छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात गॅस सिलिंडर घरापर्यंत पोच करेपर्यंत मधल्यामध्ये त्यातील १ ते ४ किलो गॅसची चोरी होत असल्याचा प्रकार वाळूजमध्ये पोलिस कारवाईने उघड झाला. असे असताना पुरवठा विभाग काय करीत होता, हा प्रश्न होता. या प्रकाराची ‘सकाळ’ने विशेष दखल घेत मुद्दा ऐरणीवर आणला. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
आता प्रशासनाने भरारी पथकांना कारवाईसाठी कामाला लावले. त्याचप्रमाणे तातडीने गॅस कंपन्या आणि वितरकांची बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिली. गॅस वितरकांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याची सूचनाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घरगुती गॅस सिलिंडर वितरणाच्या दरम्यान गॅसची चोरी करून त्याची सर्रास विक्री करण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रकार सुरू आहे. पोलिस आणि पुरवठा विभागातर्फे वेळोवेळी कारवाई होते. मात्र, त्याला आळा बसत नाही. पोलिस गुन्हे दाखल कारवाई करतात. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करतात. त्यापुढे मात्र ठोस काहीच होत नाही. त्यामुळे सिलिंडरमधील गॅसची चोरी व काळाबाजार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
घरगुती सिलिंडरची किंमत व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे घरगुती सिलिंडरमधून गोदामावर इलेक्ट्रिक पंपाच्या साहाय्याने गॅस एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस काढून चोरी केल्या जाते. प्रत्येक भरलेल्या सिलिंडरमधून दोन ते तीन किलो गॅस काढून घेत, पुन्हा सिलिंग केल्या जाते. पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. याला ठळक प्रसिद्ध करीत ‘सकाळ’ने या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणाची आता जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे.
एजन्सीची अचानक होणार तपासणी
गॅसच्या वितरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या तक्रारीवर लक्ष ठेवण्यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी दुलाजी मेंडके यांच्या अध्यक्षतेखाली एक भरारी पथक कार्यरत आहे. पोलिसांच्या मदतीने हे पथक तक्रारीनुसार कारवाई करते. मात्र, आता या पथकाला ठिकठिकाणी तक्रारीची वाट न पाहता अचानक भेटी देऊन तपासणी करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
तातडीने बोलावली बैठक
गॅसचा काळाबाजार उघडकीस आल्याने जिल्हापुरवठा विभागामार्फत तातडीने गॅस कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी आणि गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात येणार आहे. यासाठी तातडीने आदेश काढण्याच्या सूचना लोखंडे यांनी दिल्या. या बैठकीत प्रत्येक गॅस वितरण करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्याबद्दल सूचना केली जाणार आहे.
दोन वर्षांत आठ गुन्हे
सातारा पोलिस ठाणे : २०२१ मध्ये शेख नदीम आणि अल्ताफ जाफर
यांच्या ताब्यातून ३० सिलिंडर जप्त.
सातारा पोलिस ठाणे : २०२१ मध्ये बिलाल जलाल शेख, गजानन
गायकवाड, शेख सादीक यांच्याकडून एचपी कंपनीचे १७ सिलिंडर जप्त
सातारा पोलिस ठाणे : २०२२ मध्ये सय्यद नसीन याला पकडून त्याच्या ताब्यातून भारत गॅसचे १९,
रिलायन्सचे ४, एचपीचे ९ आणि इंडेन गॅसचे एक असे ३३ सिलिंडर जप्त
छावणी पोलिस ठाणे : २०२२ मध्ये शेख सलीम मोहम्मद, शेख जुबेर शेख साबेर यांच्या ताब्यातून २४ सिलिंडर जप्त.
एमआयडीसी वाळूज : सय्यद अजहर आणि शेख सलीम यांच्या ताब्यातून
एचपी कंपनीचे १५ सिलिंडर जप्त
सिटीचौक पोलिस ठाणे : शेख इरफान, शेख फाजील यांच्या ताब्यातून
७४ गॅस सिलिंडर जप्त
बेगमपुरा पोलिस ठाणे : शेख सलमान शेख पाशा याच्या ताब्यातून
३८ सिलिंडर जप्त केले.
घरीच तपासा
एक कापड पाण्यात भिजवून घ्या. त्याने सिलिंडरवर एक जाड रेषा काढा. यानंतर १० मिनिटे वाट पाहा. सिलिंडरचा जो भाग रिकामा असेल, तो भाग लवकर कोरडा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.