छत्रपती संभाजीनगर - गर्भलिंग चाचणीदरम्यान मुलाचा गर्भ असूनही मुलीचा गर्भ असल्याचे सांगत पडेगाव येथील विवाहितेचा गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला होता.
या प्रकरणी गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टर महिलेविरोधात रविवारी (ता. २) छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला पोलिसांनी तत्काळ बेड्याही ठोकल्या.
डॉ. शबाना अश्पाक शहा-सय्यद (४४, रा. प्लॉट क्र. ९, जटवाडा रोड, एकतानगर, हर्सूल) असे तिचे नाव आहे.
छावणी पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील एजंट ज्ञानेश्वर जाधव याला शनिवारीच अटक केली होती. दुसऱ्या दिवशी रविवारी अटक केलेली डॉ. शबाना ही बीएचएमएस डॉक्टर असून ती आडूळ आणि हर्सूल येथे दोन वेगवेगळे क्लीनिक चालविते. हर्सूल भागातील तिच्या दवाखान्याचे नाव सानिया क्लिनिक आहे.
या प्रकरणात सुनील हरी पडूळकर (२९, रा. चेतननगर, तीसगाव, पडेगाव) हा फिर्यादी असून, त्याला पाच मुली आहेत. त्याची पत्नी सहाव्यांदा गर्भवती राहिल्याचे समजल्यावर त्याने एजंट जाधवकडून लिंक लावून डॉ. राजपूतकडे गर्भलिंगनिदान केले होते. मुलीचा गर्भ सांगितल्यावर त्याने डॉ. शबानाकडून गर्भपात करून घेतला होता.
त्यात तो मुलगा निघाल्यावर दवाखान्याच्या खर्चावरून वाद झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे होते. गर्भलिंग चाचणीचे पैसे परत देण्यावरून एजंट जाधव आणि डॉ. राजपूतच्या गुंडांनी पडूळकरला बेदम मारहाण करत बंदुकीचा धाक दाखविला होता.
दोन्ही दवाखान्यांवर पोलिसांचा छापा
पडूळकर याला मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींनाही अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आडूळच्या महिला डॉक्टरकडून गर्भपात करून घेतल्याचे पडूळकरने सांगितल्यावर छावणी पोलिसांनी आडूळला छापा मारला.
तेथे जाऊन माहिती घेतल्यावर तेथे क्लिनिक चालविणारी महिला डॉ. शबाना अश्पाक शहा-सय्यद ही हर्सूल भागातही दुसरे क्लीनिक चालवीत असल्याचे समजले. त्यावरून रविवारी पथकाने हर्सूल भागात छापा मारला आणि डॉ. शबानाला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.