औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या शहरातील हॉटस्पॉटची संख्या तब्बल पन्नासवर गेली आहे. दाट लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव गतीने होत असून, गुरुवारी (ता. सात) हमालवाडा, कटकटगेट या दोन्ही दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण आढळून आले. त्यामुळे किलेअर्क, नूरकॉलनी, संजयनगरप्रमाणे या भागातही रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.
शहरात मार्चमध्ये फक्त एकच कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत सुमारे ५० भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात दाट लोकवस्ती आहे, छोटी घरे आहेत, तिथे झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यापूर्वी किलेअर्क, नूर कॉलनी, संजयनगर-मुकुंदवाडी आणि जयभीमनगर या वसाहतींत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आजही या भागांतून जास्त रुग्ण आढळून येत आहेत.
गुरुवारी पुन्हा रेल्वेस्टेशन परिसरातील हमालवाडा आणि जुन्या शहरातील कटकटगेट या दोन नवीन वसाहतीमध्ये कोरोनाने शिरकाव केला. हमालवाड्यात चार तर कटकटगेट परिसरात तीन रुग्ण आढळून आले. या दोन्ही वसाहतीमध्ये घरे जवळजवळ असल्याने व दाट लोकवस्ती असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हमालवाडा व कटकटगेट भागात संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या वसाहतीत उद्रेक
कोरोनाचा शिरकाव झालेल्या वसाहती सर्वसामान्यांच्या आहेत. अनेकांचे हातावर पोट असून, अनेक जण किरकोळ कामे करतात. हमालवाडा ही वसाहतीत येथे छोट्या घरांत व अपुऱ्या जागेत लोक दाटीवाटीने लोक राहतात, अशीच परिस्थिती कटकटगेटची आहे. याठिकाणी लोखंडापासून विविध वस्तू तयार करणारे कारागीर व त्याचा व्यवसाय करणारे व्यापारी आहेत; तसेच टोस्ट, पाव, बनपाव, बटाटे व मक्यापासून बनविले जाणारे वेफर्सचे विविध प्रकार येथे तयार केले जातात. त्यामुळे कामगार व व्यावसायिकांचा अनेकांशी संपर्क येतो, असे सूत्रांनी सांगितले.
या भागात सर्वाधिक रुग्ण
संजयनगर-मुकुंदवाडी परिसरात आतापर्यंत ७४ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जयभीमनगर ६१, नूर कॉलनी ३८, किलेअर्क ३१ व आसेफिया कॉलनीत २७ रुग्ण आढळून आले आहेत. या वसाहती दाट लोकवस्तीच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा इतरांनी संपर्क येतो. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.