हदगाव) व अर्धापूर येथे मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. सरकारने आरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्यावा, आता विलंब करू नये या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बरडशेवाळा येथे आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिकेला आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे तीनशे बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या बसही सोडल्या नाहीत. महामंडळाचे आठ लाखांचे नुकसान झाले.

परभणी जिल्हाभरात रास्ता रोको

दोन दिवसांपूर्वी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज जिल्हाभरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याप्रमाणे परभणी, सेलू, पालम, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, सोनपेठ तालुक्यात चक्का जाम आंदोलन झाले. परभणी शहरात दोन ठिकाणी रास्ता रोको झाले. यावेळी राज्य शासनातील मंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

मुरूड येथे रास्ता रोको

लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. त्यामुळे पुणे, धाराशिवकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्याकडे जाणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या. महामंडळाचे दोन लाखांचे नुकसान झाले. जिल्ह्यांतर्गत बससेवा मात्र सुरू होती.

विभागनिहाय रद्द झालेल्या बसफेऱ्या

छत्रपती संभाजीनगर : २५, बीड : ३६०, जालना : ५०३, लातूर : १०६, धाराशिव :५९९, परभणी : ९१४

धाराशिव जिल्ह्यात आंदोलन

धाराशिव शहरात चक्का जाम आंदोलन सुरूच आहे. धाराशिव आगाराच्या बस बंद होत्या. शहरातील बाजारपेठाही बंद दिसून आल्या. शिवाजी चौक, भवानी चौक (सांजा नाका), जिजाऊ चौक, धाराशिव - छत्रपती संभाजीनगर मार्गावरील शिंगोली येथे रास्ता रोको झाले. भूम शहरासह तालुक्यात पातरूड - धाराशिव - अहमदनगर मार्गावर गुरुवारी रात्री दहापासून आज सायंकाळपर्यंत रास्ता रोको आंदोलन झाले. दरम्यान, ग्रामीण भागातील एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. तुळजापूरच्या ग्रामीण भागातील बससेवा बंद होती.

तुरोरीत बस पेटवून दिली

तुरोरी (ता. उमरगा) : महामार्गावरील मुळज रोड उड्डाणपुलावर उमरगा आगाराची लाडवंती - उमरगा बस शुक्रवारी दुपारी अज्ञात २५ जणांनी पेटवून दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आगाराने ही बस पाठवली होती. आष्टा, मळगीवाडी व दगड धानोरा येथून लाडवंती (ता. बसवकल्याण, कर्नाटक) येथून उमरगा येथे परतत होती. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. बसचे मोठे नुकसान झाले. वाहक अमोल कुंभार, चालक संदीप सुतके यांच्यासह बसमधील २८‌ प्रवासी सुरक्षित आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी घटनास्थळास भेट दिली.

माकणीत बस खाक

लोहारा :माकणी (ता. लोहारा) येथील स्थानकात मुक्कामी असलेली उमरगा आगाराच्या बसला काही अज्ञातांनी आज गुरुवारी (ता.१५) मध्यरात्रीनंतर आग लावली. तीत बस खाक झाली आहे. माकणी येथे उमरगा आगाराच्या तीन, औसा आगाराच्या दोन बस मुक्कामी असतात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औसा आगाराने खबरदारी म्हणून दोन्ही बस परत बोलावल्या. उमरगा आगाराच्या तीन बस माकणीत होत्या. त्यातील एका बसला (एमएच- २० बीएल १७०१) अज्ञातांनी आग लावली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बसचे सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बसचालक शिवाजी पांचाळ यांनी लोहारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात आज गुन्हा दाखल झाला.

जालन्यात बससेवेवर परिणाम

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. जालना तालुक्यातील गोलापांगरी, रामनगर, बदनापूर तालुक्यातील समृद्धी महामार्ग, राजूर आणि घनसावंगी येथे रास्ता रोको झाले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल ४५० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या प्रामुख्याने बीड, धाराशिव, तुळजापूर, कोल्हापूर या मार्गावरील बस फेऱ्यांचा समावेश होता. काही ग्रामीण भागातील बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्या. महामंडळाचा सुमारे सात लाखांचा महसूल बुडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT