औरंगाबाद : जिल्हा परिषदेची निवडणूक होणार की नाही, याबाबत स्पष्टता नसली तरीही निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने गट, गणांचे प्रारूप आराखडा सादर केला आहे. यात जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समित्यांसाठी एकूण १४० गण निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांच्या नवीन रचनेमुळे जिल्हा ढवळून निघणार आहे. काही तालुक्यात गट वाढणार असल्याने नवीन रचनेत ‘कुणाला खुशी अन् कुणाला गम’ असा अनुभव येणार याची उत्सुकता आहे.
शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे लोकसंख्येच्या निकषावर जिल्हा परिषदेचे ७० गट होणार आहेत. त्याचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. सध्या ६२ गट होते. यामध्ये आठ नवीन गट वाढणार आहेत. यात औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यांत प्रत्येकी २ तर फुलंब्री, पैठण, कन्नड व गंगापूर तालुक्यांत प्रत्येकी १ असे आठ जिल्हा परिषदेचे गट वाढणार आहेत. दरम्यान
जिल्हा परिषदचे गट आणि पंचायत समितीच्या गणांचा ९० टक्के प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. केवळ दोन गटांच्या सीमा रचनेसह
लोकसंख्येत किरकोळा दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसात ही दुरुस्ती करून मंगळवारी (ता.१५) पुन्हा हा आराखडा तपासणीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवीन गटांमुळे होणार परिणाम
प्रशासनाला नवीन गट आणि त्यासाठी दोन गण निर्माण करताना, त्याला लागून असलेल्या किमान दोन गटांच्या गावांतील तोडफोड करावी लागली आहे. परिणामी काही सदस्यांना त्यांचे प्राबल्य असलेल्या गावांना मुकावे लागणार आहे; तर काही सदस्यांना नको असलेली गावे आपसूकच दुसऱ्या गटात जाण्याची ही संधी आहे.
नवीन गटात आपले अस्तित्व पुन्हा तयार करण्यासाठी इच्छुकांना कंबर कसावी लागणार आहे. काही सदस्यांनी आपल्या गटात कुठली गावे येतील आणि जातील याचा अंदाज घेत आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. सोयगाव, खुलताबाद आणि वैजापुरमध्ये बदल होण्याची शक्यता नसल्यामुळे तेथे फारशी हालचाल होणार नाही. मात्र इतर तालुक्यातील गटांना नवीन गट आणि गण रचनेचा थोडाफार फटका बसणार असल्यामुळे त्या ठिकाणी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
जिल्हा परिषदेतील - पक्षीय बलाबल
भाजप- २३
शिवसेना-१९
कॉँग्रेस-१५
राष्ट्रवादी कॉँग्रेस-३
मनसे-१
आरपीआय (डे.)-१
''जिल्ह्यातील सर्कलनिहाय बुथ, शक्ती तसेच तेज प्रमुखांची तयारी झाली असुन संघटनात्मक बैठका झाल्या आहेत. येत्या दहा दिवसांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे व आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांच्या नेतृवाखाली सर्व सर्कलचे मेळावे घेण्यात येणार आहेत.''
-विजय औताडे, जिल्हाप्रमुख, भाजप
''प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. सध्या आम्ही स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहोत.''
-डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
''जिल्ह्यातील सर्व सर्कलचे दौरे करून बैठका घेण्यात आलेल्या आहेत. संघटनात्मक आणि पक्षाच्या दृष्टीने आमची तयार झाली आहे. केवळ आम्ही आरक्षणाची वाट पाहून आहोत.''
-अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.