Ashadi Ekadashi 2023  sakal
मराठवाडा

Ashadi Ekadashi 2023 : ऐका पंढरीचे महिमान...

आज देवशयनी-आषाढी एकादशी! महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अलौकिक, सर्वांगसुंदर, दैदिप्यमान सोहळा म्हणजे पंढरपूरात टाळ-मृदंगाच्या निनादाने

सकाळ वृत्तसेवा

आज देवशयनी-आषाढी एकादशी! महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अलौकिक, सर्वांगसुंदर, दैदिप्यमान सोहळा म्हणजे पंढरपूरात टाळ-मृदंगाच्या निनादाने ओतप्रोत भरलेला वैष्णव वारकऱ्यांचा महोत्सव! महिनाभर पायी ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत पंढरीत आपल्या विठाईला भेटण्यासाठी भजन-भक्तीने भावविभोर झालेले वीर वारकरी आपल्या माहेरच्या अंगणात येऊन तुडुंब प्रेम कल्लोळात तल्लीन होऊन गाताहेत-नाचताहेत! वर्षभराच्या भेटीसाठी भावोत्कट वारकऱ्यांनी आज

पंढरीला वेढा दिला असून भाव-भक्ती-भजन-प्रेमाची अक्षरशः लयलूट सुरु आहे! आजचा दिवस म्हणजे वारकऱ्यांसाठी महापर्वणी! मंदिरात पांडुरंगाचे दर्शन होणे शक्य नाही आणि त्यासाठी कुणी अट्टहास सुद्धा करत नाही. आज पंढरीत असणे म्हणजेच पांडुरंगाचे दर्शन! पंढरीरायाचा प्रेम भांडारी नामदेवराय आजचा आपला अनुभव

ऐका पंढरीचें महिमान। राउळें तितुकें प्रमाण। तेथील तृण आणि पाषाण। तेहि देव जाणावे॥१॥

ऐसी पंढरी मनीं ध्याती। त्यांसी तिहीं लोकीं गति। ते आनिका तीर्था जाती। तीं वंदिती तयांसी॥२॥

वाराणसी चालिजे मासा। गोदावरी एक दिवसा। पंढरी पाऊल परियेसा। ऐसा ठसा नामाचा॥३॥

असा कथन करतात. आज श्री पांडुरंग मंदिराचा कळसच काय सगळे वारकरीच श्री विठ्ठल आहेत! एवढेच काय तेथील गवत, दगड हे सुद्धा आज विठ्ठलच झाले आहेत! आज पंढरपूर तीर्थांचेही तीर्थ झाले असून भारतातील सर्वच तीर्थे सुद्धा पंढरीत आले आहेत! आषाढीसाठी एक पाऊल घराबाहेर टाकणे हे काशीला जाण्यासाठी एक महिना, गोदातीरी एक दिवस चालण्याएवढेच आहे! आज खऱ्या अर्थाने पंढरपुरात सर्वत्र  

विठ्ठल जळी स्थळी भरला। रीता ठाव नाही उरला॥

आजी म्या दृष्टीने पाहिला। विठ्ठलची विठ्ठल॥

असं झालं आहे. त्यामुळेच कोणताही वारकरी कोणत्याही वारकऱ्याचे दर्शन घेतोय! हे दर्शन प्रत्यक्ष विठ्ठलाचेच दर्शन होय! हा अलौकिक सोहळा आज पंढरीत लाखो वारकरी याची देही याची डोळा अनुभवताहेत! हा नयनरम्य देखावा अंतर्मनाच्या कुपीत हृदयबंद करून ठेवताहेत! महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर संपूर्ण जगातून श्री विठ्ठलाचे वारकरी धावत पळत आज पंढरीत आलेत! जगातून अनेक पर्यटक पंढरीची वारी काय असते? यात्रा कशी भरते? आज दिवसभर-रात्रभर वारकरी पंढरीत काय करतात? हे पाहण्यासाठी-जपून ठेवण्यासाठी कॅमेरे घेऊन फिरताहेत!

भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात देवशयनी-आषाढी एकादशी पंढरीच्या वारीचा हा नयनरम्य सोहळा जनमनात आणि प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर का विराजमान आहे? याचे चिंतन-मंथन केले असता काही महत्वपूर्ण बाबी दृगोचर झाल्याशिवाय रहात नाहीत. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे वारकरी सांप्रदाय जात-धर्म-पंथ-स्त्री-पुरुष-उच्च-नीच-श्रेष्ठ-कनिष्ठ-गरीब-श्रीमंत-ज्ञानी-अज्ञानी-लहान-मोठा असा कोणताही भेद मानत नाही. संत नामदेवांनी "या रे या रे लहानथोर। याति भलते नारी नर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥"

हा मूलमंत्र दिला आणि तेराव्या शतकांत कडेकोट वर्ण-लिंगभेद-जातीजातीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना कर्मकांड, स्पृश-अस्पृशता, उच्च-निचते शिवाय सामुहिक भोजन, भजन,भक्ती, अभंग लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. यातूनच संत जनाबाई, संत सावतोबा, संत चोखोबा, संत जनाबाई, संत गोरोबा, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत बंका,

संत चांगदेव, संत मुक्ताबाई, संत सोपान काका आदि आणि अन्य उपेक्षित, वंचित, पिडीत, बहिष्कृतांना आपले विचार बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य वारकरी संप्रदायाने दिले. तेराव्या शतकांत या सर्वच संतांनी मोठी सामाजिक आणि वाङ्मयीन क्रांती घडवून आणली. तत्कालीन महार, मांग, शिंपी, ढोर, चांभार, कुंभार, माळी, वेशा, बहिष्कृत ब्राह्मण आदि सर्वांना एका छताखाली स्वातंत्र्य मिळाले.

खटनट यावे । शुद्ध होऊनी जावे ॥ दवंडी पिटी भावे ।  चोखामेळा॥ किंवा

उस डोंगा परी रस नोव्हे डोंगा । काय भूललाशी वरलिया रंगा ॥

असे मुक्तपणे आणि रोखठोक अभंग लिहून प्रबोधनाचे कार्य नेटाने पुढे नेले. या शिवाय संत सावतोबा महाराजांनी

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ लसूण मिरची कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी॥

असे कृषी संस्कृतीशी सांप्रदायाची नाळ जोडणारे अभंग लिहिले. एवढेच काय संत नामदेवांनी भारतभ्रमण करून पंजाब पर्यंत वारकरी सांप्रदायाची पताका नेऊन पोहोचवली. याला जोडून मुळात नाथपंथी असणाऱ्या संत ज्ञानदेवादी भावंडांनी आपले महत्वपूर्ण योगदान देतांना ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव सारखे अनमोल प्राकृत ग्रंथ लिहून सर्वसामान्य लोकांना लेखन-वाचन-भक्ती-ज्ञान आदि दुर्मिळ गोष्टी खुल्या केल्या.

मधला काही काळ वारकरी सांप्रदायाचे काम मंदावले असतांना पुढे दिड शतकानंतर संत एकनाथांनी अभंग-गवळण-भारुड-हरिपाठ-रामायणासारखे ग्रंथ लिहून "संस्कृत देवे केले अन। प्राकृत काय चोरांपासोनी झाले॥" असा खडा सवाल करून परंपरावादी ग्रंथ-विचारांना नाकारले. सतराव्या शतकात संत तुकारामांच्या लोककल्याणकारी कार्य आणि लेखणीने वारकरी सांप्रदाय कळसावर गेला. कालबाह्य रूढी-परंपरा, थोतांड, कर्मकांड, बुवाबाजी, भोंदूपणा, दांभिकतेने शेतकरी-कष्टकरी समाज रसातळाला गेला असतांना

"तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥, नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती॥, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ। तया गळा माळ असो नसो॥, असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥" असे अनेक लोकजागृती आणि लोकोद्धार करणारे अभंग लिहून "तुझे आहे तुज पाशी। परी तू जागा चुकलाशी॥" असे सांगतांना लोकांना आपल्या शेतीमातीत, कामात, घरी, माणसात, आई-वडिलातच देव असून कुठेही जायची गरज नाही असे सांगितले. अवघड झालेले जीवन सोपे-सुकर झाले. जनामनातील देव मोकळा झाला.

यात विशेषतः या सर्वच संतांनी पंढरीचा पांडुरंग हे आपले दैवत मोठ्या ताकदीने उभे केले. हा शेतकरी, कष्टकरी काळ्या लोकांचा काळा देव असून हा काहीही मागत नाही. आपल्या भक्तांसोबत दळतो, बाळंतपण करतो, शेती करतो, मेलेली गुरे-ढोरे ओढतो, पाणी भरतो, एवढेच काय एखाद्याची पत्नी सुद्धा होतो! तुमची आमची कामं करणारा, काहीही न मागणारा आणि कुणाच्याही मध्यास्तीविना "उराउरी" भेटणारा हा विठ्ठलच आपला देव आहे याची खात्री झाली! सर्वांनी हाच भक्ती-शक्तीचा उद्गाता आहे

असे सांगितले. त्यातून हे सगळे संत आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठल दर्शनाला नित्यनेमाने यायचे. त्यातच तुकोबांचे धाकटे सुपुत्र श्री नारायण महाराजांनी एका पालखीत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्र ठेऊन पंढरपूरला जायला प्रारंभ केला. ही पालखीच पुढे मोठी दिंडी झाली. सर्वच संतांचे अनुयायी त्या त्या भागातून देहूआळंदीकडे येऊन सामील होऊ लागले. भजन-कीर्तन करत महिनाभर संसारातील सुख-दु:ख विसरून पंढरपूरला चालत जाऊ लागले. लोक सहभागामुळे वारीचे हे भव्य रूप आपल्यासमोर उभे आहे!

अठरापगड जाती-धर्मातील लोकांना श्री विठ्ठल हा "भेदाभेद भ्रम अमंगळ" माणणारे दैवत असून तो सरळ कुणालाही भेटतो. ही खात्री झाली आणि त्यातूनच जनसमुदायाचा हा महालोंढा पंढरीकडे आनंदाने नाचत बागडत आलाय आणि विश्वाच्या अंतापर्यंत जात राहील! जय जय रामकृष्णहरी!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT