नांदेड : आयुष्यामध्ये आठवणी खूप असतात. परंतु, त्या आठवणी व्यक्त करण्यासाठी व्यासपीठच नसते. परिणामी, या आठवणी मनातल्या मनातच दाटून राहतात. काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने त्या बाहेरही काढतात. सध्या सोशल मिडियाचा वापर प्रत्येकजणच करीत आहे. त्यामुळे मनात दाटून असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देणे शक्य झाले. नांदेडमधील एका कवीने अशीच दुर्मिळ आठवण सोशलवर टाकून उजाळा दिला आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी व ज्येष्ठ कवी व्यंकटेश चौधरी असे त्या कवीचे नाव. ‘आयुष्य गुलजार वाटतं तेव्हा...’ अशी पोस्ट त्यांनी रविवारी (ता.१५) सोशलवर टाकली. त्यात म्हटले आहे की, आयुष्य समृद्ध वाटण्याच्या काही दुर्मीळ आठवणी असतात. त्यातली ही एक. मर्मबंधातली ठेव म्हणावी अशी. काळीजकुपीतली गोष्ट! २००९ सालचा हा प्रसंग. नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेमध्ये प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दोन दिवस गुलजार नांदेडात होते. पहिल्या दिवसाचं गुलजारजींचं व्याख्यान शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात चालू होतं. ‘एक सो सोलह, चांद की रातें’ सारखी कैक भावस्पर्शी गाणी ज्यांनी दिली, ज्यांच्या शायरीमुळे आम्ही कवी गुलजार यांच्या प्रेमात पडलो. आमची पिढी त्यांच्या कवितेवर जगलीय. त्या स्वर्गीय जाणिवांचं लेखन करणाऱ्या कवीला साक्षात पाहायची कितीतरी दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती. मीही या व्याख्यानमालेला उपस्थित होतो. समोरून दुसऱ्या रांगेत. डाव्या बाजूला.
हेही वाचा - ‘या’ शहराचा कारभार चालतोय रामभरोसे
रसिक ऐकत होते शब्दनशब्द
आपल्या व्याख्यानात गुलजार कुसुमाग्रजांच्या कवितेसंदर्भातील एक प्रसंग सांगत होते. गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा अनुवाद केलाय त्यातला प्रसंग. सभागृह जीवाचे कान करून शब्दनशब्द ऐकत होतं. गुलजारजींचा खर्जातील तो रवाळ आवाज, काळजाचा ठाव घेणारी शब्दकळा, आम्हा श्रोत्यांची समाधी लागली होती. गुलजारजींचा एकेक शब्द काळजावर कोरून ठेवल्यासारखा रसिक ऐकत होते. कुसुमाग्रजांच्या कवितेतील प्रसंग असा होता; महाभारत घडवणारा श्रीकृष्ण आणि त्याच्या लीला आपल्याला नित्य नव्याने समजत असतात, उमजत असतात. मात्र कृष्णमूर्तीतल्या कृष्णाची लीला कुसुमाग्रजांनी शब्दांकित केली होती.
कुसुमाग्रजांच्या कवितांचा भावानुवाद या कवितेचा भावानुवाद सांगताना गुलजार म्हणाले, ‘गोपिका श्रीकृष्णाची पूजा करत होत्या. फुलं-गुलाल-कुंकू यांची उधळण त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर करत होत्या. आता महाभारत घडवणारा हा श्रीकृष्ण, त्याला गोपिकांचीही थट्टा करायची लहर आली. आणि जेव्हा गोपिका तल्लीनतेने गुलालाची श्रीकृष्णावर उधळण करत होत्या तेव्हा तो गुलाल थोडासा श्रीकृष्णाच्या नाकात गेला आणि श्रीकृष्ण शिंकले’ हा प्रसंग सांगताना ‘श्रीकृष्ण शिंकले’ हा शब्द उच्चारताना नेमकी मला जोराची शिंक आली. ‘आंक्च्छी’! जी मला प्रयत्न करूनही आवरता आली नव्हती.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडच्या एका कार्यकर्त्याने निष्ठा साकारली हातावर
आतल्या आत सुखावलो तरी...
संपूर्ण सभागृह त्या शिंकेची आवर्तनं ऐकत राहिलं आणि शिंक ऐकल्याबरोबर स्टेजवरून शिंकेचा ज्या दिशेने आवाज आला, त्या दिशेकडे (म्हणजे माझ्याकडे) हात करत गुलजार म्हणाले, ‘वा! इस क्षण के लिये आप श्रीकृष्ण बन गये है!’ संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं भारून गेलं. आणि मी संकोचून गेलो, आतल्या आत सुखावलो तरी! आजूबाजूचे लोक अपरिचित-कौतुकानं आणि परिचितातील काही असूयेनं बघत राहिले.
गुलजारजींसोबत चहा पिण्याचा दुर्मिळ योग
दुसऱ्या दिवशी सकाळी गुलजारजींसोबत चहा घ्यायची संधी मिळाली. प्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांच्या अष्टविनायक नगरातील घरी. गुलजारजी त्यांच्या संपर्कातूनच नांदेडला आले होते. चित्रकार नयन बारहाते, मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर अशी मातब्बर मंडळी सोबत. गुलजार आल्यावर गप्पा मारताना नयनने माझी ओळख करून दिली आणि सांगितलं, ‘रात मे जो छिंका वो यही है.’ यावर गुलजारजी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, ‘व्वा, क्या टायमिंग है! फिल्लम में टायमिंग का बहोत इम्पाॅर्टन्स होता है, मान गये!’ लहान मूल जसं कौतुकानं हरखून जातं आणि लाजतं, काहीशी तशीच अवस्था माझी...
हेही बघितलेच पाहिजे - Video : ‘हे’ आहे माहूरगडानंतर दुसरे दत्ताचे देवस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.