शेंदूरवादा : भाच्याच्या प्रेमविवाहासाठी मुलीला पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातून मावसभावनेच मावसभावासह त्याच्या मुलाच्या अंगावर बोलेरो जीप घातली. यात हा मुलगा (पुतण्या) जागीच ठार झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. नात्याला काळीमा फासणारी ही घटना शेंदूरवादा शिवारातील सावखेडा रस्त्यावरील राष्ट्रमाता शाळेजवळ गुरुवारी (ता. २८) दुपारी एकच्या सुमारास घडली. शिवराम एकनाथ मोढे (४३, रा. जुने वझर, ता. गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून सचिन भागचंद वाघचौरे (रा. धुपखेडा, ता. पैठण) याच्यासह अन्य पाच जणांवर वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, भाच्याच्या प्रेमविवाहासाठी स्वतःच्या मुलाचा हकनाक बळी गेल्याची चर्चा परिसरात दिवसभर होती. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी सचिन वाघचौरे व फिर्यादी शिवराम एकनाथ मोढे हे नात्याने मावसभाऊ आहेत. शिवराम मोढे यांनी बहिणीच्या मुलासाठी म्हणजेच त्यांच्या भाच्याच्या प्रेमविवाहासाठी मावसभाऊ सचिन वाघचौरेच्या मुलीला पळून जाण्यास मदत केली. याचा सचिन वाघचौरेला राग होता.
जुने वझर (ता. गंगापूर) येथील शिवराम एकनाथ मोढे (वय ४३) व पवन शिवराम मोढे (वय २६) हे बापलेक दुचाकीने (एमएच २० जीयू ४९४४) शेंदूरवादा येथून सावखेडामार्गे घरी जात होते. दरम्यान, शेंदूरवादा शिवारात राष्ट्रमाता शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला सचिन वाघचौरे व इतर पाच जणांनी बोलेरो जीपने (एमएच २० ईवाय ०६४५) उडविले. यात एकनाथ मोढे व पवन मोढे हे बापलेक रस्त्यावर कोसळले.
तेव्हा आरोपींनी जीप पुन्हा वळवून घेत दोघा बापलेकांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्यात मुलगा पवन मोढेच्या डोक्यावरून जीपचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पोलिस उपायुक्त महेंद्र देशमुख यांनीही भेट देऊन शिवराम मोढे यांच्या तक्रारीवरून सचिन वाघचौरे व इतर पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे करीत आहेत.
मृत पवन शिवराम मोढे याचे अवघ्या आठ दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते. दोन्ही परिवाराकडे लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, पवनला ठार केल्याच्या घटनेने दोन्ही परिवारांना जबर धक्का बसला. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.