छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांजावर बंदीच्या अभ्यासक्रमात समावेशाबाबत शालेय आणि उच्च शिक्षण सचिवांनी काय कारवाई केली? तसेच नायलॉन मांजावरील बंदीच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पत्रानुसार राज्य शासनाने काय कारवाई केली, याची ३१ जानेवारीरोजी माहिती सादर करण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी मंगळवारी ( ता.२३) सरकारी वकिलांना दिले.
असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी खंडपीठात निवेदन केले की, केंद्र शासनाने २३ फेब्रुवारी २०२३ च्या पत्राद्वारे देशातील सर्व राज्यांमध्ये नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घालण्याची विनंती केली. त्यानुसार देशातील १४ राज्यांमध्ये नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घालण्यात आली. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही, त्यावर खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. या याचिकेवर ३१ जानेवारीस पुढील सुनावणी आहे.
सरकारी वकिलांनी यावेळी १५ ते १८ जानेवारी २०२४ दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई आणि नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात १९ गुन्हे दाखल झाले, समाजमाध्यमांना १९ नोटिसा बजावल्या. टोल फ्री नंबर जारी केला. १७ पोलिस ठाण्यांमध्ये विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे तसेच दामिनी पथकामार्फत आठ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये ७३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून वैजापूर येथे २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करून ६ गुन्हे नोंदविण्यात आले. धुळे, धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि हिंगोलीला प्रत्येकी एक गुन्हा, बीडला ५ गुन्हे, अहमदनगरला ८ , लातूरला ४ , नांदेडला ७ , नंदुरबारला २२ आणि जळगावला ९ गुन्हे नोंदविण्यात आल्याचे त्यांनी खंडपीठास सांगितले. न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे ॲड. आनंद भंडारी काम पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.