छत्रपती संभाजीनगर - भाऊ रागावल्यामुळे बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हर्सूल येथील चेतनानगर, पोलिस कॉलनी येथे सोमवारी (ता.५) रात्री अकरा वाजता उघडकीस आली.
सुहाना सदफ शेख जमील (वय.१५, रा. चेतनानगर, पोलिस कॉलनी, हरसिद्धी माता मंदिराजवळ, हर्सूल) असे मृत मुलीचे नाव आहे. ती मौलाना आझाद कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. सुहाना सदफ ही आई, मोठी बहीण, विवाहित भाऊ, वहिनी यांच्यासोबत राहत होती. तिचे वडील विभक्त राहतात. मोठ्या भावाला एक मुलगी आहे.
सोमवारी (ता.५) तिची आई आणि बहीण या दोघी घरगुती साहित्य खरेदीसाठी शहरात गेल्या होत्या. भाऊ, वहिनी त्यांची मुलगी आणि सुहाना सदफ हे घरी होते. छोटी मुलगी रडत असल्यामुळे भावाने तिला सुहाना सदफकडे सांभाळण्यासाठी दिले. तिनेही काही वेळ मुलीला खेळविले. किराणा दुकानात नेऊन चॉकलेट खायला दिले. ती शांत झाल्यावर पुन्हा घरी आणले. तिला घरात सोडून सुहाना सदफ स्टडी रूममध्ये जाणार तेवढ्यात मुलगी पुन्हा रडायला लागली.
तेव्हा भाऊ सुहाना सदफला रागावला. मुलगी रडत आहे, तुला कळत नाही का? असे तिच्यावर ओरडला. त्याचा सुहाना सदफला राग आला आणि ती धावत स्टडी रूममध्ये गेली. तेथेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने जेवणासाठी म्हणून भावाने सुहाना सदफला आवाज दिला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. ती अभ्यास करत असेल, असे समजून भाऊ शांत बसला.
मात्र, रात्री साडेदहा वाजता आई आणि बहीण घरी आले. त्यांनी जेवणासाठी सुहाना सदफला पुन्हा आवाज दिला. तेव्हा तिने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवून पाहिला. तरीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजाच्या छिद्रातून पाहिल्यावर सुहाना सदफ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर दरवाजा तोडून तिला घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.