औरंगाबाद : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारूडरत्न, लोककलावंत निरंजन भाकरे (वय ६२) यांचे शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी निधन झाले. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांचा मुलगा शेखर भाकरे यांनी दिली. निरंजन भाकरे यांनी भारूड लोकप्रकाराला जीवंत ठेवण्याचे काम करीत समाजाचे अविरत प्रबोधनही केले. रहिमाबाद (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील ते रहिवासी होते. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ हे भारुड महाराष्ट्रात गाजविणारे लोककलावंत निरंजन भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा त्यांना वडीलांकडून मिळाला होता. वडीलांच्या निधनानंतर भाकरे यांचा जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी कष्टाची कामे केली. नंतरच्या काळात खासगी कंपनीत कामगार होते. लोककलेचे अभ्यासक अशोक परांजपे यांच्या संपर्कात आल्यानंतर भाकरे यांना ‘सोंगी भारुड’ सादरीकरणाची संधी मिळाली. काही वर्षांतच ते नावारुपाला आले. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, मुलगा शेखर, मुलगी शुभांगी, भाऊ सुमीतनाथ व पुतण्या अमोल हे आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविले भारूड : निरंजन भाकरे यांनी संसाराचा गाढा ओढत छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून कला जोपासली. त्यांच्या कलेचे सादरीकरण देश-विदेशात झाले. भारूड हा कलाप्रकाराला आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचविण्यात महत्वाचा वाटा होता. सोंगी भारुडासाठी भाकरे राज्यभर परिचित होते.
वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये विक्रम : भाकरे यांनी ७५ मीटर इंच घेर असलेला ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेल्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत होते.
कोरोनाविरुद्ध दिला लढा : कोरोना विषाणु संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी समाजात जागृती घडावी म्हणुन त्यांनी ‘कोरोना संकट आलया दारी, मरणाची भिती बसलीया उरी’ कोरोनाबाबत आवाहन गीतही लिहिले व त्याला स्वरसाजही चढविला होता.
समाजकार्य :
- भारुडरत्न निरंजन भाकरे हे कार्यक्रम ठरलेल्या गावात कार्यक्रमाच्या दिवशी मुलगी जन्माला आल्यास भावाची ओवाळणी म्हणुन त्या मुलीच्या नावे पाच हजार रुपये देत असत.
- पाच आदर्श कुटुंबातील महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान करीत.
- पूर्णपणे व्यसनमुक्त कुटुंबातील माता, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या जवानाची माता, एका मुलीवर प्रपंचाची धुरा सांभाळणारी माता, ज्या मुलीला शेतकरी नवरा हवा त्या मुलीला बक्षीस म्हणुन एक हजार रुपये असेय
- अवयव दानासाठी त्यांनी भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.
लोक कलेतील तारा निखळला ( डॉ. देवदत्त महात्रे, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक) : भारुडाचा अटकेपार झेंडा लावणारा जिवा-भावाचा मित्र भारुडाला पोरके करून गेला.
आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचविले भारूड (दिलीप खंडेराय, लोककलावंत) : संत एकनाथ महराजांची भारुडाची पंरपरा जपत ती आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचविण्याचे अभ्यासपूर्ण काम निरंजन भाकरे यांनी केले.
प्रभावी प्रबोधनाचे निरंजन विझले (अंबादास तावरे, शाहीर) : भारूड बुरंगुंडा सादर करीत होते. खेड्या गावतून पुढे येत अमेरिकेपर्यंत जाणे सोपे नाही. ते त्यांनी त्यांच्या कलेतून आणि भारूडाच्या माध्यमातून केले.
मराठवाड्याची मोठी हानी (गणेश चंदनशिवे, लोककाल विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ) : निरंजन भाकरे कुठल्याही विद्यापीठाची पायरी चढले नव्हते. तरीही ते मुंबई विद्यापीठातील लोककला विभागात गेस्ट लेक्चरर होते. त्यांनी भारूडाच्या माध्यमातून क्रांती केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.