छत्रपती संभाजीनगर : माणसांना दवाखान्यात घेऊन जाण्याची तातडीने गरज भासली, तर त्यांच्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र, प्राण्यांसाठी शहरात कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका नाही. यामुळे प्राण्यांना दुखापत झाली तर ते तिथेच विव्हळत पडतात. अपघातामध्ये सर्वाधिक मांजरीची पिल्ले दगावतात. वर्षाला सुमारे ५० प्राण्यांचा अपघातात मृत्यू होतो. यासाठी या मुक्या जिवांसाठी पशुरुग्णवाहिकेची नितांत गरज प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.
भारतीय संस्कृतीत संतांनी भूतदयेचा संदेश दिला आहे. तो प्रत्यक्ष कृतीत उतरविल्याचे अनेक दाखले आजही दिले जातात. माणसांसारखेच प्राणीदेखील शहरात राहतात. कधी रस्त्यावर वाहनाचा धक्का लागून तर कधी दिवाळीत अंगावर फटाका फुटून, रस्ते अपघातात अनेक प्राण्यांना गंभीर दुखापत होते. त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागतो.
अशावेळी शहरात एक पशू रुग्णवाहिका असल्यास अशा जनावरांवर लवकरात लवकर प्रथमोपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल. प्रथमोपचार न मिळाल्याने आजपर्यंत अनेक कुत्रे, मांजर, गायी आणि पक्षी यांना त्रास सहन करुन आपला जीव गमवावा लागतो. सध्या शहरात आपत्कालीन परिस्थितीत कुत्रे पकडणाऱ्या व्हॅनचा वापर करून कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले जाते. पण, त्या व्हॅनमधे आपत्कालीन लागणाऱ्या सोयी उपलब्ध नसतात. रुग्णालयात पोचेपर्यंत अनेकदा प्राणी दगावतात.
पेट लव्हरचा घ्या आदर्श
मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशी पशुरुग्णवाहिका नसल्याने तेथील अशासकीय संस्थांनी देणगी जमा करुन पशुरुग्णवाहिका सुरू केली आहे. संभाजीनगरात पशूंसाठी काम करणाऱ्या ‘औरंगाबाद पेट लव्हर’ या संस्थेने पशुरुग्णवाहिका सुरु केली आहे. त्यांचा आदर्श घेवून अन्य संस्थांनीदेखील पुढे आले पाहिजे. शिवाय महापालिका प्रशासनाने अशी सोय करावी, अशी अपेक्षा पशूप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.