औरंगाबाद: खासदार डॉ. भागवत किसनराव कराड यांचे नशीब पुन्हा एकदा फळफळले. भाजपतर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सव्वा वर्षात त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या (ता.सात) विस्तारात निवड झाली आहे. डॉ. कराड यांच्या रूपाने औरंगाबादला प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. डॉ. भागवत यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश हा आश्चर्याचा धक्का समजला जात असला तरी त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. कराड यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यसभेवर नियुक्ती झाली. त्यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला राज्यसभेतील खासदारपद मिळाले.
डॉ. कराड हे लातूर जिल्ह्यातील चिखली (ता. अहमदपूर) गावचे मूळ रहिवासी. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून ते एमबीबीएस, एमएस, एमसीएच, एफसीपीएस आहेत. औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे दोन वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मराठवाड्यात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या
डॉ. कराड बालरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय पेशा सांभाळून ते १९९५ मध्ये राजकारणात आले. महापालिकेत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना राजकारणात बळ दिले आणि औरंगाबाद महापालिकेत दोनवेळा महापौर होण्याची संधी दिली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती; परंतु त्यांचा पराभव झाला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या कराड यांना मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही देण्यात आले. पक्षाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ. कराड यांच्याविषयी...
- चिखल (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे १६ जुलै १९५६ ला जन्म
- मराठवाड्यात बालरोग सर्जन म्हणून ओळख
- १९९६ मध्ये भाजपमध्ये दाखल
- १९९५ ते १९९७ ः औरंगाबाद महापालिका स्थायी समिती सदस्य
- १९९९ ः औरंगाबाद महापालिकेत भाजपचे सभागृह नेते
- १९९७ ते-१९९८ ः औरंगाबादचे उपमहापौर
- दोन वेळा महापौर (एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१, नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७)
- औरंगाबाद महापालिकेचे तीनवेळा नगरसेवक
- भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, सचिव तसेच संघटनेच्या विविध पदांवर काम
- मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषविले
- १८ मार्च २०२० ः राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.