औरंगाबाद : भूक खवळणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट. समोर पक्वानांनी भरलेली ताटं आणि ‘वदनी कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।। जय जय रघुवीर समर्थ ' असा श्लोक पूर्ण होताच अख्खी पंगत जेवायला सुरूवात करते. पंगतीवर पंगती उठतात अन् चांगला स्वयंपाक करून खाऊ घालणाराही समाधानी आणि खाणाराही तृप्त होऊन जातो. मात्र, वर्षभरापासून कोरोना महामारीने घातलेल्या थैमानामुळे आणि त्याच्या जोडीने आलेल्या निर्बंधांमुळे स्वयंपाकाची सेवा देणाऱ्या व्यवसायाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.
लग्नसराई देखील निर्बंधातच निघून जात असल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. लग्नसोहळा, वाढदिवस, उपनयन संस्कार, गृहप्रवेश आदी आनंदाच्या प्रसंगापासून दुःखद प्रसंगाच्या जेवणापर्यंत स्वयंपाक करण्याचे काम करणारे सेवाक्षेत्र म्हणून केटरींग व्यवसाय पुढे आलेला आहे. विशेषत: लग्नसोहळ्यात केटरर्सची अधिक गरज जाणवत असते. एका लग्नामुळे अनेकांना रोजगार मिळतो. मात्र वर्षभरापासून आलेल्या कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्हा केटरर्स असोसिएशनचे नोंदणीकृत जवळपास ७०० केटरर्स सदस्य आहेत तर सदस्य नसलेले सुमारे अडीच हजार पूर्णवेळ केटरिंग व्यावसायिक आहेत.
काय म्हणतात केटरर्स?
० महेश लाहोट (अध्यक्ष, जिल्हा केटरर्स असोशिएशन) : एका लग्नसोहळ्यावर ३०० कुटुंबांचा रोजगार अवलंबून असतो. आम्ही आमच्या व्यवसायाला कधी अडचण येणार नाही असे समजत होतो. मात्र, कोरोना आणि त्यातून आलेल्या निर्बंधांमुळे या व्यवसायाचे मरण झाले आहे. वर्षभरापासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. एप्रिल, मे हा आमचा खरा सिझन असतो. मात्र गेल्यावर्षीही आणि यंदाही व्यवसाय शून्य आहे. खरोखर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर एकदाच २१ दिवसांचा लॉकडाऊन करा, सरसकट सर्व बंद करून टाका. जगताही येत नाही अन् मरताही येत नाही अशी अवस्था झाली आहे.
० जयराम टेकाळे (सचिव, जिल्हा केटरर्स असोसिएशन) : गेल्या वर्षी आम्हाला करणारे आचारी, वाढपे, महिला, वाहतूकदार अशांना काहीच काम नसल्याने त्यांना अन्नधान्य दिले, मदत दिली, मात्र आता आम्हालाच मदत घेण्याची वेळ आली आहे. लग्नाला ५० लोकांना परवानगी आहे. मात्र एवढ्या लोकांसाठी जरी स्वयंपाक करायचा झाला तरी १०-१५ माणसे लागतातच. त्यामुळे अर्थिक ताळमेळ जमतच नाही. काही कर्मचारी आमच्याकडे परमनन्ट आहेत. त्यांना पगार तर द्यावाच लागतो. इतर ठिकाणी ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू केला जातो तसेच मंगल कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्केचा नियम लावावा. एक हजार लोकांची क्षमता असेल तर ५०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी हवी.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.